बांग, हॅर्मान : (२१ एप्रिल १८५७–२९ जानेवारी १९१२) डॅनिश कथा-कादंबरीकार. एका धर्मोपदेशकाचा हा पुत्र. डेन्मार्कमधील अँल्स बेटावर जन्मला. तरुणपणी नट होण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यात त्याल यश आले नाही परंतु पुढे मार्मिक नाट्यसमीक्षक व नाट्यदिग्दर्शक म्हणून त्याने नाव मिळविले. पॅरिसमध्ये इब्सेनच्या काही नाट्यकृतीही त्याने सादर केल्या होत्या. तथापि आज त्याची कीर्ती मुख्यतः त्याच्या कादंबरीलेखनावर अधिष्ठित आहे. ‘होपलेस जनरेशन्स’ (इं. शी.) ही त्याची पहिली कादंबरी १८८० मध्ये प्रसिद्ध झाली.
बांग हा एकाकी, बैफल्यग्रस्त होता आणि त्याच्या ह्या अवस्थेचे प्रतिबिंब त्याच्या ‘बिसाइड द ट्रॅक’(१८८६, इं. शी.) ‘मिखाइल’ (१९०४, इं. शी.) आणि ‘दोज विदाउट अ फादरलँड’ (१९०६, इं. शी.) ह्यांसारख्या कादंबऱ्यांतून पडल्याचे दिसून येते. एकाकीपणाचे दुःख भोगणाऱ्या माणसांच्या व्यक्तिरेखा त्याने ह्या कादंबऱ्यांतून प्रभावीपणे उभ्या केल्या आहेत.
बांग हा डॅनिश साहित्यातील संस्कारवादी (इंप्रेशनिस्ट) साहित्यिकांचा महत्त्वाचा प्रतिनिधी होय. त्याच्या कादंब-यांतील लेखनशैली त्या दृष्टीने लक्षणीय आहे.
बांग हा चांगला वक्ताही होता. व्याख्यानांच्या एका दौऱ्यावर तो अमेरिकेत गेला असताना ऑग्डेन, यूटा येथे त्याचे निधन झाले.
यानसेन, एफ्. जे. बिलेस्कॉव्ह (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)
“