याकॉपसन, येन्स पीअटर : (७ एप्रिल १८४७–३० एप्रिल १८८५). डॅनिश कथा-कादंबरीकार आणि कवी. डेन्मार्कमधील टीस्टेद ह्या गावी जन्मला. कोपनहेगन विद्यापीठातून १८६७ साली तो पदवीधर झाला. वनस्पतिविज्ञान हा याकॉपसनच्या आवडीचा आणि व्यासंगाचा विषय. विख्यात इंग्रज निसर्गशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन ह्याच्या ऑन ऑरिजिन ऑफ स्पीशीज आणि डिसेंट ऑफ मॅन… हे ग्रंथ त्याने डॅनिशमध्ये अनुवादिले होते (१८७२ १८७५). दोन कादंबऱ्या, एक कथासंग्रह आणि थोड्याशा कविता एवढीच ललित साहित्यनिर्मिती याकॉपसन आपल्या आयुष्यात करू शकला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात डॅनिश साहित्यात अवतरलेल्या वास्तववादी संप्रदायाचा नेता गिऑर ब्रांडेस ह्याचा प्रभाव याकॉपसनवर होता. Fru Marie Grubbe (१८७६, इं. भा. १९१४) आणि Niels Lyhne (१८८०, इं. भा. १८९६) ह्या दोन कादंबऱ्यावर याकॉपसनची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. एका डॅनिश उमराव घराण्यातील ऐतिहासिक स्त्रीचे जिवंत व सखोल चित्रण Fru Marie Grubbe मध्ये आढळते. सतराव्या शतकात होऊन गेलेली ही वासनासक्त स्त्री एकामागोमाग एक लग्ने करीत राहते.Niels Lyhne चा नायक हा कवी होऊ इच्छिणारा एक स्वप्नाळू मनुष्य आहे. ख्रिस्ती धर्म झुगारून तो एक बंडखोर नास्तिक बनतो पण हे नास्तिक्य सुसंगतपणे टिकवण्यात त्याला कोणकोणत्या अडचणी येतात, हे ह्या कादंबरीत प्रत्ययकारीपणे मांडलेले आहे. ही कादंबरी आत्मचरित्रात्मक असून याकॉपसनने तीत अनेक तत्कालीन प्रश्नांची चर्चा केलेली आहे.

याकॉपसनने लिहिलेली ‘मोगेन्स’ ही कथा, तिच्या निसर्गवादी वळणामुळे, तत्कालीनांना लक्षणीय आणि युगप्रवर्तक वाटली. मोगेन्स अँ अदर स्टोरीज (१८८२, इं. भा. १९२१) मध्ये त्याच्या वेचक कथा-कादंबरिका संगृहीत आहेत. सखोल मनोविश्लेषक दृष्टिकोण हे त्याच्या लेखनाचे एक ठळक वैशिष्ट्य त्याच्या कथा-कादंबऱ्यांतून प्रत्ययास येते.

याकॉपसनची कविता ही स्वच्छंदतावादी स्वरूपाची असून ब्रांडेसच्या प्रभावाखाली आल्यानंतर त्याने कवितालेखन सोडून दिले होते.

ऐन तारुण्यात याकॉपसनला क्षयाची बाधा झाली. तिच्याशी बारा वर्षे झगडत त्याने आपली साहित्यनिर्मिती केली. क्षयाच्याच विकाराने टीस्टे येथे तो निधन पावला.

यान्सेन, बिलेस्कॉव्ह एफ्‌. जे. (इं.) कळमकर, य. शं. (म.).