पेटर, वॉल्टर होरेशिओ : (४ ऑगस्ट १८३९ – ३० जुलै १८९४). ‘कलेसाठी कला’ ह्या तत्त्वाचे समर्थन करणारा एक प्रसिद्ध इंग्रज कलासमीक्षक. त्याचा जन्म शॅडवेल, लंडन येथे झाला. शिक्षण कँटरबरी (किंग्ज स्कूल) आणि ऑक्सफर्ड (क्वीन्स कॉलेज) येथे झाले. १८६४ मध्ये ब्रेझनोझ कॉलेजचा तो फेलो झाला. आपली बहुतेक हयात त्याने ऑक्सफर्ड येथेच विद्यादानात आणि लेखनात घालविली. स्विन्‌बर्नसारख्या प्री-रॅफेएलाइट कवींशी पेटरचे स्नेहसंबंध होते आणि त्यांचा विचारांवर काही प्रभाव होता.  स्टडीज इन द हिस्टरी ऑफ द रेनेसांस (१८७३) हा पेटरचा पहिला ग्रंथ. तेराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतचे फ्रेंच, इटालियन व जर्मन लेखक, तसेच चित्रकार-शिल्पकार ह्यांच्या चरित्रांमधून आणि कार्यामधून प्रबोधनाच्या चळवळीत अनुस्यूत असणाऱ्या सांस्कृतिक व आत्मिक तत्त्वांचा शोध पेटरने ह्या ग्रंथात घेतलेला आहे. आत्माच्या आणि कल्पनाशक्तीच्या सामर्थ्यावर पडणाऱ्या धार्मिक बंधनांविरुद्ध बंड, शारीरिक सौंदर्याविषयीची ओढ, मानवी अनुभव आणि मानवी क्षमता यांवर भर देणारी मानवातावाद ही चळवळ आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वे, हे प्रबोधनाचे प्रमुख पैलू होत अशी पेटरची धारणा होती. पेटरच्या ह्या ग्रंथाने, विशेषत: त्यातील उपसंहारामुळे, इंग्लंडमधील वाङ्मेयीन वर्तुळांत खळबळ उडाली. ‘अनुभवाचे फळ नव्हे, तर खुद्द अनुभव हेच साध्य होय’, अशा आशयाचे विधान ह्या उपसंहारात असून त्यातून कलावादी भूमिकेची पायाभूत अटच व्यक्त झालेली आहे. ह्या ग्रंथातून मानवी जीवन, सौंदर्यानुभव आणि कला ह्यांविषयी पेटरची जी भूमिका प्रकट झाली, तिच्या मागील विचार असा दिसतो : कोणताही मानवी अनुभव व्यक्तिसापेक्षच असतो म्हणून कोणत्याही सैद्धांतिक चौकटीत न अडकता मानवाने प्रत्येक अनुभवास मोकळेपणाने सामोरे गेले पाहिजे. मानवी जीवन क्षणभंगुर असल्यामुळे त्यातील प्रत्येक क्षण पूर्ण तीव्रतेने, संवेदनशीलतेच्या पूर्ण शक्तीने उपभोगला पाहिजे. अशा प्रकारे घेतलेला प्रत्येक अनुभव कलात्मकच असतो आणि अशा अनुभवांतच जीवनाचे साफल्य असते. सौंदर्याची अमूर्त, सर्वमान्य व्याख्या देणे नव्हे, तर त्याच्या विशिष्ट, मूर्त स्वरूपाची समग्र जाणीव व्यक्त करणे, हे सौंदर्यशास्त्राचे कार्य होय. कलात्मक वस्तूने दिलेला प्रत्यय आणि तिने आपल्या व्यक्तिमत्त्वावर केलेला परिणाम ह्यांचे वर्णन करणे, हे कलासमीक्षकाचे कार्य होय. 


मेरिअस दि एपिक्यूरिअन : हिज सेन्सेशन्स अँड आयडीआज (१८८५) ही पेटरची तत्त्वचिंतनात्मक कादंबरी. जीवनाच्या सौंदर्यात्मक मूल्यांबाबतचे पेटरचे विचार तीत व्यक्त झाले आहेत. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील वातावरण रंगविणाऱ्या ह्या कादंबरीत मेरिअस ह्या रोमन तरुणाचे आध्यात्मिक अनुभव, नुकत्याच उदयास आलेल्या ख्रिस्ती धर्मातील नैतिक आणि सौंदर्यात्मक तत्त्वांविषयी त्याला वाटणारे आकर्षण आणि एका ख्रिस्ती मित्रासाठी त्याने केलेले आत्मबलिदान ह्यांची कथा पेटरने गुंफिली आहे. हा त्याग दाखवून पेटरने भोगवाद आणि कलावाद ह्यांच्या भोवती आत्मिक साधानाचे वलय निर्माण केलेले दिसते.

अप्रीसिएशन्स, विथ ॲन एसे ऑन स्टाइल (१८८९) हा पेटरचा आणखी एक उल्लेखनीय ग्रंथ. शेक्सपिअर, वर्डस्‌वर्थ, कोलरिज आदी इंग्रज लेखकांवरील पेटरचे निबंध त्यात आहेत. त्यांसोबतचा शैलीवरचा निबंध ह्या ग्रंथातील सर्वांत महत्त्वाचा निबंध होय. शैली म्हणजे केवळ शब्दरचना आणि वाक्यरचना नव्हे बाह्य जगाचा अनुभव घेण्याची लेखकाची पद्धती आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची एक समग्र प्रतिक्रिया शैलीत अभिव्यक्त होत असते, अशी त्याची भूमिका आहे. आशय आणि अभिव्यक्ती ह्यांची पूर्ण एकात्मता असलेली शैली पेटर आदर्श मानतो मात्र ह्याच निबंधाच्या अखेरीस ही भूमिका सोडून तो कलावादाच्या विरुद्ध दिशेला गेलेला आढळतो : श्रेष्ठ कलेत आविष्काराला वा रूपाला महत्त्व नसून आशयात किंवा विषयवस्तूत सामावलेल्या मानवी मूल्यांचा आवाका आणि सखोलता ह्यांना आहे, असे तो म्हणतो. खुद्द पेटरच्या लेखनात शैलीच्या रचनात्मक बाजूला खूप महत्त्व दिलेले आढळते. कुशलतेने योजिलेले नादानुवर्ती शब्द आणि पल्लेदार, लयदार वाक्यरचना ही त्याच्या शैलीची वैशिष्ट्ये होत.

पेटरचा प्रभाव आरंभी ऑक्सफर्डमधील एका लहानशा वर्तुळापुरताच मर्यादित होता. तथापि हळूहळू तो वाढत गेला. ऑस्कर वाइल्ड, जॉर्ज मूर हे पेटरच्या विचारांनी प्रभावित झालेले काही उल्लेखनीय साहित्यिक होत. विसाव्या शतकाच्या आरंभी पेटर हा टीकेचे लक्ष्य झालेला होता त्याची उपेक्षाही होत होती परंतु अलीकडे त्याचे विचार अधिक आस्थापूर्वक अभ्यासिले जात आहेत. ऑक्सफर्ड येथेच तो निधन पावला.

संदर्भ : 1. Benson, A. C. Walter Pater, London, 1906. 2. Child, R. C.. The Aesthetics of Pater, New York, 1940. 3. Eaker, J. G. Walter Pater : A Study in Methods and Effects, Iowa City, 1933. 4. Fletcher, Ian, Walter Pater, London, 1959. 5. Johnson, R. V. Walter Pater : A Study of His Critical Outlook and Achievment, Victoris, 1961. 6. Thomas, P. E. Walter Pater : A Critical Study, London, 1913. 7. Ward, A. Water Pater : The Idea in Nature, London, 1966.

मालशे, मिलिंद