बोर्सन, हान्स आडॉल्फ : (२० जून १६९४ – ३ जून १७६४). डॅनिश धर्मोपदेशक आणि स्तोत्रकार. जन्म डेन्मार्कमधील रांदेरूप येथे. ब्रोर्सन हा पाय्‌टिस्ट होता. पाय्‌टिझम ही जर्मन ल्यूथरन चर्चच्या अंतर्गत सुरू झालेली एक चळवळ. प्रॉटेस्टंट पंथात नवचैतन्य निर्माण करणे हे तिचे उद्दिष्ट होते. ह्या पंथासाठी रचिल्या गेलेल्या काही सुंदर जर्मन स्तोत्रांचा डॅनिश अनुवाद ब्रोर्सनने केलेला आहे. त्याने स्वतंत्रपणेही अनेक स्तोत्रे लिहिलेली आहेत. ‘द रेअर जूवेल ऑफ फेथ’ (१७३९, इं. शी.) हा त्याच्या स्वतंत्र व अनुवादित स्तोत्रांचा संग्रह. बोर्सनच्या हयातीत त्याच्या सात आवृत्त्या निघाल्या. ‘स्वान साँग’ (१७६५, इं. शी.) हा त्याच्या स्तोत्रांचा दुसरा संग्रह. ब्रोर्सनच्या स्तोत्रांतून त्याच्या सखोल आणि उत्कट धर्मभावनेचा प्रत्यय येतो. रीबे येथे १७४१ साली बिशप म्हणून त्याची नेमणूक झाली होती. तेथेच तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.