व्हिंटर, क्रिस्त्यान : (२९ जुलै १७९६-३० डिसेंबर १८७६). डॅनिश कवी. पूर्ण नाव रास्मुस व्हीलआस क्रिस्त्यान फेरडिनान. जन्म डेन्मार्कमधील फेन्समार्क येथे. त्याने धर्मशास्त्राची पदवी घेतली. तरुण वयातच तो कविता लिहू लागला. Digte (१८२८) हा त्याचा आरंभीचा काव्यसंग्रह. त्यात ग्रामीण शेतकरी स्त्रियांच्या जीवनाचे चित्रण आहे. त्याने काही प्रेमकविताही लिहिल्या. त्यांवर जर्मन कवी ⇨ हाइन्रिख हाइन (१७९७-१८५६) ह्याच्या नैराश्यमय वृत्तीचा प्रभाव विशेषत्वाने जाणवतो. १८३९ मध्ये एका विवाहित स्त्रीवरील प्रेमाने तो झपाटला होता. १८४८ मध्ये तिच्याशी विवाह करण्यात त्याला यश आले. या प्रेमसंबंधातूनच निर्माण झालेल्या सु. दोनशे प्रेमकवितांचा ‘टू वन अलोन’ (इं.शी.) हा काव्यसंग्रह. डॅनिश काव्यक्षेत्रातील प्रणयकाव्याचा तो आदर्श मानला जातो. उदात्त प्रेमभावना व निसर्ग, हे त्याच्या काव्याचे मुख्य विशेष होत. व्हिंटरने डॅनिश काव्याला एक प्रकारचा तल्लखपणा व नवचैतन्य प्राप्त करून दिले. Hjortens Flugt (१८५५, इं.शी. ‘द फ्लाइट ऑफ द स्टॅग’) हे त्याचे श्रेष्ठ दर्जाचे कथाकाव्य. भ्रमंती करणाऱ्या एका कवीची व्यक्तिरेखा ह्या काव्याच्या केंद्रस्थानी आहे.
यानसेन, एफ्.जे. बिलेस्कॉव्ह (इं.) पोळ, मनीषा (म.)