अर्व्हिंग, वॉशिंग्टन : (३ एप्रिल १७८३–‍२८ नोव्हेंबर १८५९). आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणारा पहिला अमेरिकन लेखक. जन्म न्यूयॉर्क येथे एका संपन्न व्यापारी कुटुंबात. बालपणापासूनच लेखनवाचनाची त्यास आवड होती. शालेय शिक्षणानंतर तो व्यवसायाच्या दृष्टीने कायद्याचा अभ्यास करू लागला. परंतु तोही सोडून देऊन त्याने स्वतःस लेखनास वाहून घेतले. त्याचे आरंभीचे काही लेखन त्याच्या पीटर

 

या भावाने चालविलेल्या नियतकालिकातच प्रसिद्ध झाले. ए हिस्टरी ऑफ न्यूयॉर्क फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड टू द एन्ड ऑफ द डच डिनॅस्टी (१८०९) या विनोदी आणि उपहासपूर्ण शैलीत लिहिलेल्या न्यूयॉर्क शहराच्या तथाकथित इतिहासामुळे त्याला प्रथम लोकप्रियता लाभली. निकरबॉकर हिस्टरी या नावाने हे पुस्तक साधारणतः ओळखले जाते. निकरबॉकर या नावाचा कोणी एक डच गृहस्थ हा इतिहास सांगतो आहे, असे यात दाखविले आहे. विनोदासाठी यात अनेक काल्पनिक व अतिरंजित प्रसंग निर्मिलेले आहेत. त्यानंतर निबंध, कथा, चरित्र, प्रवासवृत्त इ. अनेक लेखनप्रकार त्याने हौसेने हाताळले. द स्केच बुक (१८१९-२०) या पुस्तकातले निबंध आणि कथा अमेरिकेप्रमाणे इंग्‍लंडमध्येही लोकप्रिय झाल्या. ‘रिप् व्हॅन् विंकल” आणि ‘द लेजंड ऑफ स्लीपी हॉलो‘ या सुप्रसिद्ध कथा याच पुस्तकातील होत. कोलंबस, गोल्डस्मिथ, जॉर्ज वॉशिंग्टन इ. श्रेष्ठ पुरुषांच्या त्याने लिहिलेल्या चरित्रांपैकी जॉर्ज वॉशिंग्टनचे पंचखंडात्मक चरित्रच (१८५९) विशेष मान्यता पावले आहे. ए टूर ऑन द प्रेअरीज् (१८३५) हे प्रवासवृत्त रेड इंडियनांच्या प्रदेशात प्रवास करून आल्यानंतर त्याने लिहिले. जॉन जेकब ॲस्टर या व्यापाऱ्‍याच्या आग्रहावरून वायव्य अमेरिकेतील फरच्या (मऊ केसाळ कातड्यांच्या) उद्योगधंद्याचा इतिहासही त्याने ॲस्टोरिआ (१८३६) या नावाने लिहिला. त्यात या धंद्यातील कर्तृत्वाबाबत ॲस्टरची बरीच स्तुती केली आहे. इतिहासलेखनाच कल्पना आणि अद्‌भुतरम्यता मिसळून टाकण्याची त्याची प्रवृत्ती क्रॉनिकल ऑफ द काँक्केस्ट ऑफ ग्रॅनडा (१८२९) मध्ये स्पष्टपणे दिसते.अल् हम्ब्रा (१८३२) मध्ये स्पॅनिश आख्यायिका व स्पॅनिश जीवन शब्दांकित केले आहे. यांखेरीज ब्रेसब्रिज हॉल(१८२२), टेल्स ऑफ ए ट्रॅव्हलर (१८२४) ही पुस्तकेही त्याने लिहिली.

 

गोल्डस्मिथच्या धर्तीवर त्याने प्रसन्न आणि खेळकर शैली जोपासली होती. परंतु नवनिर्माणक्षम प्रतिभेचा त्याच्याकडे अभावच होता. तयार कथानके शोधण्यासाठी त्याची धडपड असे. भावनेची सखोलता त्याच्या लेखनात दिसत नाही. मात्र विविध अभिरुचींच्या वाचकांना खूष ठेवण्याचे तंत्र त्याला अवगत असल्यामुळे अमेरिकेप्रमाणेच तो अमेरिकेबाहेरील देशांतही अत्यंत लोकप्रिय झाला. ‘स्पॅनिश रॉयल अकॅडमी ऑफ हिस्टरी’ या संस्थेवर त्याची नेमणूक झाली होती (१८२९). ऑक्सफर्ड विद्यापीठाने एल्एल्. डी. ही पदवी त्याला दिली (१८३०). स्पेनमध्ये राजदूत म्हणून काम करण्याचा मान त्याला मिळाला. न्यूयॉर्क येथेच हा मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर मात्र त्याची कीर्ती वेगाने ओसरत गेली.

 

संदर्भ : 1. Hedges, W. L. Washington Irving: An American Study 1802-1832, Baltimore, 1965. 2. Williams, S. T. The Life of Washington Irving, New York, 1935.

कुलकर्णी, अ. र.