मिडल्‌टन, टॉमस: (एप्रिल १५७० ?–४ जुलै १६२७).इंग्रज नाटककार. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही. त्याचे आईवडील लंडन शहरात राहत होते. त्यावरून त्याचा जन्म लंडन शहरी झाला,असे मानले जाते. १५९८ मध्ये त्याने ऑक्सफर्डच्या क्वीन्स  कॉलेजात प्रवेश घेतला आणि ‘ग्रेज इन’ ह्या कायद्याचे शिक्षण देणाऱ्या सुप्रसिद्ध संस्थेत त्याने १५९३ किंवा १५९६ मध्ये प्रवेश घेतला,असे दिसते. मिडल्‌टनच्या नाट्यलेखनात शोकात्मिकांबरोबरच सुखात्मिकांचाही समावेश आहे. त्याचे काही नाट्यलेखन त्याने टॉमस डेकर, विल्यम राउली यांसारख्या समकालीन नाटककारांच्या सहकार्याने केले. काही मुखवटा नाट्येही (मास्क्‌स) त्याने लिहील. १६२० मध्ये लंडन शहराचा इतिवृत्तकार (क्रॉनिकलर) म्हणून त्याची नेमणूक झाली होती. न्यूइंग्टन बट्‌स,सरी येथे तो निधन पावला.

अ गेम ऑफ चेस (प्रयोग १६२४) हीमिडल्‌टनची विशेष उल्लेखनीय नाट्यकृती. हे नाटक म्हणजे एक उपरो धप्रचुर राजकीय रूपक होते. स्पेन व इंग्लंड ह्या दोन राजसत्तांमधली लढत त्याने रूपकात्मक पद्धतीने रंगभूमीवर सादर केली होती. ह्या नाटकाला प्रेक्षकांचा फार मोठा प्रतिसाद लाभला. तथापि त्यामुळे स्पेनच्या भावना दुखावल्या आणि त्या नाटकावर बंदी घातली गेली.

मिडल्‌टनची अन्य उल्लेखनीय नाटके अशी: शोकात्मिका-विमेन बिवेअर विमेन (प्रकाशित १६५७), द चेंजलिंग (विल्यम राउलीच्या सहकार्याने-प्रकाशित १६५३).सुखात्मिका-ट्रिक टू कॅच द ओल्ड वन (प्रकाशित १६०८),द फॅमिली ऑफ लव्ह (१६०८), द रोअरिंग गर्ल (टॉमस डेकरच्या सहकार्याने-प्रकाशित १६११),द स्पॅनिश जिप्सी(विल्यम राउलीच्या सहकार्याने-प्रयोग १६२३),एनिथिंग फॉर   क्वा ट लाईफ (१६६२).

भीषण नाट्य वास्तववादी पातळीवर आणण्याचे मिडल्‌टनचे कौशल्य विमेन बिवेअर विमेनमध्ये प्रत्ययास येते. त्याच्या सुखात्मिकांतून त्याचा तरल विनोद,हजरजबाबीपणा आणि कडवट उपहास दिसून येतो. सफाईदार रचना हे त्याच्या नाट्यकृतीचे एक लक्षणीय वैशिष्ट्य असले,तरी त्यांच्या नाट्यकृतीचे एक लक्षणीय वैशिष्ट्य असले,तरी त्याच्या नाट्यरचनेत कमालीची विरूपता दिसून येते.

संदर्भ :1. Barker, R.H.Thomas Middleton, New York, 1959.

            2. Bullen, A. H. Ed. The works of Thomas Middleton, 8 Vols., London, 1885-86.

            3. Dunkelm, W. D. The Dramatic, Technique of Thomas Middleton in the Comedies of London Life, 1925. 

            4. Schoenbaum, Middleton’s Tragedies, New York, 1955.

भागवत, अ. के.