ओकेसी, शॉन : (३० मार्च १८८० — १८ सप्‍टेंबर १९६४). आयरिश नाटककार जन्म डब्‍लिनमधील झोपडपट्टीत एका श्रमजीवी कुटुंबात. डोळ्यांच्या दुखण्यामुळे शालेय शिक्षणात सतत अडथळे येऊन त्याला सोडावी लागली. आरंभीचे त्याचे दिवस दारिद्र्यात गेले. स्वतः एक श्रमिकच शाळा असल्यामुळे श्रमिकांच्या चळवळीकडे तो लवकरच ओढला गेला. हे करीत असतानाच ‘ॲबी थिएटर’ ह्या विख्यात आयरिश नाट्यसंस्थेसाठी तो नाटके लिहू लागला. द शॅडो ऑफ अ गन् मन (१९२३) हे त्याचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. त्यानंतर ज्यूनो अँड द पेकॉक (१९२४) आणि द प्‍लाऊ अँड द स्टार्स (१९२६) ही दोन नाटके त्याने लिहिली. ह्या तिन्ही साहित्यकृती श्रेष्ठ दर्जाच्या असल्या, तरी द प्‍लाऊ अँडस्टार्स ह्या नाटकावर प्रखर टीका झाली व त्यामुळे अनेक वाद माजले. राजकीय व धार्मिक पूर्वग्रहांवर ह्या नाटकांत टीका होती. त्याच वर्षी त्याने आयर्लंड कायमचे सोडले व तो इंग्‍लंडमध्ये आला. रूढार्थाने शिक्षण झाले नसल्याने व भावनिक स्थैर्य नसल्याने त्याला तेथे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. टॉर्की (इंग्‍लंड) येथे तो मरण पावला.

डब्‍लिनमधील गलिच्छ वस्त्यांचे जीवन आणि आयर्लंडमधील राजकारण – विशेषतः आयर्लंडची स्वातंत्र्यचळवळ – त्याच्या नाटकांतून प्रभावीपणे चित्रित केलेले दिसते. सर्वसामान्य आयरिश माणासाची जिवंत भाषा त्याने नाटकांत वापरली. विदिन द गेट्स (१९३३) आणि द स्टार टर्न्स रेड (१९४०) ह्या अभिव्यक्तिवादी तंत्राने लिहिलेल्या दोन नाटकांत त्याने त्याला परकी असलेली प्रमाणभूत इंग्रजी भाषा वापरल्याने त्यांची परिणामकारकता काहीशी कमी झाली आहे. शोकात्मिका आणि सुखात्मिका ह्यांचे प्रत्ययकारी मिश्रण त्याच्या अनेक नाट्यकृतींत आढळते. त्याची इतर काही महत्त्वाची नाटके अशी : पर्‌पल डस्ट (१९४०), रेड रोझेस फॉर मी (१९४२), कॉकडूड्ल डँडी (१९४९), द बिशप्स बॉनफायर (१९५५). यांशिवाय त्याचे मिरर इन माय हाउस हे उत्कृष्ट आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले आहे (१९५६).

जोशी, अशोक