फ्राय, क्रिस्टोफर : (१८ डिसेंबर १९०७ – ). इंग्रज पद्य–नाटककार. जन्म ब्रिस्टल, इंग्लंड येथे. नट आणि दिग्दर्शक म्हणून बरीच वर्षे नाट्यव्यवसायात काढली. आरंभी द बॉय विथ अ कार्ट (१९५०) सारखे धार्मिक स्वरूपाचे नाट्यलेखन केले. अ फीनिक्स टू फ्रिक्वेंट (१९४६), द लेडी इज नॉट फॉर बर्निंग (१९४८), अ स्लीप ऑफ प्रिझनर्स (१९५१), डार्क इज लाइट इनफ (१९५४) ही अन्य उल्लेखनीय नाटके. अ स्लीप ऑफ प्रिझनर्स हे त्याचे सर्वोत्कृष्ट नाटक मानले जाते. एका उद्‌ध्वस्त प्रार्थनामंदिरात, शत्रूच्या अटकेत असलेल्या काही शिपायांची स्वप्ने त्यात रंगविली आहेत.

फ्रायच्या नाट्यलेखनामुळे पद्य–नाटकांच्या परंपरेला उजाळा मिळण्याची प्रसादचिन्हे दिसू लागली. प्रेक्षकांना स्तिमित करणारे प्रसंग आणि संवाद हे त्याच्या नाट्यलेखनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. फ्रायची भाषाशैली संभाषणाला जवळची परंतू काव्यमय प्रतिमांनी नटलेली आहे. फ्रायची नाटके सुखात्म असली, तरी सुखात्मिकेबद्दलची त्याची कल्पना वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या दृष्टीने सुखात्मिका म्हणजे निराशेतून श्रद्धेकडे जाणे. फ्रायच्या मते जीवन हा एक सुखद चमत्कार आहे. त्यात प्रेम, सौंदर्य आणि मांगल्य आहे. ह्या जीवनात प्रमाद असले, तरी त्यांना क्षमाही आहे. त्याची नाटके अद्‌भुतरम्यतेतून मानवी अंतरंगाचा शोध घेत असल्यामुळे शेक्सपियरच्या काव्यगर्भ नाट्यपरंपरेशी त्यांचे नाते जुळते. शेक्सपियर, टी. एस्. एलियट आणि बायबल ह्यांचा त्याच्यावरचा प्रभाव तीव्रतेने जाणवतो.

संदर्भ : 1. Roy, Emil, Christopher Fry, Carbondale, III., 1968.

2. Stanford, Derek, Christopher Fry, London, 1951.

हातकणंगलेकर, म. द.