हॅलिबट : मत्स्य वर्गाच्या प्लुरोनेक्टिफॉर्मिस गणातील प्लुरोनेक्टिडी कुलामधील मासे. यांमध्ये विविध चपट्या माशांचा–विशेषतः मोठ्या आणि मौल्यवान असलेल्या अटलांटिक हॅलिबट व पॅसिफिक हॅलिबट माशांचा–समावेश होतो. हे मासे हिप्पोग्लॉसस प्रजातीतील असून त्यांचे दोन्ही डोळे डोक्याच्या एका बाजूवरच, शक्यतो उजव्या बाजूवरच, (दक्षिणावर्त) असतात आणि त्याच बाजूचा रंग गर्द भुरा असून बहुधा त्यावर फिकट रंगाचे चट्टे असतात. दुसरी बाजू पांढरी असते. त्यांचेदोन्ही जबडे सारख्याच आकाराचे व मजबूत असतात.

 

हॅलिबट मासे उत्तर समुद्र व उप-आर्क्टिक समुद्र यांत आढळतात. ते उत्तर अटलांटिक व उत्तर पॅसिफिक महासागराच्या दोन्ही किनाऱ्यां-वरील सागरमग्न खंडभूमी (खंड-फळी) व किनाऱ्यापासून आत राहतात. काही खाद्य चपटे मासे हॅलिबट नावाने ओळखले जातात त्यांमध्ये ग्रीनलंड हॅलिबट, कॅलिफोर्निया हॅलिबट व इंडियन हॅलिबट यांचासमावेश होतो.

 

हॅलिबट मासे ३००–४२५ मी. खोल पाण्यात समुद्राच्या तळाजवळ डिसेंबरच्या सुरुवातीस अंडी घालतात. मादी २,५०,०००–३,००,००० अंडी घालते. अंडी लहान व सु. ३.५ मिमी. व्यासाची असून पाण्यात तरंगत प्रवाहाबरोबर वाहत जातात. अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या पिलांची लांबी १.५–३ मिमी. असते. पिले अनिश्चित काळापर्यंत प्रवाहाबरोबर वाहत जातात. वाढीचे प्रमाण स्थलमानाप्रमाणे भिन्न असते. २० वर्षे वयाचा हॅलिबट मासा सु. ३ मी. लांब होतो व त्याचे वजन सु. ४७० किग्रॅ.पर्यंत असते. विविध प्रकारचे मासे, कवचधारी प्राणी व मृदुकाय प्राणी यांवर ते आपली उपजीविका करतात.

 

अटलांटिक हॅलिबट : याचे शास्त्रीय नाव हि. हिप्पोग्लॉसस असे असून तो चपट्या माशांपैकी सर्वांत मोठा मासा आहे. त्याचा आढळ उत्तर अटलांटिक महासागराच्या दोन्ही बाजूंना आहे. त्याची लांबीसु. २ मी.पर्यंत असून वजन सु. ३२५ किग्रॅ.पर्यंत असते. ज्या बाजूलाडोळे असतात ती बाजू तपकिरी, काळसर किंवा गडद हिरव्या रंगाची असून दुसरी बाजू इतर चपट्या माशांप्रमाणे पांढरी असते. सध्या बेसुमार मासेमारीमुळे त्यांची संख्या घटली आहे.

 

आ. १. अटलांटिक हॅलिबट (हिप्पोग्लॉसस हिप्पोग्लॉसस)पॅसिफिक हॅलिबट : याचे शास्त्रीय नाव हि. स्टेनोलेपीस आहे. ही जाती अटलांटिक हॅलिबटापेक्षा लहान व सडपातळ आहे. तिचा आढळ उत्तर पॅसिफिक महासागराच्या दोन्ही किनाऱ्यांवर आहे. तिचा रंग हिरवट तपकिरी असून वजन सु. २१३ किग्रॅ.पर्यंत असते.

 

ग्रीनलंड हॅलिबट : याचा समावेश प्लुरोनेक्टिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव रेंनहार्डीट्यूयस हिप्पोग्लासॉईडस असे आहे. या जातीचाआढळ आर्क्टिक आणि अटलांटिक महासागरांजवळील आर्क्टिक भागांत आहे. तिची लांबी सु. १ मी. असून वजन सु. ११ किग्रॅ. असते. इतर चपट्या माशांप्रमाणे दोन्ही बाजूंचा रंग सारखा असून तो तपकिरीकिंवा काळा असतो.

 

आ. २. कॅलिफोर्निया हॅलिबट (पॅरालिक्थिस कॅलिफोर्निकस)

कॅलिफोर्निया हॅलिबट : याचा समावेश पॅरालिक्थिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव पॅरालिक्थिस कॅलिफोर्निकस असे आहे. तिचारंग करडसर तपकिरी लांबी सु. १.५ मी. आणि वजन सु. २७ किग्रॅ.पर्यंत असते. पॅरालिक्थिडी कुलातील मासे सामान्यपणे वामावर्त (डावीबाजू वर असून दोन्ही डोळे डाव्या बाजूवर) असतात, परंतु पॅ. कॅलिफोर्निकस या जातीमध्ये डोळे दोहोंपैकी कोणत्याही बाजूला (डाव्या किंवा उजव्या) असतात.

आ. ३ इंडियन हॅलिबट (सेट्टोडीस एऱ्युमी)इंडियन हॅलिबट : याचा समावेश प्लुरोनेक्टिफॉर्मिस गणातील सेट्टोडिडी कुलात होतो. सेट्टोडीस प्रजातीमध्ये से. बेलचेरी, से. बेन्नेट्टीव से. एर्‍युमी (इंडियन हॅलिबट) अशा तीन जाती आहेत. त्यांपैकी से. एर्‍युमी या जातीचा आढळ इंडो-पॅसिफिक समुद्रात सु. १०० मी. खोलीपर्यंत आहे. तिचा रंग करडसर तपकिरी असून दोन्ही डोळे दोहोंपैकी कोणत्याही (डाव्या किंवा उजव्या) एकाच बाजूला असतात. तिची लांबी सु. २४.८ सेंमी. (जास्तीत जास्त ६४ सेंमी.पर्यंत) असून वजनसु. ९ किग्रॅ.पर्यंत असते. पुच्छपक्ष व गुदपक्ष यांवर असलेल्या काट्यांमुळे ती इंडियन स्पाईनी किंवा टर्बॉट या नावानेही ओळखली जाते.

 

यूरोपमध्ये अन्नाखेरीज उपयुक्त असे लिव्हर ऑईल (यकृतापासून मिळविलेले तेल) काढण्यासाठी हॅलिबटांचा वापर केला जातो. तेलामध्ये भरपूर प्रमाणात अ व ड जीवनसत्त्वे असतात. उत्तर पॅसिफिक महा-सागरात सु. ३६,००० टनांपेक्षा जास्त हॅलिबट मासे पकडल्याची नोंद आहे. पूर्वी बेसुमार मासेमारीमुळे त्यांची संख्या खूपच घटली होती परंतु शास्त्रीय व्यवस्थापनाद्वारे ईशान्य पॅसिफिक महासागरात करण्यात आलेल्या प्रयोगांमुळे त्यांची संख्या कमालीची वाढली आहे.

 

पहा : चपटे मासे.

जमदाडे, ज. वि. मगर, सुरेखा अ.

 

अटलांटिक हॅलिबट (हिप्पोग्लॉसस हिप्पोग्लॉसस) कॅलिफोर्निया हॅलिबट (पॅरालिक्थिस कॅलिफोर्निकस)