निग्रो साहित्य : अमेरिकन निग्रो साहित्याचा अमेरिकन इतिहासाशी व जीवनाशी अतूट संबंध आहे. निग्रोंना आफ्रिकेतून जबरदस्तीने आणून अमेरिकेत गुलाम म्हणून विकण्यात आल्यावर त्यांच्यावर एक निराळीच संस्कृती, धर्म व जीवन लादले गेले. त्यांची माणुसकीसुद्धा हिरावून घेण्यात आली. ही सांस्कृतिक व वांशिक पोकळी अमेरिका भरू शकली नाही. काळ्या कातडीमुळे मानहानीचे व दुय्यम दर्जाच्या नीगरिकांचे जीवन जगायला लावणारी अमेरिकन संस्कृती निग्रो या विसाव्या शतकात नाकारावयास बघतो पण त्या नकाराची जागा आफ्रिकन वांशिकता व संस्कृती घेऊ शकत नाही. म्हणून ‘आपण कोण?’ ह्या स्वत्त्वाच्या (‘आयडेंटिटी’) शोधात निग्रो माणूस व लेखक आज आहे तसेच गोऱ्या अमेरिकन संस्कृतीकडे व समाजाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोण प्रेम-द्वेष ह्या द्विधा मनोवृत्तीत दिसून येतो. ही मनोवृत्ती व स्वत्त्वाचा शोध ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्याशिवाय अमेरिकन निग्रो लेखकांच्या समस्या समजणे कठीण आहे.

निग्रोंची १८६३ साली गुलामीतून कायद्याने मुक्तता झाली. तेव्हापासूनच त्यांना शिक्षण घेता येऊ लागले. तत्पूर्वी त्यांच्या जीवनातील दु:ख, आशा, आकांक्षा, कारुण्य, देवाकडे ओढ व मृत्यूचे आकर्षण इ. भाव ‘स्पिरिच्युअल्स’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कितीतरी अनामिक कवींना स्फुरलेल्या गीतांतून प्रकट होत होते. फिलिस व्हिटली ही कवयित्री मात्र पोएम्स ऑन व्हेरिअस सब्जेक्ट्‌स (१७७३) ह्या काव्यसंग्रहामुळे प्रसिद्ध आहे.

गोऱ्यांनी लिहिलेल्या साहित्यात निग्रोचे ठराविक साच्याचे पात्र आढळते. नाचणाऱ्या, बागडणाऱ्या विदूषकाच्या (उदा., टॉमस राइसच्या १८२८ च्या नाटकातला जिम क्रो), आळशी, अविश्वासू परंतु चाणाक्ष असलेल्या वा गुलामीत झुरत असलेल्या उमद्या रानटी (नोबल सॅव्हिज) माणसाच्या अशा प्रकारच्या रूपांनी जेम्स फेनिमोर कूपर, व्हिटिअर, लाँगफेलो, हॅरिस इ. गोऱ्या लेखकांत निग्रो सापडतो. हॅरिएट बीचर स्टो हिच्या अंकल टॉम्स कॅबीन (१८५२) व मार्कट्‌वेनच्या हकलबरी फिन (१८८४) ह्या दोन्ही गाजलेल्या कादंबऱ्यांत निग्रोचे चित्रण सहानुभूतिपूर्वक झालेले आढळते.

निग्रोंच्या पिढीत १८६३ ते १९२० पर्यंत शिकून तयार झालेल्या चार्ल्स चेस्टनट, पॉल लॉरेन्स डनबार, विल्यम डूबॉइस व जेम्स वेल्डन जॉन्सन हे साहित्यक्षेत्रात चमकले. चेस्टनटने द हाउस बिहाइंड द सेडर्न (१९००), द कर्नल्स ड्रीम (१९०५) ह्या व इतर कादंबऱ्यांद्वारा आजच्या निग्रो विद्रोही वाङ्‌मयाची सुरूवात केली, असे म्हणावयास हरकत नाही. डनबार हा मुख्यत: सौंदर्यवादी कवी आणि कादंबरीकर (द अनकॉल्ड १८९८) होता. जेम्स वेल्डन जॉन्सन हासुद्धा सौंदर्यवादी कवी व कादंबरीकार.

निग्रो १९२०–३० च्या कालखंडात दक्षिणेतून मोठ्या संख्येने उत्तर आणि पूर्वेकडील शहरांत कळपाने वस्ती करून राहिल्याने या शहरात ‘घेटो’ म्हणजे दाट वस्तीच्या झोपडपट्‌ट्या निर्माण झाल्या. कापूस वेचण्याकरीता दक्षिणेत शेतावर राबणे व गुलामीतून मुक्त झाल्यानंतर दाटीवाटीचे गरिबीचे जीवन हार्लेम, न्यूयॉर्क अथवा साउथ साइड, शिकागो असल्या ‘घेटो’ त कसे तरी जगणे, ह्यात सुशिक्षित निग्रोला काही विशेष फरक दिसला नाही. त्याला आपल्या विसरलेल्या आफ्रिकन संस्कृतीची जाणीव होऊ लागून एक नवीन अभिमान आणि आत्मविश्वास वाटू लागला. ही नवीन वाङ्‌मयीन चळवळ ‘हार्लेम’ म्हणून ओळखली जाते. ह्या चळवळीच्या काळात क्लॉड मॅक्को, लँग्‌स्टन ह्यूझ, काउनटे कुलेन आणि जीन टूमर या लेखकांनी अमेरिकन निग्रोच्या प्रश्नांना जाहीर स्वरूप दिले. मॅक्केने हार्लेम शॅडोज (१९२२) ह्या कवितासंग्रहाद्वारे आणि होम टू हार्मेम (१९२७), बनाना बॉटम (१९३३) ह्या कादंबऱ्यांद्वारा निग्रो वाङ्‌मयात विद्रोही सूर आणला. लँग्स्टन ह्यूझ हा निग्रो बोलभाषेचा उपयोग करणारा पहिला लोककवी. आपण आफ्रिकन असून अमेरिकनसुद्धा आहोत ही जाणीव त्याच्या कवितांतून (द विअरी ब्लूज १९२६) आणि नॉट विदाउट लाफ्‌टर (१९३०) ह्या कादंबरीतून स्पष्ट होते. काउनटे कुलेन कवितांद्वारे (कलर, १९२५ कॉपर सन, १९२७) आणि वन वे टू हेव्हंनं (१९३२) ही कादंबरी लिहून अमेरिकन निग्रो हा अमेरिकन संस्कृतीचाच वारसदार आहे हे घोषित करतो. जीन टूमरच्या कवितेत व त्याच्या केन (१९२३) ह्या कथा, कविता, व्यक्तिचित्रे आदी असलेल्या संकीर्ण ग्रंथात निग्रोच्या स्वत्त्वाचा प्रश्न हाताळलेला दिसतो.

परंतु आफ्रिकन संस्कृतिजन्य स्वप्नवाद व आत्मविश्वास १९३० च्या मंदीच्या लाटेत सापडून करपून गेला व पदरी आली ती फक्त विफलता व दाहक निराशा. ह्या क्रूर अनुभवातून एक नवीन प्रखर विद्रोही वाङ्‌मय डूबॉईस, जेम्स जॉन्सन, झोरा हर्स्टन, चेस्टर हाइम्स इ. लेखकांकडून निर्माण पण ह्या सगळ्यांत गाजला तो रिचर्ड राइट. त्याच्या नेटिव्ह सन (१९४०) ह्या कादंबरीने विद्रोही वाङ्‌मयाची खरीखुरी सुरूवात केली. ब्लॅक बॉय (१९४५) ह्या आपल्या आत्मचरित्रात त्यांने दक्षिणेतील स्वत:च्या कष्टमय जीवनाचे वर्णन केले आहे. ह्या स्वानुभवाच्या आधारावर व इतर निग्रोची स्थिती प्रत्यक्ष पाहिल्यावरून त्याने नेटिव्ह सन लिहिली. ‘नेटिव्ह सन’ म्हणजे भूमिपुत्र परंतु ह्या भूमिपुत्राला शेवटपर्यंत पुत्राचे अधिकार नाकारले जातात. ही विरोधव्यंजना कादंबरीत शेवटपर्यंत जाणवते. बिगर टॉमस हा ह्या कादंबरीचा नायक. त्याच्या आशा-आकांक्षांना तो निग्रो असल्यामुळे वाव मिळत नाही. शेवटी तो आपल्या गोऱ्या मालकाच्या मुलीचा खून करतो. कोर्टात त्याचा वकील जी बाजू मांडतो, ती लेखकानेच मांडली आहे असे वाटते कारण वकील म्हणतो, की ह्या खुनाला जबाबदार आरोपी नसून संबंध समाजच आहे. ही कैफियत बरीच लांबलचक व कंटाळवाणी झाली आहे व लेखक कम्युनिस्ट असल्यामुळे निग्रोकडे वर्गकलहाच्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. ही कादंबरी गोऱ्या संस्कृतीवर फार मोठी टीका होती व रीचर्ड राइटबरोबरच निग्रो साहित्यालाही अस्मिता, प्रतिष्ठा आणि जगन्मान्यता मिळाली.

पंरतु बिगर टॉमस हे पात्र अतिरेकी, अतिरंजित व राक्षसी वाटते. निग्रोची ही प्रतिमा पुष्कळांना मान्य नसल्यामुळे प्रतिक्रिया म्हणून जेम्स बॉल्डविन व राल्फ एलिसन ह्या लेखकांनी केवळ प्रक्षोभ म्हणजे वाङ्‌मय नव्हे व निग्रोने अमेरिकन राहूनच आपले समाजातील हक्काचे स्थान मिळविले पाहिजे अशी भूमिका घेतली. साहित्य हे शास्त्र आहे आणि त्याचा उपयोग निग्रोंचे प्रश्न सोडविण्यास केला पाहिजे हे रिचर्ड राइट व त्याच्या अनुयायांचे म्हणणे बॉल्डविन आणि एलिसनला मान्य नाही. साहित्य हे समाजसुधारणेसाठी नसून सबंध जीवनाच्या कलात्मक सर्जनासाठी वापरले पाहिजे, असे ह्या दोघांचे मत आहे. या अमर साहित्यनिर्मितीच्या मार्गात बऱ्याच अडचणी आहेत याची जाणीव बॉल्डविनला आहे. अनुभवाशी प्रमाणिक राहूनच लेखक उत्तम कलाकार होऊ शकतो हे जसे त्याला माहित आहे, तसेच निग्रो लेखकांचे विश्व व अनुभव त्यांच्या काळ्या रंगावर आधारलेल्या अपमानित जीवनाच्या मर्यादेपलीकडे नाहीत, हेही त्याला माहीत आहे. निग्रो लेखकाने निग्रोपण विसरून अमेरिकन संस्कृतीत विरघळून जावे आणि सबंध अमेरिकन जीवनाचा भाष्यकार व्हावे असे बॉल्डविन व एलिसनला वाटते.


एलिसनच्या इनव्हिझिबल मॅन (१९५२) ह्या कादंबरीला अमेरिकेचे ‘नॅशनल बुक ॲवार्ड’ मिळाले. कादंबरीतील ‘अदृश्य माणूस’ हा अर्थात निग्रो आहे, कारण त्याचे अस्तित्व असून नसल्यासारखेच आहे. प्रतिमा, प्रतिके व औपरोधिक विनोदाद्वारे एलिसनने निग्रोंचा इतिहास, सामाजिक जीवन व त्यांचे भविष्यातील स्वरूप निग्रोंच्या बोलभाषेत अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. कादंबरीत गोऱ्या संस्कृतीने निग्रोंचे जीवन किती शापित केले आहे हे दाखवून बंडाचा जरी सूर काढलेला दिसतो, तरी निग्रोला अमेरिकन संस्कृतीच्या चौकटातच राहून मुक्ती मिळविली पाहिजे, ही लेखकाची भावना स्पष्ट दिसते. ही कादंबरी इतर निग्रो लिखाणापेक्षा कलात्मक दृष्ट्या वरचढ आहे.

बॉल्डविनचे तीन निबंधसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. नोट्‌स ऑफ ए नेटिव्ह सन (१९५५) मध्ये बरेचसे आत्मचरित्र व अपमानित जीवनाचे वर्णन आहे. नोबडी नोज माय नेम (१९६१) मध्ये काही निबंध साहित्यासंबंधी, तर काही गोऱ्या-काळ्यांच्या संबंधांविषयी आहेत. यूरोपची यात्रा करून परतलेल्या बॉल्डविनला निग्रोचा एक नवीन आक्रमक पवित्रा दिसला. मार्टिन ल्युथर किंग, ज्युनिअर ह्यांनी महात्मा गांधींच्या तत्त्वावर लढा देण्यास सुरूवात केली होती, तर दुसरीकडे, एलिझा महंमदने ‘ब्लॅक मुस्लिम’ ही रक्तरंजित क्रांतीची भाषा बोलणारी आक्रमक चळवळ उभारली होती. ह्या पार्श्वभूमीवर बॉल्डविनने द फायर नेक्स्ट टाइम (१९६३) हा गाजलेला निबंधसंग्रह प्रसिद्ध केला. निग्रोंचे प्रश्न जर समाधानकारकपणे सुटले नाहीत, तर अमेरिकेत ‘आग पेटेल’ असा इशारा शेवटच्या निबंधात बॉल्डविनने दिला आहे. ही भविष्यवाणी तद्‌नंतर नेहमी उद्‌भवणाऱ्या दंगलींवरून खरी झालेली दिसते.

गो टेल इट ऑन द माउंटन (१९५३) ह्या स्वनुभवावर आधारलेल्या कादंबरीने बॉल्डविनला प्रथम प्रसिद्धी मिळवून दिली. पूर्वदीपनाच्या (फ्लॅशबॅक) साहाय्याने एका निग्रो कुटुंबाच्या तीन पिढ्यांचे चित्रण तीत आले आहे. १४ वर्षांच्या जॉन ह्या नायकाचे व्यक्तिमत्त्व मुक्ती व अध:पात ह्या दोन विरोधी टोकांच्या द्वंद्वात विकसित होत जाते. जोव्हानीज रूम (१९५६) ही बॉल्डविनची समलिंगसंभोग विषय असलेली आणि स्वानुभवावर आधारलेली दुसरी कादंबरी. ह्यात एकही काळे पात्र नाही. त्याच्या अनदर कंट्री (१९६३) ह्या कादंबरीने, तीवर बंदी घालण्याची मागणी केली जाण्याइतपत तीव्र प्रतिक्रिया निर्माण केल्या. गोरा-निग्रो संभोग व वांशिक संबंध, समलिंगसंभोग ह्यांसारखे मोहोळ उठविणारे विषय इथे हाताळलेले आहेत. लैंगिक वर्णस्वातंत्र्य व समता जर मिळत नसतील, तर क्रांती करून ती मिळविली पाहिजेत असे बॉल्डविनचे मत दिसते. समाजाला नेहमी धक्के देत राहणे हे कलावंताचे कर्तव्य आहे असे बॉल्डविन मानत असलेल्या वरील विषयावर पुन्हा त्याने टेल मी हाउ लाँग द ट्रेन हॅज बीन गॉन (१९६८) ही कादंबरी लिहिली. हार्लेमच्या निग्रो वस्तीत वाढलेल्या व पुढे प्रसिद्धी मिळालेल्या लिओ प्राउडहॅमर ह्या निग्रो नटाची ही कथा आहे.

गोइंग टू मीट द मॅन (१९६५) हा त्याचा लघुकथासंग्रह व ब्लूज फॉर मिस्टरी चार्ली (१९६७) आणि द अमेन कॉर्नर (१९६९) ही त्याची दोन नाटके प्रसिद्ध आहेत. पहिले नाटक इमेट टील ह्या निग्रो युवकाच्या १९५५ मध्ये मिसिसिपीमध्ये झालेल्या खुनाच्या प्रसंगावर आधारित आहे. भावनांची उत्कटता व सखोलता, भाषेचा आवेश व जिवंतपणा, विचारांचे गांभीर्य, समतोलपणा आणि (बायबलचा आपल्यावर पडलेला प्रभाव बॉल्डविनने मान्य केलेला आहेच) बायबलसारखे कल्पनेच्या उत्तुंग शिखरावर पोहोचविणारे वक्तव्य व निग्रो स्परिच्युअलचे करुणगंभीर, झपाटणारे व स्मृतीत रेंगाळणारे संगीत ह्या दोन्हींचा संगम साधणारी शैली हे बॉल्डविनचे वैशिष्ट्य आहे.

आंतरराष्ट्रीय कीर्ती असलेल्या या तीन लेखकांशिवाय प्रथम श्रेणीचे आखणी बरेच निग्रो लेखक आहेत. चेस्टर हाइम्सच्या इफ ही हॉलर्स लेट हिम गो (१९४५), लोन्‌ली क्रूसेड (१९४७) आणि द थर्ड जनरेशन (१९५४) ह्या कादंबऱ्या रिचर्ड राइटच्या धर्तीवर लिहिलेल्या वाटतात. जेम्स ऑलिव्हर किलेन्सच्या यंग ब्लड (१९५४) व अँड देन वी हर्ड द थंडर (१९६३) ह्या गोऱ्या-काळ्या संघर्षावरील कादंबऱ्या कंटाळवाण्या वाटतात. कार्ल ओफोर्ड (द व्हाइट फेस, १९४३), विल्यम जी. स्मिथ, कर्टिस ल्युक्स, जॉर्ज वायली हेंडरसन, बिलार्ड सॅव्हॉय, विलार्ड मोटले ह्या कादंबरीकारांना रिचर्ड राइटचे शिष्य म्हणता येईल. ओवेन डॉडसनच्या बॉय ॲट द विंडो (१९५१) व ग्वेंडोलिन ब्रूक्सच्या मॉड मार्था (१९५३), ह्या काव्यमय आत्मचरित्रांची गणना लघुकादंबरीत करता येईल. ॲन पेट्रीच्या द स्ट्रीट (१९४६), कंट्री प्लेस (१९४७) आणि द नॅरोज (१९५३) पैकी पहिल्या दोन कादंबऱ्या वर्णसंघर्षावर आहेत. विल्यम डेंबी (बीटलक्रीक १९५०, द कॅटॅकूम्बस, १९६५), पॉली मार्शल (ब्राउन गर्ल, ब्राउन स्टोन्स, १९५९), जॉन ए. विल्यम्स (सिसि, १९६३), विल्यम केली (ए डिफरंट ड्रमर, १९६३), अर्नेस्ट गेन्स (कॅथेरीन कार्मियर, १९६४) हेही प्रसिद्ध कादंबरीकार आहेत. ली रॉय जोन्सच्या द सिस्टिम ऑफ दान्तेज हेल (१९६५) ह्या कादंबरीमध्ये निग्रो घेटोचा दान्तेच्या नरकाशी संबंध जुळवलेला दिसतो परंतु जोन्सचा ‘काळा राष्ट्रवाद’ त्याच्या कवितेत व नाटकांत जास्त दिसून येतो.

मार्टिन ल्यूथर किंगचा १९६८ साली खून झाल्यानंतर निग्रोंचा मवाळ विचारप्रणालीवरचा विश्वास उडाला आणि निग्रो तरूण ‘ब्लॅक मुस्लिम’ किंवा बॉबी सीलने स्थापन केलेल्या ‘ब्लॅक पँथर’ सारख्या दहशतवादी संघटनेकडे वा स्टोकले (कार) मायकेल व रॅप ब्राउनसारख्यारक्तरंजित क्रांतीचा संदेश देणाऱ्या तरुण पुढाऱ्यांकडे वळाला. ‘ब्लॅक इज ब्यूटिफूल’ म्हणजे ‘काळा रंगच सुंदर’ हे ब्रीदवाक्य व बंदुकीच्या गोळीवर विश्वास, ह्या तत्त्वाचा पुरस्कार निग्रो लेखकांनी करण्यास सुरुवात केली. ह्यांत ‘पुलित्झर प्राइझ’ मिळविणारी ग्वेंडोलिन ब्रुक्स (‘ॲनी ॲलन’-कथाकाव्य-१९५०, ‘इन द मक्का’, १९६८) जॅझ कवी टेड जोन्स व मार्गारेट वॉकर–जिला १९६० च्या दशकातील विद्रोही कवींची माता मानतात – ह्यांचा समावेश होतो. ह्या तरुण नवीन लेखकांनी गोऱ्यांची वाङ्‌मयीन मूल्ये झुगारून देऊन निग्रोंच्याच जीवनावर व निग्रोंसाठीच लिहिण्यास सुरुवात केली व अशा रीतीने ब्लॅक लिटरेचर, ब्लॅक पोएट्री आणी ब्लॅक थिएटर (कृष्णवर्णीयांनी कृष्णवर्णीयांसाठीच लिहिलेली कादंबरी, कविता व नाटक इ.) जन्मास आली. यांपैकी ब्लॅक पोएट्रीब्लॅक थिएटर जास्त गाजलेले आहे.

ब्लॅक पोएट्री : हे सर्व कवी विद्रोहाची व क्रांतीची भाषा बोलणारे आहेत. निकी जोव्हान्नी ह्या कवयित्रीने (हिची ‘निकी-रोझा’ ही कविता फार प्रसिद्ध आहे) म्हटले आहे की, ‘लढाऊ वीर, कवी व जनता ह्यांत कसलाच फरक नाही’. जॉन इकेक्स पाश्चात्त्य संस्कृतीची ‘पाश्चात्य सिफीलिस संस्कृती’ म्हणून टर उडवितो. ज्यून जॉर्डन ह्या कवयित्रीने गोऱ्यांची निग्रोबद्दलची भावना ‘जॉर्ज वॉशिंग्टन हा फार मोठा माणूस, त्याने माझ्या बापाला फक्त एक डुक्कर देऊन विकत घेतला’ ह्या दोन ओळींत व्यंजोक्तीने स्पष्ट केली. जेम्स इमॅन्युएल ‘ब्लॅक मुस्लीम’ आणि स्टोकले मायकेलचे बंदुकीच्या गोळीचे तत्त्वज्ञान कवितांमधून सांगतो. गील स्कॉट-हेरनच्या स्मॉल टॉक ॲट वन ट्‌वेंटिफिफ्थ अँड लेनॉक्स ह्या संग्रहातून आणि डॉन लीच्या तिन्ही काव्यसंग्रहातून (ब्लॅक प्राइड, थिंक ब्लॅक, डोन्ट क्राय, स्क्रीम) क्रोध ओसंडून वाहतो, तर मे जॅक्सन ‘गोऱ्यांना मारा’ हे उघडपणे सांगते. क्रोध व द्वेष ह्यांबरोबर काळा रंग सुंदर व अभिमानास्पद आहे हे मारी एव्हंझ आय एम ए ब्लॅक वूमन ह्या संग्रहातून स्पष्ट करते. डेव्हिड हेंडरसनच्या द मेअर ऑफ हारलेम ह्या काव्यसंग्रहाची भाषा आफ्रिकन संस्कृतीतील टोळ्यांच्या मंत्रासारखी वाटते. ली रॉय जोन्स हा लघुनिबंधकार, नाटककार व कवी या काळ्या राष्ट्रवाद्यांच्या आघाडीवरचा नायक आहे. त्याच्या प्रिफेस टू ए ट्‌वेंन्टी व्हॉल्यूम सुइसाइड नोट (१९६१), द डेड लेक्चरर (१९६४) ह्या कवितासंग्रहांतून व होम (१९६७) ह्या निबंधसंग्रहातून क्रोधाचे व द्वेषाचे स्फुल्लिंग उडताना दिसतात. ह्या कवीने भाषेचेही स्वरूप बदलून टाकले. ‘जी माझ्या लोकांची रस्त्यावरची, दररोजच्या व्यवहारांतील भाषा आहे तीच माझ्या कवितेची भाषा’ असे तो म्हणतो. म्हणूनच ह्याच्या व इतर तरुण कवींच्या विद्रोही कवितेत अश्लील शब्दांची, प्रतिमांची, प्रतीकांची रेलचेल असते. ‘ब्लॅक इंग्लिश’ म्हणजे–कृष्णवर्णीयांची इंग्रजी–या नावाने आळखली जाणारी भाषा ही अशिक्षित लेखकांची नसून, ती गोऱ्या संस्कृतीविरूद्ध बंडाची नवीन भाषा तर आहेच, शिवाय ढोंगी सभ्यतेचा बुरखा फाडण्याचेही हे एक अमोघ शस्त्र आहे. ह्या जिवंत ‘कृष्णवर्णीय इंग्रजी’ मुळे अमेरिकन इंग्रजी भाषेचे सौष्ठव आणि विपुलता वाढली असे म्हणावे लागेल.


ब्लॅक थिएटर : काव्याप्रमाणे नाटकातही निग्रोंनी गोऱ्यांचे समीक्षावर्चस्व झुगारून दिले आहे. गार्लंड अँडरसनच्या अपिअरन्सेस (१९२५) पासून ते लोरेन हॅन्सबरीच्या ए रेझीन इन द सन (१९५९) पर्यंत निग्रोंनी लिहिलेली नाटके तसेच ही दोन्ही नाटके बरीच गाजली. गोऱ्यांबरोबर निग्रोंनी बरोबरीने सक्रिय भाग घेण्याच्या कालखंडात, गोऱ्या प्रेक्षकांनी व समीक्षकांनी आपलीच मूल्ये निग्रोंच्या नाटकाला लावली. या काळात रूडॉल्फ फिशर (कांजूर मॅन डाइज, १९३५), लँग्‌स्टन ह्यूझ (म्युलॅटो १९३५ मदर अँड चाइल्ड, १९६१), विल्यम ब्रँच (ए मेडल फॉर विली, १९५१), विल्यम मकाय् (रेक्विअम फॉर ब्रदर एक्स, १९६४), लॉफ्टन मिचेल (स्टार ऑफ द मॉर्निंग), इलेन जॅक्सन (टो जॅम), चार्ल गॉर्डन (द ब्रेकआउट, १९६९), लॉन एल्डर थर्ड (चॅरेड्‌स ऑन ईस्ट फोर्थ स्ट्रीट), डग्लस टर्नर वॉर्ड (ब्रदरहूड), इ. अनेक निग्रो नाटककारांनी अमेरिकन संस्कृती व वाङ्‌मयीन मूल्ये ह्यांच्या चौकटीत राहून आपली टीकास्त्रे सोडली. ‘ब्लॅक थिएटर’चा आघाडीवरचा नाटककार म्हणजे ली रॉय जोन्स. डचमन (१९६४) हे त्याचे विशेष प्रसिद्ध नाटक. तत्पूर्वी त्याने द बॅप्टिझम आणि द स्लेव्ह ही दोन नाटके १९६४ मध्येच लिहून स्टेजवर आणली होती. द स्लेव्हमधील वॉकर ह्या नायकाच्या समस्या जोन्सच्या आयुष्यातील समस्याच होत असे म्हणतात. नाटकाच्या शेवटी वॉकर निराशवादाला शरण जातो ह्याउलट डचमन मध्ये जोन्सचा स्वाभिमान व गोऱ्या संस्कृतीविरुद्ध जास्त आक्रमक पवित्रा दिसून येतो. इथेही क्ले हे पात्र जोन्सचेच दुसरे रूप आहे असे म्हणतात. कथानक वरवर गोऱ्या-काळ्या संघर्षावर आहे असे दिसते. परंतु दुसऱ्या पातळीवर बायबलची ‘ओरिजिनल सिन’ (देवाच्या आज्ञेविरुद्ध फळ खाऊन आदम आणि ईव्ह संभोग करतात हे पाप) ही कल्पना, वा पुरुष-प्रकृतीमधील संघर्ष (लूला क्ले ह्याला ठार करते आणि पुन्हा क्लेसारख्या दिसणाऱ्या नवीन पुरुषांकडे वळते) ही कल्पनाही नाटकात दिसू शकते. हे जोन्सचे एक यशस्वी नाटक आहे. डचमनपासून जोन्सला गोरे साहित्यिक व जनता ‘काळा जातीयवादी’ म्हणू लागले. त्याच्या टॉयलेट (१९६४) ह्या नाटकाने तर गोरी अमेरिका जास्तच चिडली. नाटक घडते ते एका निग्रो मुलांच्या हायस्कूलच्या मुतारीत. कॅरोलिस नावाच्या गोऱ्या मुलाने फूट्स नावाच्या काळ्या मुलाला प्रेमपत्र लिहिलेले असते. म्हणून कॅरोलिसला मुतारीत बोलावून फूट्स व त्याचे इतर काळे सोबती खूप मारतात व जातात परंतु फूट्स परत येतो व कॅरोलिसच्या गळ्यात गळा घालून त्याला उठवून मदत करण्याचा प्रयत्न करतो. इथे नाटक संपते. जोन्सने बरीचशी एकांकी नाटके लिहिली आहेत. त्याची नाटके बरीचशी प्रचारी थाटाची असतात. अलीकडे तो ‘ब्लॅक मुस्लिम’ संघटनेचा सदस्य झाला असून त्याने ‘इमामू अमीरी बराका’ हे नवे मुस्लिम नाव धारण केले आहे.

बेन कॉल्डवेल जोन्ससारखाच काळ्या राष्ट्रवादाचा व बंदुकीचा उपयोग करण्याचा प्रचार करणाऱ्यांपैकी आहे. त्याची ऑल व्हाइट कास्टप्रेअर मिटिंग ऑर, द फर्स्ट मिलिंटट मिनिस्टर (१९६९) ही नाटके प्रसिद्ध आहेत. रॉन मिल्नरचे हू हॅज गॉट हिज ओन हे शहरी निग्रो कुटुंबाच्या प्रश्नावर लिहिलेले नाटक आहे. द वॉर्निंग–ए थीम फॉर लिंडा (१९६९) ह्या नाटकातून मिल्नरने निग्रो स्त्रीला नुसतीच उपभोग्य वस्तू मानू नका, हा संदेश दिला आहे. एड बुलिन्सने इन द वाइन टाइम, क्लाराज ओल्ड मॅन इ. नाटकांद्वारे काळ्यांची ‘रस्त्यावरची संस्कृती’ म्हणजे वेश्या, तिचा दलाल, जुगारी, चोर, डाकू या साऱ्यांना माणुसकी व मान्यता प्राप्त करून दिली. दबून बसलेल्या मृत्यूची सावट, हे या नाटकांचे वैशिष्ट्य. जंटलमन कॉलर (१९६९) मध्ये बुलिन्सने अमेरिकन जीवनाचे रितेपण आणि वांझोटेपण दाखविले आहे.

आज ब्लॅक लिटरेचरला मान्यता मिळाली आहे परंतु सुरुवातीस लिहिल्याप्रमाणे ‘सत्त्वाचा’ शोध व प्रेम–द्वेषाचे द्वंद ह्या चक्रव्यूहातून निग्रो लेखक अजून बाहेर आला आहे, असे वाटत नाही.

वानखडे, म. ना.