पालुडान, याकॉप : (७ फेब्रुवारी १८९६ –    ). डॅनिश कादंबरीकार. कोपनहेगन येथे जन्मला. औषधनिर्मितीचे (फार्मसी) शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेचा त्याने प्रवास केला (१९२० – २१). अमेरिकनांची जीवनपद्धती त्याला आवडली नाही आणि यूरोपीय संस्कृतीचे अमेरिकीकरण होऊ नये ह्यासाठी लेखनाच्या माध्यमातून त्याने प्रयत्न केले. समकालीन डॅनिश समाजावरही त्याने टीका केली पहिल्या महायुद्धानंतरच्या पिढीचे दोष दाखविले. बर्ड्स अराउंड द  लाइट (मूळ डॅनिश १९२५, इं. भा. १९२८), द रायपनिंग फील्ड्स (इं.शी. 1927) आणि यर्गेन स्टाइन (१९२३ – ३३) ह्या त्याच्या विशेष उल्लेखनीय कांदबऱ्या. त्याच्या कादंबऱ्यांतून त्याची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि मार्मिक मानसशास्त्रीय दृष्टी प्रत्ययास देते. त्याने निबंधलेखनही केले असू चिंतनशीलता आणि काव्यात्मता ही त्याच्या निबंधलेखनाची लक्षणीय वैशिष्ट्ये होत.

यानसेन, एफ्. जे. बिळेस्कॉव्ह (इं.) कुलर्णी, अ.र. (म.).