राब्ले, फ्रांस्वा : (१४९४ ?– बहुधा ९ एप्रिल १५५३). थोर फ्रेंच मानवतावादी आणि साहित्यिक. जन्म शीनाँजवळ, दव्हिन्येर येथे. त्याचे वडील श्रीमंत जमीनदार होते आणि शीनाँ येथे ते वकिलीचा व्यवसायही करीत. राब्लेने आरंभी काही काळ कायद्याचा अभ्यास केला, असे दिसते. त्यानंतर १५१० च्या सुमारास ख्रिस्ती धर्मातील फ्रान्सिस्कन पंथाच्या मठात त्याने प्रवेश घेतला. बहुधा १५२० मध्ये त्याने दीक्षा घेतली. मठाची शिस्त मोडून ग्रीक ग्रंथांचा अभ्यास केल्यामुळे मठाधिकाऱ्यांचा त्याच्यावर रोष झाला होता. त्या वेळी मायझेचा बिशप जोफ्र्‍वा देस्तिसाक ह्याने त्याला अधिक सहिष्णू अशा बेनिडिक्टिन पंथाच्या मठात प्रवेश देवविला. पुढे संबंधित धर्माधिकाऱ्यांच्या परवानगीवाचून राब्ले तेथून बाहेर पडला. १५३० मध्ये माँपेल्ये विद्यापीठातून वैद्यकशास्त्राची पदवी त्याने घेतली आणि तेथूनच १५३७ मध्ये, त्या शास्त्रातली डॉक्टरेट त्याने मिळविली.

फ्रांस्वा राब्लेलीआँ येथील सरकारी रुग्णालयात राब्ले काही काळ डॉक्टर होता. पॅरिसचा बिशप (हा पुढे कार्डिनल झाला) झां द्यू बेले ह्याचा डॉक्टर म्हणूनही त्याने काम केले होते. झां द्यू बेले ह्यानेच उचित अनुज्ञेवाचून बेनिडिक्टिन धर्मपंथ सोडण्याच्या गैरवर्तणुकीची माफी पोपकडून राब्लेला मिळवून दिली. त्यानंतर कार्डिनल द्यू बेले जेथे ॲबट होता, अशा सँ-मोर-ले-फोसे येथील मठात त्याने प्रवेश मिळविला. तेथे त्याला वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली होती. पॅरिस येथे त्याचे निधन झाले.

फ्रांस्वा राब्ले ह्या आपल्या नावातील अक्षरांची सरमिसळ करून त्याने आल्कोफ्रिबास नास्ये हे टोपण नाव तयार केले आणि त्याच नावाने पाँताग्रुएल ही जगभर गाजलेली आपली कादंबरी लिहिली (प्रकाशन १५३२). वीरविडंबनात्मक (मॉक्-हिरॉइक) रोमान्सच्या चौकटीत राब्लेने आपल्या खास विनोदप्रचुर शैलीने धर्म, तसेच तत्कालीन न्यायालये, शिक्षणपद्धती इत्यादींवर हल्ला चढविला. ह्या कादंबरीस मोठे यश प्राप्त झाले. त्यानंतर १५३० साली राब्लेने गार्गांत्वा ही दुसरी कादंबरी प्रसिद्ध केली. तीत सॉरबॉनची शिक्षणपद्धती आणि तेथील बुरसटलेपणा ह्यांवर त्याने परखड टीका केली होती. १५४६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्येर लीव्ह्रमध्ये त्याने त्याच्या विलक्षण कल्पनाशक्तीने प्रवासकथांच्या माध्यमातून नानाविध विषयांना स्पर्श केला. त्यांतील विवाहसंस्थेवरील त्याची मते विशेष विचारप्रवर्तक ठरली आहेत. राब्लेच्या मृत्युनंतर, १५६४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या सांक्येम लीव्ह्र ह्या पुस्तकाचा कर्ता म्हणून राब्लेचे नाव घेतले जात असले, तरी ते त्यानेच लिहिले किंवा कसे, हा प्रश्न वादग्रस्त आहे. 

राब्लेने निर्मिलेल्या व्यक्तिरेखा अजरामर झालेल्या आहेत. पाँताग्रुएल हे मुळात एक राक्षसाचे नाव. ते आपल्या एका वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखेसाठी राब्लेने उपयोगात आणले. पाँताग्रुएल हा गार्गांत्वाचा पुत्र. त्याची ताकद प्रचंड आणि खादाडपणाही अफाट. पाँताग्रुएल विविध विद्यापीठे पाहण्यासाठी जो दौरा करतो, त्याच्या निमित्ताने तसेच त्याचे वडील गार्गांत्वा ह्यांनी त्याला पत्रांतून केलेल्या शिक्षणविषयक मार्गदर्शनातून राब्लेला समकालीन शैक्षणिक वातावरणावर आपल्या उपरोधाचे हत्यार चालवता आले त्याचप्रमाणे आपले शिक्षणविषयक विचार आणि आदर्शही स्पष्ट करता आले. हे आदर्श प्रबोधनाचे आहेत. गार्गांत्वाचा आकार व आहारही राक्षसासारखा परंतु पाँताग्रुएल आणि गार्गांत्वा ह्यांचे आकार आणि आहार, विशाल बुद्धिमत्ता आणि कधीच न शमणारी जिज्ञासा ह्यांचे द्योतक आहेत. पाँताग्रुएल हा यूटोपियानामक देशाचा रहिवासी. सर टॉमस मोर ह्याच्या यूटोपिया ह्या ग्रंथाचे संस्कार राब्लेवर दिसून येतात. पान्युर्ज ह्या कमालीच्या धर्त पात्राची योजना पाँताग्रुएलचा साथी म्हणून करण्यात आलेली आहे. यूटोपिया देशावर दिपसॉदांनी केलेल्या आक्रमणाला यशस्वीपणे तोंड देऊन दिपसॉदांचा देश जिंकण्याच्या कामी पान्युर्जच्या चातुर्याचा आणि कुशल डावपेचांचा पाँताग्रुएलला उपयोग होतो. पान्युर्जच्या व्यक्तिरेखेतून राब्लेला निखळ विनोदनिर्मितीही करता आलेली आहे. राब्लेनिर्मित व्यक्तिरेखांत प्रतीकात्मकताही आहे. गार्गांत्वा आणि पाँताग्रुएल ही प्रबोधनाच्या विचारधारेची प्रतीके पान्युर्ज हे चातुर्याचे प्रतीक. त्याचप्रमाणे एपिस्तेमाँ, यूस्येनीझ आणि कार्पालिम ही पात्रे अनुक्रमे ज्ञान, सामर्थ्य आणि गती ह्यांची प्रतीकात्मक रूपे होत. राब्लेने वर्णिलेल्या लाबे द तेलॅम ह्या मठात मोकळे सहजीवन जगणारे स्त्रीपुरुष दिसतात. ‘फे स क व्हुद्रा’ म्हणजे मनसोक्त वागा ह्या राब्लेच्या बोधवाक्याप्रमाणे ते वागतात आणि आपला विकास करून घेतात. 

राब्लेचे शिक्षणविषयक विचारही फार मोलाचे ठरले आहेत. पढीक विद्वत्तेपेक्षा अनुभवजन्य ज्ञानाला तो महत्त्व देतो. सर्वस्पर्शी असावे, वाचन व निरीक्षण ह्यांच्यामध्ये समतोल असावा. मानसिक विकासाइतकेच शारीरिक शिक्षण, आहार, आरोग्य ह्यांनाही महत्त्व आहे, ही त्याची मते आजही मान्य होऊ शकतात.

 राब्लेच्या कादंबऱ्यांत रचनेची एकसंधता आढळत नाही. त्याची भाषा अनेकदा रांगडी, ग्राम्य, अश्लीलतेकडे झुकणारी वाटते. तथापि त्याची सर्जनशील कल्पनाशक्ती आणि प्रतिभाशाली विनोदनिर्मिती ह्यांमुळे त्याच्या कादंबऱ्यांना अमाप जागतिक लोकप्रियता मिळाली. बाल्झॅक, फ्लोबेअर ह्यांसारख्या थोर फ्रेंच साहित्यिकांवरील राब्लेचा प्रभाव स्पष्ट जाणवतो.

राब्लेला इंग्लंडमध्ये विशेष लोकप्रियता मिळाली. सर टॉमस युरकार्टने राब्लेच्या पहिल्या दोन कादंबऱ्या १६५३ मध्ये इंग्रजीत अनुवादिल्या आणि तिसरीचे भाषांतर १६९३ मध्ये केले.

संदर्भ : 1. Colema, Dorothy G. Rabelais : A Critical Study in Prose Fiction, Cambridge, 1971.

    2. Eldrige, Paul, Rabelals, the Great Storyteller, 1971.

    3. Frame, Donal M. Francois Rabelais, Harcourt, 1977.

   4. France, Anatole, Rabelais, 1928, Reprint 1973.

   5. Greene, Thomas M. Rabelais : A Study in Comic Courage, Prentice-Hall, 1970.

   6. Keller, A. C. The Telling of Tales in Rabelais, 1965.

   7. Putnam, Samuel, Francois Rebelais : Man of the Renaissance, 1929, Reprint, 1973.

  8. Sereech, M. A. The Rebelaisian Marriage, 1956.

  9. Plattard, Jean, The Life of Francois Rabelais, 1930.

टोणगावकर, विजया