नॅश, टॉमस: (१५६७–१६०१). आंग्ल पुस्तपत्रकार, कादंबरीकार व नाटककार. सफक परगण्यातील लोस्टॉफ्ट येथे जन्मला. केंब्रिजच्या सेंट जॉन कॉलेजमधून तो १५८६ मध्ये बी. ए. झाला. १५८८ च्या सुमाराला केंब्रिजहून तो लंडनला आला. ⇨ रॉबर्ट ग्रीनसारख्या व्यावसायिक लेखकांशी त्याचा परिचय झाल्यानंतर एक व्यवसाय म्हणून लेखन करण्यास त्यानेही आरंभ केला. रॉबर्ट ग्रीनच्या मेनॅफॉन (१५८९) या रोमान्सला लिहिलेली प्रस्तावना व अनॅटमी ऑफ ॲब्‌सर्डिटी (१५८९) यांचा समावेश त्याच्या आरंभीच्या लेखनात होतो. अतिरंजित आणि उपहासगर्भ शैली हे या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य.

नॅशच्या औपरोधिक विनोदगर्भ शैलीला खरा बहर आला तो ‘मार्टिन मार्‌प्रिलेट’ मुळे निर्माण झालेल्या वादामध्ये. चर्च ऑफ इंग्लंडमध्ये प्यूरिटन लोकांचा वाढता प्रभाव रोखण्याचा एक मार्ग म्हणून कँटरबरीचा आर्चबिशप जॉन व्हिटगिफ्ट याने कोणतेही साहित्य प्रकाशित करण्यापूर्वी ते तपासले जाण्याचा हुकम जारी केला होता. ह्या दडपशाहीच्या निषेधार्थ ‘मार्टिन मार्‌प्रिलेट’ हे नाव धारण करून प्रखर टीका करणारी काही औपरोधिक पुस्तपत्रे लिहिली जात होती. ह्या पुस्तपत्रांवर तसाच प्रतिहल्ला चढविण्याचे काम आर्चबिशपच्या पक्षाकडून नॅशने केले. त्याचप्रमाणे तत्कालीन कवी रिचर्ड हार्व्ही व त्याचा भाऊ गाब्रिएल हार्व्ही यांच्याविरुद्धही त्याने उपहासगर्भ लिखाण केले.

परंतु नॅशने केवळ व्यक्तिगत टीका केली नाही. आपल्या समकालीन जीवनातील दोष, विसंगती, अंधश्रद्धा यांचा त्याने प्रखर उपहास केला. १५९२ साली लिहिलेली पिअर्स पेनिलेस ही गद्य उपरोधिका व ख्राइस्ट्स टीअर्स ओव्हर जेरूसलेम ही पुस्तके या उपहासाची समर्पक उदाहरणे आहेत.

द अन्‌फॉर्च्यूनेट ट्रॅव्हलर (१५९४) या नावाची त्याची कादंबरी सुप्रसिद्ध आहे. ठकसेनी किंवा पिकरेस्क पद्धतीची इंग्रजीतील ही पहिली कादंबरी साध्या, सोप्या व चित्रमय शैलीत लिहिली आहे. बारीकसारीक तपशील देण्याच्या वृत्तीमुळे त्यातील कल्पनारम्यतेला वास्तवतेची डूब मिळाली आहे. डॅन्येल डीफोच्या वास्तववादाशी ही वृत्ती मिळतीजुळती वाटते.

यांखेरीज समर्स लास्ट विल अँड टेस्टामेंट (१५९२, प्रकाशित १६००) नावाचा मास्कही त्याने लिहिला. आइल ऑफ डॉग्ज (१५९७) हे नाटक त्याने काही सहलेखकांबरोबर लिहिले. हे नाटक सरकारी रोषाला बळी पडले होते.

आपली उपरोधपूर्ण विनोदी शैली, सहजता, सोपेपणा यांमुळे नॅश एलिझाबेदन कालखंडातील एक प्रभावी गद्यशैलीकार म्हणून ओळखला जातो.

भागवत, अ. के.