द्यूआमेल, झॉर्झ : (३० जून १८८४–१३ एप्रिल १९६६). सुप्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार. सुरुवातीला त्याने काही कविता व नाटके लिहिली. साहित्यसमीक्षात्मक लेखनही केले. पॉल क्लोदेल ह्या फ्रेंच कवी–नाटककाराचे महत्त्व जाणणाऱ्या पहिल्या काही समीक्षकांत द्यूआमेलची गणना होते परंतु त्याची मूळ प्रकृती कादंबरीकाराची.

द्यूआमेलचा जन्म पॅरिसला गरीब मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. स्वतःच्या हिंमतीवर शिक्षण घेत त्याने १९०९ साली वैद्यकीय पदवी घेतली. पूर्ववयात कवी एमील व्हरहारेन व शार्ल हील्द्राक यांच्यामुळे त्याला लेखनाची प्रेरणा मिळाली काही लेखकांनी एकत्र येऊन पॅरिसजवळील क्रेतय येथे साहित्यिक सहजीवनाचा प्रयोग केला पण हे सांधिक जीवन या स्वतंत्र बुद्धीच्या लेखकांना न मानवल्यामूळे तसेच आर्थिक दृष्ट्याही हा प्रयोग चालवणे अवघड झाल्यामुळे मैत्रीचे संबंध कायम ठेवून ते पांगले.

द्यूआमेलच्या कविता व नाटके महायुद्धपूर्वकालात प्रसिद्ध झाली. पहिल्या महायुद्धाच्या काळात शल्यचिकित्सक या नात्याने काम करताना त्याने लष्करी रुग्णालयातील अत्यंत भीषण व अंगावर शहारे आणणारी दृश्ये पाहिली. परिणामी त्याच्या जीवनानुभवाला अधिक सखोलता व तीव्रता प्राप्त झाली. ला व्ही दे मार्तीर (१९१७, इं. भा.द न्यू बुक ऑफ मार्टर्स, १९१९) आणि सिव्हिलिझासिआँ १९१४–१७ (१९१८). ह्या दोन पुस्तकांत युद्धकाळातील त्याचे अनुभव नमूद झालेले आहेत. लष्करी रुग्णालयातील अत्यंत गलिच्छ व यातनामय वातावरणाचे विलक्षण प्रत्ययकारी चित्र रंगवलेल्या सिव्हिलिझासिआँला गाँकूर पारितोषिक मिळाले.

त्याने १९२० नंतर कादंबऱ्या, निबंध, संकीर्ण ग्रंथ असे विपुल लेखन केले. त्याच्या लेखनात विविध सामाजिक–नैतिक प्रश्नांचा त्याने ऊहापोह केला. उच्च सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचा त्याने प्रामाणिक प्रयत्न केला.

व्ही ए आव्हांत्यूर द् सालाव्हँन ( १९२०–३२, इं. भा. सालाव्हॅन) व ला क्रॉनीक दे पास्किए (१० खंड, १९३३–४५, इं. भा. द पास्किए क्रॉनिकल्स) या कादंबऱ्यांतील प्रत्येक खंड म्हणजे एक स्वतंत्र कादंबरी आहे. या खंडशः प्रसिद्ध झालेल्या दोन कादंबऱ्या वर त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. पहिल्या दीर्घ कादंबरीत सालावँ या दुबळ्या, स्वयंकेंद्रित, भावनाप्रधान व्यक्तीची संतांच्या स्थितिप्रत जाण्याची व असामान्यता मिळविण्याची धडपड रेखाटली आहे. दुसरीत पास्किए कुटुंबाच्या वृत्तांताच्या निवेदनातून एकाेणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील व विसाव्या शतकाच्या आरंभीच्या समाजजीवनाची व कुटुंबजीवनाची साक्ष आहे. द्यूआमेलची साक्ष काहीशी साक्षेपी शास्त्रज्ञाची असली, तरी कादंबरीतून त्याचा जीवनाकडे सहानुभूतीने पाहण्याचा दृष्टिकोण प्रकट झालेला आहे. मानवी जीवनातील दुःखांविषयीची उत्कट सहानुभूती ही द्यूआमेलच्या लेखनामागील एक महत्त्वाची प्रेरणा आहे.

त्याची फ्रेंच अकादमीवर १९३५ मध्ये नियुक्ती झाली. पॅरिसजवळील व्हाल्‌माँदॉइस येथे तो निवर्तला.

टोणगावकर, विजया