प्लाइस्टोसीन काळातील मॅस्टोडॉनाचे कल्पित चित्र मॅस्टोडॉन : नष्ट झालेले हत्तीसारखे प्राणी. या सस्तन प्राण्यांचा समावेश प्रोबॉसिडिया गणातील मॅस्टोडोंटिडी (मॅमटिडी) कुलात करतात.

सामान्यपणे हे दिसायला हत्तीसारखे होते तथापि यांचे शरीर हत्तीपेक्षा लहान पण अवजड असून खांद्यापर्यंतची उंची कमी (जास्तीत जास्त २·८ मी.) होती. यांची कवटी हत्तीच्या कवटीसारखी पण बसकी व चापट होती, तर कान हत्तीच्या कानांपेक्षा लहान होते. यांचे पाय आखूड, मजबूत व खांबासारखे आणि सोंड लांब होती. ⇨ मॅमथांच्या मानाने यांची श्रोणी (कटी) अतिशय रुंद होती. मॅस्टोडॉनांच्या अंगावर लांब, तांबूस तपकिरी केस असत. यांचे दात वैशिष्ट्यपूर्ण होते, मात्र त्यांची रचना हत्तीच्या दातांच्या रचने एवढी गुंतागुंतीची नव्हती. यांच्या ठराविक कृंतक (कुरतडण्यासाठी असलेल्या) दातांचे रूपांतर मोठ्या सुळ्यांत (हस्तिदंतांत) झालेले होते. हे सुळे लांब (कधीकधी ३ मी.), समांतर वाढलेले व वरील (क्वचित खालील) बाजूस वळलेले असत. आधीच्या काळात खालील व वरील जबड्यांत सुळ्यांच्या दोन जोड्या असत. नंतरच्या प्राण्यांत वरचे सुळे टिकून राहिले, तर खालचे सुळे अविशष्ट रूपात राहिले. काहीमध्ये सुळे पिळवटलेले, तर इतर काहींत ते रुंद होऊन चमच्यासारखे झालेले असत.जबड्यातील प्रत्येक बाजूस वरती सहा आणि खाली पाच मोठ्या दाढा असत. दाढांची दंतशीर्षे बुटकी व दंतमूले मजबूत असत. दाढांच्या चर्वणक पृष्ठावर पुष्कळ (४५ पर्यंत) दंताग्रे (उंचवटे) असत. या दंताग्रांचा आकार शंकूसारखा किंवा स्तनाग्रासारखा होता. यावरूनच क्यूव्ह्ये यांनी स्तन व दात या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून या प्राण्यांना ‘मॅस्टोडॉन’ हे नाव दिले आहे.

उत्तर गोलार्धातील बहुतेक जंगलांमध्ये यांचे कळप होते. या चरणाऱ्या प्राण्यांची उपजीविका वनस्पतींची पाने, साल, मुळे व कंद यांवर होत असे. शंकुमंत (उदा., स्प्रूस, हेमलॉक) वृक्षांची पाने व साल त्यांना विशेष आवडत असत. इओसीन (सु. ५·५ ते ३·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) व ऑलिगोसीन (सु. ३·५ ते २ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळांतील हत्तींच्या पूर्वजांपासून आदिम मॅस्टोडॉन (उदा., पॅलिओमॅस्टोडॉन) मायोसीनच्या प्रारंभी (सु. २ कोटी वर्षांपूर्वी) ईजिप्तमध्ये अवतरले. नंतरच्या काळात त्यांच्यात विविधता येत गेली व उत्तर गोलार्धात सर्वत्र व दक्षिण अमेरिकेतही (उदा., बोलिव्हिया, अर्जेंटिना) त्यांचा प्रसार झाला. प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) काळात उत्तर अमेरिका वगळता इतर प्रदेशांतील मॅस्टोडॉन नष्ट झाले. उत्तर अमेरिकेत मात्र हे प्राणी दहा ते आठ हजार वर्षांपूर्वीपर्यंत होते.

मॅस्टोडॉनांचे जीवाश्म (शिळारूप झालेले अवशेष) चांगले टिकून राहिलेले असून ते सायबीरिया, पाकिस्तान, जपान, चीन, भारत, पर्शिया, ईजिप्त व दोन्ही अमेरिका येथे आढळले आहेत. सायबीरियात मोठ्या प्रमाणात मॅस्टोडॉन (मॅमथ) यांचे दात बर्फाने गाडले गेलेले असून ते ‘मृत हस्तिदंत’ म्हणून खणून काढण्यात येतात. भारतात हरद्वारनजिकच्या शिवालिक टेकड्यांत मॅस्टोडॉनांच्या कवट्या, जबडे आणि दात यांचे चांगले जीवाश्म आढळले (१८३९). ⇨ शिवालिक संघातील धोक पठाण, नागरी आणि पिंजोर या समुदायांतील खडकांमध्ये मुख्यत्वे मॅस्टोडॉन हसनोती आणि मॅ. शिवालेन्सिस या जातींचे जीवाश्म आढळले आहेत.

यूरोपातील मॅ. अंगुस्तिडेन्स व उत्तर अमेरिकेतील मॅ. अमेरिकॅनस या जाती महत्त्वाच्या असून मॅ. अमेरिकॅनस जातीविषयी सर्वाधिक माहिती मिळाली आहे. हिच्यातील प्राण्यांना सुळ्यांची एकच जोडी होती. हे प्राणी प्लाइस्टोसीन हिमयुगातही टिकून राहिले. या हिमयुगानंतरच्या दलदलींमध्ये आणि पीट-रुतणांमध्ये यांचे अवशेष आढळतात. उत्तर अमेरिकेच्या सर्व भागांत म्हणजे उत्तरेच्या विनिपेग सरोवर, ब्रिटिश कोलंबिया, नोव्हास्कोशा आणि अलास्का यांसारख्या भागांतही हे अवशेष आढळले आहेत. ⇨ किरणोत्सर्गी कार्बन कालनिर्णय पद्धतीने यांचे वय काढण्यात आले आहे. त्यावरून हे प्राणी या प्रदेशांत ८ ते १० हजार वर्षांपूर्वीपर्यंत होते, असे अनुमान करता येते. मॅस्टोडॉनांच्या विनाशाची कारणे अजून समजलेली नाहीत. तथापि उत्तर अमेरिकेतील यांच्या अवशेषांबरोबर लोणारी कोळसा व खापरांचे तुकडे आढळले आहेत. त्यावरून त्या काळातील आदिमानवाने यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली असावी व मॅस्टोडॉनांच्या विनाशाचे हे एक कारण असावे, असे काहींचे मत आहे.

पहा : पुराप्राणिविज्ञान मॅमथ स्तनी वर्ग.

इनामदार, ना. भा.