हेरिक, रॉबर्ट : (२४ ऑगस्ट १५९१– १५ ऑक्टोबर १६७४). इंग्रज कवी आणि अँग्लिकन पार्सन. त्याच्या जीवनाविषयी फार थोडी माहिती मिळते आणि जी मिळते ती आज उपलब्ध असलेल्या त्याच्या थोड्याशा पत्रांवरून व त्याच्या कवितांवरून. धर्मोपदेशक ह्या नात्याने त्याने किमान १,५०० प्रवचने दिली असावीत पण त्यांतले एकही प्रवचन उपलब्ध नाही. १५५६ मध्ये त्याचे वडील निकोलस हेरिक लायसेस्टरमधला स्वतःचा लोहाराचा व्यवसाय सोडून लंडनला आले आणि एका सोनाराकडे दहा वर्षे त्यांनी उमेदवारी केली. पुढे तो व्यवसाय स्वतंत्रपणे करून त्यांनी त्यात समृद्धी प्राप्त केली. रॉबर्ट हा त्यांचा पाचवा मुलगा. त्याची जन्मतारीख ज्ञात नाही पण २४ ऑगस्टला त्याचा बाप्तिस्मा झाला. 

 

रॉबर्टला लॅटिन भाषेची उत्तम शिकवण मिळालेली होती तथापि आपल्या नातेवाइकांच्या आग्रहाखातर त्याने सोनारकामाच्या व्यवसायात ख्याती प्राप्त केलेले त्याचे काका सर विल्यम हेरिक ह्यांच्याकडेउमेदवारी केली पण त्याचा ओढा काव्यरचनेकडे होता. एका प्रसंगाच्या निमित्ताने त्याने ‘ए कंट्री लाइफ’ ही कविता लिहिली. ह्या कवितेवर रोमन कवी हॉरिस आणि इंग्रज कवी बेन जॉन्सन ह्यांच्या काव्यलेखनाचा प्रभाव असला, तरी त्याच्या स्वतंत्र प्रतिभेची चुणुकही त्या कवितेतून प्रत्ययास येत होती. आपल्या कवितेचे एक वेगळे जग निर्माण करण्यास त्याने आधीच प्रारंभ केला होता. १६१३ च्या सुमारास आपल्या काकांकडे उमेदवारी करणे सोडून देऊन त्याने केंब्रिजच्या सेंट जॉर्ज कॉलेजातप्रवेश घेतला तथापि पुढे शैक्षणिक खर्चाचा विचार करून तुलनेने कमी खर्चाच्या ट्रिनिटी हॉलमध्ये कायद्याच्या अभ्यासासाठी त्याने प्रवेश घेतला. १६१७ –२० ह्या कालखंडात त्याने बी.ए. (१६१७) आणि एम्.ए. (१६२०) ह्या पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर त्याने वकिलीचा व्यवसाय केला असेलही पण १६२३ मध्ये तो चर्चचा डिकन झाला आणि ‘चर्च ऑफ इंग्लंड ‘चा धर्मोपदेशक म्हणून काम करू लागला. १६२३ मध्ये तो काही काळासाठी लंडनला परतला. तिथे जॉन्सन आणि इतर काही साहित्यिकांशी त्याने आपला परिचय वाढवला. १६२७ मध्ये बकिंगहॅमच्या ड्यूककडे त्याच्या खाजगी पूजागृहात धार्मिक सेवा करण्यासाठी चॅपलेन म्हणून तो नियुक्त झाला. ह्या ड्यूकने फ्रेंचांविरुद्ध केलेल्या नाविक मोहिमेत त्याने भाग घेतला. अनेक इंग्रज नाविक त्यात ठार झाले पण हेरिक वाचला. पहिल्या चार्ल्सने डेव्हनशरमधील डीन प्रायर येथे त्याला व्हिकारपद दिले. तेथे त्याने उर्वरित आयुष्य व्यतीत केले.

 

हेरिकने विलापिका, उपरोधिका, चतुरोक्ती, एका काल्पनिक प्रेयसीला उद्देशून लिहिलेली प्रेमगीते, विवाहविधींच्या प्रसंगी म्हणावयाची गीते, आपले मित्र आणि आश्रयदाते ह्यांच्यासाठी लिहिलेली प्रशंसागीते, धार्मिक उत्सवगीते अशा रचना केलेल्या आहेत. घाट आणि आशय ह्यांतील परिपूर्णता आणि कधी हलकाफुलका, कधी इहवादी, तर कधी सुखवादी असा आशय ही त्याच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये. त्याची कविता बौद्धिक प्रगल्भतेचा आव आणीत नाही पण तरीही त्याच्या कवितेच्या भावविश्वाचा आवाका वैविध्यपूर्ण आहे. 

 

ग्रामीण जीवनाने प्रेरित झालेल्या भावकवितांपासून भूतकालीन जीवनासंबंधीच्या स्मृतिकातरतेपर्यंत हा आवाका आहे. क्षणात दृष्टिआड होणारे प्रेम आणि सौंदर्य हाही त्याच्या कवितेचा एक विषय. अभिजात साहित्याचे त्याचे उत्तम वाचन होते. इंग्रजी लोकविद्येचा आणि भाव-कवितांचा त्याच्यावर प्रभाव होता. बायबल आणि अन्य धर्मसाहित्य ह्यांच्याशी त्याचे निकटचे नाते होते. बेन जॉन्सन आणि रॉबर्ट बर्टन ह्या समकालीन इंग्रज साहित्यिकांच्या साहित्यानेही तो प्रभावित झाला होता. 

 

डीन प्रायर, डेव्हनशर येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.