डॅनिश भाषा : डॅनिश भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुटुंबाच्या जर्मानिक शाखेच्या स्कँडिनेव्हियन गटाची भाषा आहे. नॉर्वेजियन, स्वीडिश व आइसलँडिक याही याच गटातील भाषा आहेत. डॅनिशचे त्यांतील पहिल्या दोघींशी अतिशय साम्य आहे. त्यामुळे त्या एकाच प्रमाणभाषेच्या अगदी जवळच्या पोटभाषांसारख्या वाटतात. त्यातही डॅनिश व नॉर्वेजियन यांच्यातील साम्य फारच विलक्षण असून त्यांना डॅनो-नॉर्वेजियन या नावाने एकत्र संबोधण्यात येते. तेराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत डॅनिश हीच नॉर्वेची धार्मिक आणि साहित्यिक भाषा होती, पुढे मात्र रिक्समोल ही डॅनिश व स्वीडिश यांच्याशी साम्य असणारी लोकभाषा नॉर्वेत रूढ झाली.

डॅनिशचे साहित्य तेराव्या शतकात उदयाला आले आणि त्याची परंपरा अजूनही चालू आहे. डॅनिश भाषिकांची संख्या जवळजवळ पन्नास लाख आहे.

ध्वनिविचार : स्वर : आ, इ, इ‍ॅ, ए, ऍ, ओ, ऑ.                  व्यंजने : स्फोटक : क, ग, त, द, ब.                                घर्षक : थ, फ, व, स, झ, ह.                                अनुनासिक: म, न.

                               कंपक : र.                               पार्श्विक : ल.                               अर्धस्वर : य, व.

डॅनिश भाषा रोमन लिपीचा उपयोग करते. c, q, w, x, z ही अक्षरे फक्त परकी शब्दांतच वापरली जातात. j हे अक्षर ‘य’ च्या उच्चारासाठी वापरतात. d हे अक्षर शब्दाच्या शेवटी I, n, r, t नंतर आल्यास त्याचा उच्चार होत नाही. तसेच ते s, t पूर्वी कुठेही आल्यास अनुउच्चारित असते. एकावयवी शब्दात स्वरानंतर येणारे g हे अक्षरही अनुच्चारित असते.

व्याकरण : नाम : नामात दोन लिंगे आहेत : सामान्य व नपुंसक. दोन वचने आहेत. नामापूर्वी निर्गुण (निश्चित व अनिश्चित) विशेषण येते. नामाचे अनेकवचन कोणताही प्रत्यय न लागता, e किवा er हा प्रत्यय लागून किंवा स्वरविकार होऊन होते. प्रथमा, द्वितीया व षष्टी या तीन विभक्त्या आहेत.

विशेषण : विशेषणे नामाच्या लिंगवचनाप्रमाणे बदलतात.

सर्वनाम : सर्वनामे लिंगवचनाप्रमाणे बदलतात. त्यांची षष्टीची रूपे मात्र विशेषणाप्रमाणे वागतात.

क्रियापद : क्रियापदाचे रूप सर्व पुरुषी एकच असते. काही क्रियापदे सौम्य (नियमित) व काही तीव्र (अनियमित) असा फरक आहे.

संदर्भ : 1. Cohen, Marcel Meillet Antoine, Les langues du monde, Paris, 1952.

    2. Ostermann, G. F. Von, Manual of Foreign Languages, New York, 1959.

कालेलकर, ना. गो.