ट्रॉलप, अँटोनी : (२४ एप्रिल १८१५–६ डिसेंबर १८८२). व्हिक्टोरियन कालखंडातील इंग्रज कादंबरीकार. जन्म लंडन येथे. त्याचे बरेचसे शिक्षण हॅरो आणि विंचेस्टर येथे झाले. पुढे त्याने टपाल खात्यात नोकरी केली. १८६५ मध्ये फोर्टनाइट्‌ली रिव्ह्यू ह्या साप्ताहिकाच्या स्थापनेत त्याने भाग घेतला व सेंट पॉल मॅगझीनचे काही काळ संपादन केले. त्याने सु. ४७ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांपैकी बॅरसेस्टशर नॉव्हेल्स  ही सहा कादंबऱ्यांची मालिका (१८५५–६७) विशेष प्रसिद्ध आहे. एखाद्या मर्यादित भूप्रदेशातील लोकजीवन आपल्या अनेक कादंबऱ्यांमधून चित्रित करणे, ही प्रथा त्यामुळे रूढ झाली. आत्मचरित्र व प्रवासवर्णने हे त्याचे इतर उल्लेखनीय लेखन.

आपल्या कादंबऱ्यांतून त्याने तत्कालीन समाजव्यवस्थेच्या प्रस्थापित चौकटीतील उच्च मध्यम वर्गीय कौटुंबिक जीवनाचे चित्रण केले. आकर्षक संविधानके व कसदार शैली ही त्याच्या कादंबऱ्यांची लक्षणीय वैशिष्ट्ये. त्यांतील व्यक्तिचित्रण वास्तववादी असले, तरी त्यात सखोल मनोविश्लेषण आढळत नाही.

आपल्या हयातीत आणि विसाव्या शतकातही काही काळ ट्रॉलपला लोकप्रियता लाभली असली, तरी व्हिक्टोरियन युगातील डिकिन्झ, थॅकरी, जॉर्ज एलियट ह्यांसारख्या कादंबरीकारांची कलात्मक उंची मात्र तो गाठू शकला नाही. लंडन येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Booth, B. A. Anthony Trollope : Aspects of Hits Life and Art, Bloomingtm, 1958.

   2. Cockshutt, A. O. J. Anthony Trollope : A Critical Study, London, 1955.

देशपांडे, मु. गो.