नेक्टूरस (नेक्टूरस मॅक्युलोसस)

नेक्टूरस : पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या उभयचर (पाण्यात व जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गातील यूरोडेला गणातील प्रोटीइडी कुलात या प्राण्याचा समावेश होतो. या कुलातील प्राण्यांचे रूपांतरण (प्रौढावस्था प्राप्त होताना रूप व संरचना यांत होणारे बदल) पूर्ण न झाल्यामुळे ते आयुष्यभर डिंभावस्थेतच (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेतच) राहतात आणि या अवस्थेतच त्यांना लैंगिक परिपक्वता प्राप्त होते [→ चिरडिंभता]. यांना बाह्य क्लोमांच्या (कल्ल्यांच्या) तीन जोड्या असून त्या आयुष्यभर टिकणाऱ्या असतात. वयात आलेल्या प्राण्यांना श्वसनाकरिता फुप्फुसे व क्लोम ही दोन्ही असतात.

नेक्टूरसाच्या एकंदर पाच जाती असून त्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पूर्व भागातील नद्यांत व कॅनडातील सरोवरांत आढळतात. नेक्टूरसाच्या सामान्य जातीचे शास्त्रीय नाव नेक्टूरस मॅक्युलोसस आहे. याची लांबी ३० सेंमी. पर्यंत असते. डोके आणि शरीर वरून खाली चपटे असते शेपटी दोन्ही बाजूंनी बरीच दबलेली असून तिची लांबी प्राण्याच्या एकंदर लांबीच्या १/३ असते. शेपटीवर जाड पृष्ठीय (पाठीवरील पर) आणि अधर (खालचा) पक्ष असतो. नाकाड निमुळते असते डोळे लहान असून त्यांना पापण्या नसतात बाह्य क्लोमांच्या तीन जोड्या असतात. पायांच्या दोन जोड्या असतात पाय आखूड असले तरी मजबूत असून प्रत्येकावर चार बोटे असतात. कातडी गिळगिळीत असून तपकिरी रंगाची असते आणि तिच्यावर काळसर ठिपके व डाग असतात. नर व मादी दिसायला सारखीच असतात.

हे प्राणी रात्रिंचर असून काहीसे सुस्त असतात. दिवसा ते पाण्याच्या तळाशी पाणवनस्पतींत दडून राहतात आणि रात्री भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतात. ते पोहतात किंवा तळावर सरपटत जातात. साधारण मोठे क्रस्टेशियन (कवचधारी) प्राणी, लहान मांसे, माशांची अंडी, कृमी, कीटक आणि बेडूक हे यांचे भक्ष्य होय. हे प्राणी अतिशय खादाड आहेत.

एप्रिल व मे महिन्यांत मादी अंड घालते. या अंड्यांचे निषेचर (फलन) मादीच्या शरीरातच झालेले असते. अंड्यातून डिंभ बाहेर पडतो.

जोशी, लीना