ब्रांडेस, गिऑर : (४ फेब्रुवारी १८४२ – १९ फेब्रुवारी १९२७). विख्यात डॅनिश समीक्षक. कोपनहेगन शहरी एका ज्यू कुटुंबात जन्मला. कोपनहेगन विद्यापीठात त्याने साहित्य आणि तत्वज्ञान ह्यांचा अभ्यास केला. तेथे असताना डॅनिश तत्त्वचिंतक सरेन किर्केगॉर, इंग्रज विचारवंत जॉन स्ट्यूअर्ट मिल, फ्रेंच समीक्षक सँत – बव्ह व तॅन ह्यांच्या साहित्याच्या वाचनाने तो प्रभावित झाला. किर्केगॉरच्या प्रभावामुळे ब्रांडेस ख्रिस्ती धर्माकडेही आकृष्ट झाला होता. तथापि हे आकर्षण अल्पजीवी ठरले. १८७० मध्ये तॅनच्या साहित्यविचारावर प्रबंध लिहून त्याने डॉक्टरेट मिळविली. त्यानंतर स्कँडिनेव्हियाच्या वैचारिक क्रांतीचा ध्यास घेऊन त्यासाठी प्रागतिक विचारांचा तो प्रखर पुरस्कार करू लागला धर्मविचाराला त्याच्या चिंतनात स्थान उरले नाही. परिणामतः डेन्मार्कमधील जीर्णमतवाद्यांकडून ‘नास्तिक’ म्हणून त्याची हेटाळणी होऊ लागली. १८७१ मध्ये मेन करंट्स इन नाइंटींथ सेंच्यूरी लिटरेचर (इं. भा. ६ खंड, १९०१ – १९०५) ह्या नावाने व्याख्यानमाला गुंफून आधुनिक जीवनातील समस्यांचे प्रत्ययकारी दर्शन घडविणाऱ्या वास्तववादी साहित्यनिर्मितीची आवश्यकता त्याने प्रतिपादन केली. ब्रांडेसच्या वाङ्मययीन विचारांनाही विरोध झाला आणि परिणामतः आवश्यक ती पात्रता असूनही कोपनहेगन विद्यापीठातील सौंदर्यशास्त्राच्या अध्यासनी त्याची नियुक्ती होऊ शकली नाही. व्यथित होऊन ब्रांडेस बर्लिनमध्ये गेला. तेथे त्याने काही काळ वास्तव्य केले (१८७७ – १८८३). तेथील वास्तव्यात आणि तेथून डेन्मार्कला परतल्यानंतर त्याने उत्तम समीक्षात्मक ग्रंथ लिहिले. ह्या ग्रंथात सरेन किर्केगॉर, लूद्व्ही हॉल्बर्ग ह्यांच्यावरील ग्रंथांचा समावेश होतो. ख्यातकीर्त जर्मन समाजवादी फेर्डिनांट लासाल तसेच ब्रिटनचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली ह्यांच्यावरही त्याने ग्रंथलेखन केले.

ब्रांडेसला त्याच्या देशात मोठा विरोध झाला असला, तरी हळूहळू त्याच्या विचारांना स्कँडिनेव्हियात अनुकूल वातावरण निर्माण होऊ लागले.ब्यर्न्स्टेअर्ने ब्यर्न् सॉन, येन्स पीअटर याकॉपसन ह्यांच्यासारख्या स्कँडिनेव्हिअन साहित्यिकांनी त्याच्या विचारांना आस्थेवाईक प्रतिसाद दिला. द मेन ऑफ द मॉडर्न ब्रे थ्रू (१८८३ इं. शी.) ह्या पुस्तकात त्याने आपल्या अनुयायासंबंधी लिहिले आहे. १९०२ मध्ये कोपनहेगन विद्यापीठातील सौंदर्यशास्त्राच्या अध्यासनावरही त्याची नियुक्ती झाली. विख्यात जर्मन तत्त्वज्ञ नीत्शे ह्याच्या विचारांचा १८८० नंतर प्रभाव पडून विभूतिपूजेला महत्व देणाऱ्या एका तत्त्वज्ञानाचा पुरस्कार तो करू लागला. ह्या तत्त्वज्ञानाला त्याने ‘ॲरिस्टोक्रॅटिक रॅडिकॅलिझम’ (इं. अर्थ) असे नाव दिले होते. विल्यम शेक्सपिअर, गटे, व्हॉल्तेअर, मायकेलअँजेलो, जूलिअस सीझर ह्यांसारख्या कर्तृत्वाच्या विविध क्षेत्रांतील थोर व्यक्तींची चरित्रे त्याने ह्याच तत्त्वज्ञानाच्या प्रभावातून लिहिली. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात असताना ब्रांडेसने जिझस, अ मिथ (१९२५, इं. भा. १९२६) हा ख्रिस्ती धर्माच्या ऐतिहासिक मूलधारावरच आघात करणारा वादग्रस्त ग्रंथ लिहिला आणि अनेकांचा रोष ओढवून घेतला.

ब्रांडेसच्या अन्य उल्लेखनीय ग्रंथांत ‘डॅनिश पोएट्स’ (१८७७, इं. शी.), इंप्रेशन्स ऑफ रशिया (१८८८, इं. भा. १८८९), पोलंड : ए स्टडी ऑफ द लँड, पीपल अँड लिटरेचर (१८८८, इं. भा. १९०३) ह्यांसारख्या ग्रंथांचा समावेश होतो. जॉन स्ट्यूअर्ट मिलच्या द सब्जेक्शन ऑफ वूमेन (१८६९) ह्या ग्रंथाचा डॅनिश अनुवादही त्याने केला आहे. ब्रांडेसच्या संकलित ग्रंथांची आवृत्ती १८ खंडांत प्रसिद्ध झाली (१८९९- १९१०). कोपनहेगन येथे तो निधन पावला.

संदर्भ : Mortizen, Julius, Georg Brandes in Life and Letters, Newark (N. J.), 1922.

यानसेन, एफ्. जे. विलेस्कॉव्ह (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)