ऑटवे, टॉमस : (३ मार्च १६५२–१४ एप्रिल ? १६८५). इंग्रज नाटककार. जन्म इंग्‍लंडमधील ट्रॉटन येथे. शिक्षण विंचेस्टर आणिऑक्सफर्ड येथे. पदवी न घेता तो लंडनला आला. तेथे अभिनेता होण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. डॉन कार्लोस (१६७६), द ऑर्फन (१६८०) आणि व्हेनिस प्रिझर्व्ह्‌ड (१६८२) ह्या त्याच्या प्रमुख शोकात्मिका. त्यांतील पहिली ‘हिरोइक व्हर्स’ मध्ये लिहिलेली असून दुसऱ्या दोन निर्यमक पद्यात आहेत. नाट्यपूर्ण क्षण पकडून त्यांचा कलात्मक संयमाने आविष्कार करण्याचे त्याचे सामर्थ्य व्हेनिस प्रिझर्व्ह्‌डसारख्या नाटकात दिसून येते. या नाटकाचे अनेक यूरोपीय भाषांत अनुवाद झाले आहेत. वरील शोकात्मिकांखेरीज त्याने काही सुखात्मिका लिहिल्या. तथापि त्या फारशा यशस्वी झाल्या नाहीत. लंडन येथे तो निवर्तला.

संदर्भ : 1. Ghosh, J. C. Ed. Woks, 2 vols., Oxford 1932.

            2. Ham. R. G. Otway and Lee, New Haven 1931.

भागवत, . के.