बागेसेन, येन्स : (१५ फेब्रु. १७६४ – ३ऑक्टो. १८२६). डॅनिश साहित्यिक. डेन्मार्कमधील कॉर्सर ह्या लहानशा गावी त्याचा जन्म झाला. वयाच्या अठराव्या वर्षी कोपनहेगन येथे ईश्वरविद्येचा अभ्यास करण्यासाठी प्रयाण. तेथे ‘ह्यूमरस टेल्स’ (१७८५, इं.शी) ह्या त्याच्या उपरोधप्रचुर कवितासंग्रहामुळे तो प्रसिद्धी पावला. पुढे त्याने जर्मनी, फ्रान्स व स्वित्झर्लंड ह्या देशांचा दौरा केला. ह्या परदेशप्रवासाचे वर्णन त्याने लँबिरिंथ (१७९२-९३, इं.शी) ह्या आपल्या प्रसिद्ध पुस्तकात केले आहे. जिवंत वर्णने आणि उत्कृष्ट, लवचिक गद्यशैली ह्यांमुळे ह्या ग्रंथाला लौकिक प्राप्त झाला. थोरा (१८१४ – १६) नावाचे एक महाकाव्यही त्याने लिहावयास घेतले होते तथापि ते अपूर्ण राहिले. जर्मन आणि फ्रेंच ह्या भाषांवरही बागेसेनचे प्रभुत्व होते. फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल त्याला फार आकर्षण वाटे. रूसो आणि कांट ह्यांच्याबद्दलही त्याला आदर होता.

बागेसेन हा आरंभी स्वच्छंदतावादाचा पुरस्कर्ता होता परंतु पुढे तो त्या वाङ्मयीन संप्रदायाचा कट्टर विरोधक बनला. हँबगै येथे तो निधन पावला.

यानसेन, एफ्. जे. बिलेस्कॉव्ह (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)