पील, जॉर्ज : (१५५८ – १५९८). इंग्रज नाटककार. एलिझाबेथकालीन इंग्लंडमध्ये ‘युनिव्हर्सिटी विट्स’ म्हणून प्रसिध्द असणाऱ्या अभिजातविद्याविभूषित साहित्यिकांपैकी एक. तो लंडनमध्ये जन्मला. ‘ख्राइस्ट‌्स हॉस्पिटल’ ह्या लंडनमधील अनाथ मुलांसाठी उभारलेल्या निवासी शाळेत त्याचे वडील जमाखर्च ठेवण्याचे काम करीत. पीलचे आरंभीचे शिक्षण ह्याच शाळेत झाले. १५७२ मध्ये पुढील शिक्षणासाठी तो ऑक्सफर्डला आला. ह्या विद्यापीठातून १५७९ मध्ये तो एम्. ए. झाला. ऑक्सफर्ड येथे शिकत असताना युरिपिडीझ ह्या प्राचीन ग्रीक नाटककाराचे एक नाटक त्याने इंग्रजीत अनुवादिले होते, अशी माहिती मिळते. १५८३ च्या सुमारास लंडन शहराबाहेरील परंतु त्या शहराला अत्यंत नजीक अशा एका वसाहतीत तो राहू लागला.

द अरेनमेंट ऑफ पॅरिस (१५८४) हे एका ग्रीक मिथ्यकथेवर आधारलेले गोपनाटक लिहून पीलने नाटककार म्हणून आपल्या कारकीर्दीचा आरंभ केला. एलिझाबेथ राणीच्या समोर ह्या नाटकाचा प्रयोग करण्यात आला. निर्यमक छंदासह अनेक छंदांचा वापर ह्या नाट्यकृतीत करण्यात आलेला असून  सुंदर, संगीतानुकूल भावगीते रचण्याचे पीलचे कौशल्य तीत प्रत्ययास येते. ओल्ड वाइव्ह‌्ज टेल (१५९५) हे त्याचे गद्यपद्यात्मक नाटक. नाटकातल्या नाटकाचे तंत्र त्यात पीलने वापरलेले आहे. रात्रीच्या वेळी एका गृहस्थाकडे आश्रयास आलेल्या प्रवाश्यांना त्या गृहस्थाची पत्नी कथा सांगू लागते आणि एकदम कथेतील पात्रे प्रत्यक्ष रंगभूमीवर येऊन कथेला नाट्यरूप देतात. नाटकाच्या आरंभीच्या भागात बोलभाषेचा केलेला उपयोग हे ह्या नाटकाचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य. एडवर्ड फर्स्ट (१५९३), द बॅटल ऑफ अँल्काझार (१५९४) आणि द लव्ह ऑफ किंग डेव्हिड अँड फेअर बेथसेब (१५९९) ही त्याची अन्य नाटके. द हंटिग ऑफ क्यूपिड नावाचा एक मास्कही त्याने लिहिला. तो त्रुटीत स्वरूपात उपल्बध आहे.

आपल्या नाट्यलेखनात विविधता आणण्याची पीलची दृष्टी दिसून येते. द अरेनमेंट ऑफ पॅरिससाठी त्याने मिथ्यकथेचा वापर केला एडवर्ड फर्स्टमध्ये ऐतिहासिक नाटक लिहिण्याच्या दिशेने प्रयत्न आहे द लव्ह ऑफ किंग डेव्हिड अँड फेअर बेथसेबमध्ये इंग्रजी नाटकाच्या परंपरेतील अद्‌भुत नाटकाचे पुनरुज्जीवन करण्याची प्रवृत्ती दिसते. तथापि पीलची बहुतेक नाट्यरचना सैल आणि विस्कळीत वाटते. नाट्यकृतीच्या घाटाबद्दल त्याने फारशी आस्था बाळगली नाही. शब्दांच्या नादमूल्याची त्याची जाणीव मात्र तीव्र होती त्यामुळे संगीतानुकूल अशी अनेक गीते तो रचू शकला. इंग्लंडच्या लोकपरंपरांचा वारसाही त्याने आपल्या नाट्यकृतींतून जतन केलेला दिसतो. शेक्सपिअरचा एक पूर्वसूरी म्हणूनही पीलच्या नाट्यकृतींचे काही प्रमाणात महत्त्व  आहेच. नाट्यकृतींखेरीज ‘द टेल ऑफ ट्रॉय’ हे इलिअडचा सारांश सांगणारे ४८५ ओळींचे काव्यही त्याने लिहिले आहे.

संदर्भ : Horne, D. H. George Peele, New Haven, 1953.

कुलकर्णी, अ. र.