पालुडान – म्यूलर, फ्रिद्रिक : (७फेब्रुवारी १८०९ -२८ डिसेंबर १८७६). डॅनिश कवी. एका धर्मोपदेशकाच्या कुटुंबात केर्टमिन ह्या शहरी त्याचा जन्म झाला. १८३५ मध्ये कोपनहेगन विद्यापीठातून तो कायद्याचा पदवीधर झाला. त्याआधीच Danserinden (१८३३) ह्या आपल्या कथाकाव्यामुळे यशस्वी कवी म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झालेली होती. ह्या कथाकाव्याचे जर्मन भाषांतरही झालेले होते (१८३५). त्याच्या ह्या काव्यावर स्वच्छंदतावादाचा –विशेषतः ह्या संप्रदायातील विख्यात इंग्रज कवी बायरन ह्याचा – प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. तथापि १८३७ मध्ये एका गंभीर मानसिक संघर्षाच्या व आजारपणाच्या अनुभवातून गेल्यानंतर त्याच्या जीवनविषयक दृष्टिकोणातच परिवर्तन घडून आले. तो कडवा नीतिवादी झाला. समाजापासून दूर राहून एकांतवासात जीवन व्यतीत करणे त्याने पसंत केले. ह्या परिवर्तनाचा प्रभाव Adam Homo (३ खंड, १८४१ – ४८) ह्या त्याच्या प्रसिद्ध महाकाव्यातून प्रत्ययास येतो. ह्या महाकाव्याचे बारा सर्ग आहेत. आदम होमो हा त्याचा  नायक. एका धर्मोपदेशकाचा हा मुलगा. ईश्वरविद्येचा (थिऑलजी) अभ्यास केलेला हा तरुण सामाजिक यशाच्या मागे लागतो. आल्मा ह्या आपल्या साध्याभोळ्या प्रेयसीचा त्याग करून तो एका जमीनदाराच्या मुलीशी विवाहबद्ध होतो. सामाजिक प्रतिष्ठेच्या पायऱ्या चढून तो उच्च स्थानी जातो तथापि एक माणूस म्हणून त्याचा अधःपातच होतो आणि आल्माचे निष्ठावंत प्रेमच त्याच्या आत्म्याचा उद्धार करते, असे पालुडान-म्यूलरने दाखविले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील डॅनिश जीवनाचे उपरोधपूर्ण चित्रण ह्या महाकाव्यात आलेले आहे. त्याच्या अन्य उल्लेखनीय साहित्यकृतींत Venus (१८४१) हे पद्यनाटक, Adonis (१८७४) हे काव्य, Ivar Lykkes Historie (३ भाग, १८६६ – ७३) ही कादंबरी इत्यादींचा अंतर्भाव होतो. वासना आणि विवेक, सुखाभिलाषा आणि विरक्ती तसेच जीवन आणि मृत्यू ह्यांतील संघर्ष त्याच्या काव्यांतून पुन्हा पुन्हा व्यक्त केला गेला आहे. कोपनहेगन येथे तो निधन पावला.

यानसेन, एफ्. जे. बिलेस्कॉव्ह (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.).