स्ट्रेची, लिटन : (१ मार्च १८८०—२१ जानेवारी १९३२). इंग्रज चरित्रकार आणि समीक्षक. जन्म लंडनमध्ये. शिक्षण लीमिंग्टन कॉलेज, लिव्हरपूल विद्यापीठ आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे. लंडनमध्ये असताना कलावंत, बुद्धिमंत आणि साहित्यिक सदस्य असलेल्या ‘ब्लूम्सबरी ग्रुप’ मध्ये तो एक प्रमुख सदस्य होता. आरंभी त्याने काही नियतकालिकांसाठी समीक्षात्मक लेखन केले. फ्रेंच साहित्याचा त्याचा चांगला अभ्यास होता. लँडमार्क्स इन फ्रेंच लिटरेचर (१९१२) हे त्याचे पहिले पुस्तक तथापि त्याला ख्याती मिळाली, ती चरित्रलेखनाच्या क्षेत्रात. एमिनंट व्हिक्टोरियन्स (१९१८) आणि क्वीन व्हिक्टोरिया (१९२१) हे त्याचे चरित्रात्मक ग्रंथ लोकप्रिय ठरले. व्हिक्टोरियन कालखंडात लोकादराला पात्र ठरलेल्या कार्डिनल मॅनिंग, फ्लॉरेन्स नाइटिंगेल, टॉमस आर्नल्ड आणि जनरल चार्ल्स गॉर्डन अशा व्यक्तींच्या चरित्ररेखा एमिनंट व्हिक्टोरियन्समध्ये आहेत. ह्या ग्रंथांखेरीज एलिझाबेथ अँड एसेक्स (१९२८) आणि पोर्ट्रेट्स इन मिनिअचर (१९३१) हे ग्रंथही त्याने लिहिले.

भूतकाळाबद्दल स्ट्रेचीचा दृष्टिकोण फारसा आदराचा नव्हता. अनेकदा गतकाळातील थोर व्यक्तींकडे त्याने हास्यजनक दृष्टीने पाहिले आहे. हे करताना त्याच्या लेखनाचा सूर मात्र सभ्यतेचा आणि संयमाचा असे. त्यातून राणी व्हिक्टोरियाही सुटली नाही. पण ह्याचा अर्थ, तो केवळ मोठमोठ्या व्यक्तींकडे दोषैक दृष्टीने पाहणारा होता, असा नव्हे. निरनिराळ्या व्यक्तींच्या स्वभावातली कोडी आणि गुंतागुंत त्याच्या जिज्ञासेला आकर्षित करीत असे. चरित्र लिहिताना संबंधित व्यक्तीच्या संदर्भातल्या अनेक घटना, तपशील गोळा करून त्या चरित्राचे दोन-तीन खंड उभे करणे त्याला मान्य नव्हते. त्यापेक्षा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे स्ट्रेचीच्या दृष्टीने जे रहस्य वा मर्म असेल त्यावर नेमका प्रकाश टाकणारे तपशील निवडणे हे त्याचे खास वैशिष्ट्य होते. बढाईखोर वृत्ती आणि आत्मसंतुष्टता ह्यांबद्दल त्याला तिटकारा होता. अलिप्तपणा, ज्ञानसाधना, विवेकशक्ती ह्यांचे त्याला कौतुक होते. अठराव्या शतकातील गिबनसारख्या लेखकांचा तो त्यासाठीच चाहता होता. प्रामाणिक भावना, प्रेम हा खर्‍या नातेसंबंधांचा पाया आहे, असे त्याने मानले. त्याचे चरित्रग्रंथ कधी कधी कादंबर्‍यांसारखे वाटतात. त्याच्या क्वीन व्हिक्टोरियामध्ये ह्याचा प्रत्यय येतो. घटनांची गतिमानता, अवघड प्रसंगांचे उत्कट भावनेने केलेले चित्रण, व्यक्ति-रेखनातला जिवंतपणा ह्यांमुळे ऐतिहासिक व्यक्तींनाही रोमान्सच्या नायक-नायिकांचे स्वरूप कसे येते, हे येथे दिसते. चरित्रलेखन करताना एखाद्या व्यक्तीबद्दल प्रशंसेने लिहिणे आणि नंतर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने उपरोध प्रकट करणे ह्यांतला विसंवाद वाचकांना जाणवल्यावाचून राहत नाही. मनुष्याचा दुबळेपणा आणि त्याचा मोठेपणा परस्परांत कसा मिसळून गेलेला असतो, ह्याबद्दलचा खेद निर्माण होणे असाही त्याचा एक परिणाम घडून येतो.

स्ट्रेचीकडे वाचकांना आकृष्ट करून घेण्याचे सामर्थ्य होते पण लेखक म्हणून त्याच्या मोठेपणाला त्याच्या लेखनाच्या स्वरूपामुळे मर्यादाही पडल्या. ह्या मर्यादा पडण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याची जीवनदृष्टी. राजकारण म्हणजे कपट आणि कारस्थाने, धर्म हा मुख्यतः एक कालविपर्यास, अशी त्याची धारणा होती. त्याच्या दृष्टीने व्यक्तिगत संबंधांना मात्र जीवनात सर्वांत महत्त्वाचे स्थान होते. स्ट्रेचीच्या हयातीत आणि त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्यावर टीका होत राहिली मात्र हेही खरे, की चरित्राला एक घाट असला पाहिजे ह्याची जाणीव त्याने चरित्रकारांमध्ये निर्माण केली चिकित्सक दृष्टी चेतवली.

इंग्लंडमधील हंगरफर्ड, बर्कशर येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.