युनानी वैद्यक : ॲलोपॅथी अथवा विषम चिकित्सा, होमिओपॅथी अथवा समचिकित्सा किंवा आयुर्वेदिक चिकित्सा याप्रमाणेच एका चिकित्सेला ‘युनानी वैद्यक’ अथवा ‘युनानी चिकित्सा’ म्हणतात. युनानी हा शब्द ‘यवनानी’ या मूळ संस्कृत शब्दापासून बनला आहे व त्याचा अर्थ यवनांची लिपी असा आहे. यवन याचा अर्थ ग्रीक पुरुष वा अनार्य असा आहे. अरबांनी ग्रीक वैद्यक आत्मसात केल्यानंतर त्यात भर घालून स्वतःचे प्रगत वैद्यक तयार केले. मूळ उत्पत्तिस्थानाची प्रतिष्ठा राखण्याकरिता आपल्या वैद्यकाला ते ‘युनानी वैद्यक’ म्हणू लागले. काहींच्या मताप्रमाणे ‘अमोनियन’ या मूळ ग्रीक शब्दावरून युनानी हा शब्द बनला आहे.

प्राचीन शरीरद्रव्य सिद्धांतइतिहास आणि युनानी व ग्रीक वैद्यकांचे संबंध : पायथॅगोरस (इ. स. पू. सु. ५७५–४९५) या ग्रीक तत्त्ववेत्त्यांच्या मूलघटकांच्या चार प्रमुख गुणधर्मांच्या (उष्ण, शीत, आर्द्र व शुष्क) सिद्धांतावर तसेच ⇨हिपॉक्राटीझ (इ. स. पू. सु. ४६०–३७०) यांच्या शरीरद्रव्य सिद्धांतावर ग्रीक वैद्यक आधारलेले होते. ग्रीक वैद्यकातील शरीराच्या आत्म-संरक्षण किंवा समायोजन क्षमतेच्या सिद्धांताप्रमाणे शरीर कोणताही विक्षोभ वैयक्तिक प्रवृत्तीच्या मर्यादेनुसार दूर करू शकते. मूलघटक व शरीरद्रव्ये एकमेकांशी संबंधित असून शरीरद्रव्यांचे योग्य व संतुलित मिश्रण म्हणजेच शरीर व मनाचे स्वास्थ्य आणि त्यातील बिघाड म्हणजेच रोग असा हा प्राचीन सिद्धांत होता. आकृतीत शरीरद्रव्ये (पीत पित्त, कृष्ण पित्त, श्लेष्मा अथवा कफ व खून अथवा रक्त), मूलघटक (तेज, पृथ्वी, जल व वायू) आणि त्यांचे गुणधर्म (उष्ण, शुष्क, शीत व आर्द्र) दर्शविले जातात.

युनानी वैद्यक याच प्रकारच्या सिद्धांतावर आधारलेले असून युनानी हकीम आपल्या औषधांनी शरीराची आत्म-संरक्षणाची क्षमता जागृत करण्याचा किंवा वाढविण्याचा प्रयत्न करतो.

रोमनांनी  ग्रीकांचा पराभव केल्यानंतर पुढे एक हजार वर्षे ग्रीक वैद्यक अगदी खुंटलेल्या अवस्थेत होते. ⇨गेलेन (इ. स. १३१–२०१) या ग्रीक वैद्यांनी त्यांच्या काळातील सर्व उपलब्ध वैद्यकीय माहिती गोळा केली व तिची भक्कम पायावर सुबद्ध मांडणी केली. त्यांच्या अतिविस्तृत ज्ञानाची कल्पना त्यांच्याच अवाढव्य ग्रंथरचनेवरून करता येते. गेलेननंतर पुढे पंधरा शतके त्यांचे सिद्धांत सर्वमान्य आधार बनले. पुढे काही शतके वैद्यकीय व्यवसाय सर्वस्वी  धर्माधिकाऱ्यांच्या ताब्यात होता.

नेस्टोरियन लोकांनी (कॉन्स्टँटिनोपल येथील पाचव्या शतकातील मूळ पुरुष नेस्टोरिअस यांच्या अनुयायांनी) पर्शियामध्ये काही वैद्यकीय शाळा सुरू केल्या व त्या वेळी ग्रीक वैद्यकीय लिखाणाचे सिरिअँक भाषेत भाषांतर केले गेले. यांपैकी एक शाळा युफ्रेटीस नदीकाठी होती व त्या शाळेकरिता ग्रीक वैद्यकाचे पहिले अरबी भाषांतर केले गेले.

ग्रीक व अरबी वैद्यक यांच्या दीर्घकालीन युतीमुळे ग्रीक वैद्यकाचे मूळ स्वरूप पार बदलले. ग्रीक वैद्य फक्त अनुभवसिद्धतेवर व गूढवादावर विसंबून असत. अरबांनी गणित, भौतिकी, रसायनशास्त्र, भूगोलशास्त्र, वनस्पतिशास्त्र व वैद्यक यांचे ज्ञान यूरोपला प्रदान केले. वैद्यकासंबंधीची ही परिस्थिती सु. सहाशे वर्षे अस्तित्वात होती, असे निश्चित सांगता येते.

ॲव्हिसेना ऊर्फ ⇨इब्न सीना (९८०–१०३७) बगदादच्या खलिफांचे वझीर व वैद्य होते. निरनिराळ्या विषयांवर त्यांनी शंभरपेक्षा जास्त ग्रंथ लिहिले होते. त्यांपैकी अल्‌-कानून फी अल्‌-तिब्ब या ग्रंथात संपूर्ण वैद्यकीय ज्ञान क्रमवार संग्रहित केले आहे. ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४–३२२) व गेलेन यांच्या वैद्यकीय तत्त्वांची व तत्कालीन वैद्यकीय तत्त्वांची जुळणी करण्याचा प्रयत्न या महान ग्रंथात केला असून मध्ययुगात तो एक आधार ग्रंथ बनला होता.

ग्रीक वैद्यकातील विखुरलेल्या ज्ञानाचे वर्गीकरण, उपरुग्ण वैद्यकाची सुरुवात आणि नव्या रोगवर्णनांची विकृतिविज्ञानातील भर ही अरबी वैद्यकाच्या प्रगतीची क्षेत्रे होती. इ. स. ७००–११०० या काळात अरबी भाषेत वैद्यकावर भरपूर ग्रंथलेखन झाले.

अरबी वैद्यक व आयुर्वेद यांचा संबंध हारुन-अल्‌-रशीद (७६४–८०९) यांच्या काळापासून प्रस्थापित झाला होता. काही आयुर्वेद शास्त्रज्ञांना बगदाद भेटीचे आमंत्रण दिल्याची घटना ऐतिहासिक सत्य आहे. भारतात युनानी हकीमांनी सुश्रुत, वाग्भट, शार्ङ्‌गधर इत्यादींच्या आयुर्वेदिक ग्रंथांतून योग्य त्या भागांचा उपयोग केला होता.

मूलभूत सिद्धांत : हा सिद्धांत समजण्याकरिता मूळ ग्रीक वैद्यकातील शरीरद्रव्य सिद्धांत समजला पाहिजे. (१) रक्त, (२) पीत पित्त, (३) कृष्ण पित्त व (४) श्लेष्मा या चार द्रव्यांचे संतुलित व योग्य मिश्रण म्हणजे स्वास्थ्य आणि असंतुलित मिश्रण म्हणजे अस्वास्थ्य अथवा रोग ही मूलभूत कल्पना आहे. यांशिवाय चार मूलघटक व चार प्रमुख गुणधर्म शरीर प्रवृत्ती बनवितात. तेज, पृथ्वी, जल व वायू आणि संनिकृष्ट गुणधर्म उष्ण, शुष्क, शीत व आर्द्र यांना समान अशी चार शरीरद्रव्ये पुढीलप्रमाणे आहेत.

उष्ण + सांद्र (आर्द्र) = रक्त उष्ण + शुष्क = पीत पित्त

शीत + शुष्क = कृष्ण पित्त शीत + सांद्र (आर्द्र) = श्लेष्मा.

युनानीमध्ये ‘खून’, ‘बलगम’, ‘सफरा’ व सौदा’ अशी चार शरीरद्रव्ये (युनानीमध्ये यांना ‘खिल्त’ म्हणतात) मानली आहेत. चार शरीरद्रव्यांना मिळून अरब्लात-ए-अरब ‘अ’ असे म्हणतात.

ग्रीक व युनानी कल्पनांमधील प्रमुख फरक असे आहेत.

(१) सफरा: याचा अर्थ पित्त या यकृतस्रावापुरताच मर्यादित नसून शरीराच्या उष्णतोत्पादक क्रिया व पचनक्रियेशी पचनक्रियेसहित सर्व चयापचय (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी), रक्ताचा रंग, सर्व स्रावोत्पादन व उत्सर्जन यांचा त्यात समावेश होतो.


(२) बलगम : याचा अर्थ श्लेष्मा अथवा कफ यापुरताच मर्यादित नसून मुख्यत्वे उष्णता नियंत्रणाशी संबंधित अशी ही संज्ञा असून श्लेष्मा, संधिरस इ. संरक्षणात्मक द्रव्यांकरिताही वापरतात.

शरीरद्रव्य अथवा खिल्तची व्याख्या युनानी वैद्यकात अशी केली आहे.‘सेवन केलेल्या अन्नपदार्थापासून यकृतात निर्माण होणारे, शरीरपोषणास समर्थ असे आर्द्र व द्रव पदार्थ’. खिल्त दोन प्रकारचे असतात : (१) अदृश्य किंवा आवश्यक : शरीरक्रियावैज्ञानिक क्रियांना मार्गदर्शन करणारी, (२) दृश्य किंवा स्थूल स्वरूपात असणारी, उदा., स्राव उत्सर्जित पदार्थ म्हणून वरील क्रियांमुळे उत्पन्न होतात. या दोन प्रकारांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो. आवश्यक प्रकारातील खिल्तचा बिघाड ताबडतोब संबंधित स्रावावर व उत्सर्जित पदार्थावर दुष्परिणाम करतो व ते वाढतात किंवा दूषित होतात.

खून अथवा रक्त जेव्हा यकृतातून बाहेर पडते तेव्हा चारही खिल्त त्यात असतात. अन्नरसापासून अधिकांश खून त्यानंतर बलगम, त्या खालोखाल सफरा आणि अल्प प्रमाणात सौद यांची निर्मिती होते. ते विकृत झाल्यास त्यांच्या वर्ण, रुची, घनता इ. गुणधर्मांत बदल होतो व निरनिराळ्या रोगांची उत्पत्ती होते.

रोगनिदान व चिकित्सा : रुग्ण परीक्षेने निश्चित केलेली रोगचिन्हे व रोगलक्षणे यांवरून रोगनिदान व चिकित्सा युनानी वैद्यकात केली जाते. रोगाचे नाव प्रमुख रोगचिन्हावरून दिले जाते. रोगनिदानाकरिता नाडी परीक्षा (युनानी ‘नब्द’) प्रमुख साधन असून निष्णात हकीम यात तरबेज असतो. ॲव्हिसेना यांच्या मताप्रमाणे नाडीचे दहा प्रकार असून त्यावरून शरीराची स्थिती ठरविता येते. याशिवाय निदानोपयोगी नाडीचे सत्तावीस उपप्रकार सांगितले आहेत. नाडीशिवाय हकीम निदानाकरिता मूत्र (बौल) आणि मल (बराज) यांच्या परीक्षांचाही उपयोग करतात. नाडी परीक्षेत प्रवीण असलेल्या हकीमास ‘नब्बाद’ म्हणतात.

मूत्राच्या रंगावरून निदानास मदत होते. मूत्राचे एकूण अठरा प्रकारचे रंग ओळखले जातात व ते निरनिराळे रोग दर्शवितात.

युनानी वैद्यकातील औषधे प्रामुख्याने वनस्पतीपासून बनविलेली असतात. काही खनिजे व प्राणिज औषधेही वापरतात. उदा., काही प्राण्यांचे मेंदू व यकृत त्यांच्या औषधी गुणांकरिता देतात. यकृत विकार यकृत अर्काने व मानसिक विकृती मेंदूच्या अर्काने बऱ्या होतात, असा युनानी हकीमांचा दावा आहे.

औषधाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले आहे. (१) पहिला वर्ग : जवळजवळ तोषक अथवा समाधानक औषधे (२) दुसरा वर्ग : मंद परिमाणकारक (३) तिसरा वर्ग : किंचित जलद परिणामकारक (४) चौथा वर्ग : अधिक जलद परिणामकारक, (५) पाचवा वर्ग : मंद गतीने परिणाम करणारी  विषे आणि (६) सहावा वर्ग : जलद परिणाम करणारी  विषे.

चिकित्सेची सुरुवात बहुधा समाधानक औषधे व आहार बदलांनी करतात. हळूहळू अधिकाधिक शक्तिशाली औषधे देतात. विषारी औषधांचा उपयोग अती तीव्र रोगावस्थेत केला जातो व ती प्रथम शुद्ध स्वरूपात तयार करूनच वापरतात. जो हकीम केवळ आहारासंबंधीच्या सवयी बदलून रोग बरा करतो तो सर्वोत्तम समजला जातो. युनानी वैद्यक अनेक चिरकारी (दीर्घ कालीन) रोगांवर गुणकारी असल्याचे सांगतात. जठर व यकृत यांच्या विकृतींवर त्यामध्ये विशिष्ट औषधे आहेत.

युनानी औषधे बहुधा बहुविध औषधांच्या मिश्रणापासून बनविलेली असतात. कारण त्यात काही सहकारी (मूळ औषधांना परिणाम वाढवण्यास मदत करणारी) व काही अनुषंगी दुष्परिणाम टाळणारी अशा दोन्हीचे मिश्रण असते.

युनानी हकीमांना ⇨निसर्गोपचारांचे ज्ञान होते. सूर्य-स्नान व तुर्की स्नान यांसारख्या जल चिकित्सा त्यांना माहीत होत्या. कित्येक शतकांपूर्वी संततिनियमनावर परिणामकारक उपचार त्यांना माहीत होता.

अरबांनी शस्त्रचिकित्सेकडे लक्ष पुरविले होते. त्यांनी मेंदूवरील शस्त्रक्रिया केल्याची नोंद आढळते. छत्तीस प्रकारच्या शस्त्रक्रियांचा उल्लेखही आढळतो. कालांतराने वैद्यकाचा हा भाग पूर्णपणे दुर्लक्षित झाला.

सद्यस्थिती : युनानी वैद्यक भारतात प्रथम अरब व्यापाऱ्यांबरोबर आले व कालांतराने मोगल राज्यकर्त्यांमुळे प्रसृत झाले. काही काळ दिल्लीमध्ये त्याची बगदादएवढीच भरभराट झाली होती. भारतीय हकीमांनी स्थानिक हवामानास अनुकूल असे बदल करून ते पूर्णपणे देशी बनविले. अरबी भाषेतील वैद्यकीय ग्रंथ प्रथम पर्शियन भाषेत व नंतर उर्दू भाषेत भाषांतरित झाले.

मसिहूल मुल्क हकीम अजमल खान यांनी अलीकडील काळात भारतातील युनानी वैद्यकास सुबद्ध करण्याचा पहिला प्रयत्न केला. त्यांनी दिल्ली येथे टिब्बिया कॉलेज स्थापन केले. ते १९२७ मध्ये पैगंबरवासी होईपर्यंत हजारो युनानी पदवीधर तयार झाले होते. भारतात अजमल खान टिब्बिया कॉलेज (अलीगढ), हमदर्द टिब्बी कॉलेज (दिल्ली) व आयुर्वेदिक अँड युनानी टिब्बिया कॉलेज (दिल्ली) तसेच मुंबई, मद्रास व उस्मानिया या विद्यापीठांतील वैद्यकीय महाविद्यालयांत युनानी वैद्यकाच्या शिक्षणाची सोय आहे.

अलीकडे युनानी औषधे मोठ्या प्रमाणावर आधुनिक उपकरणे व तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात येत आहेत. आधुनिक ॲलोपॅथिक औषधांप्रमाणेच ती विक्रीकरिता आवेष्टित करण्यात येतात. संशोधनही चालू आहे. हकीम अजमल खान यांनी सर्पगंधा (रॉव्होल्फिया सर्पेंटिना) या अतिरक्तदाबावरील गुणकारी वनस्पतीचे गुणधर्म शोधल्याचे सांगतात. दिल्ली येथील हमदर्द रिसर्च क्लिनिक अँड नर्सिंग होम या संस्थेत औषधी परिणामांचे संशोधन चालू आहे. अलीकडचे तेथे ॲम्मी माजूस या लॅटिन नावाने ओळखण्यात येणाऱ्या ईजिप्शियन वनस्पतीच्या (हिंदी नाव खुंबी) कोड अथवा श्वेतकुष्ठ या रोगावरील उपचारासंबंधी संशोधन चालू आहे.

भारताशिवाय पाकिस्तान व बांगला देशातही युनानी वैद्यक उपयोगात आहे.

संदर्भ : 1. Garrison, H. F. An Introduction to the History of Medicine, Philadelphia, 1929.

    2. Hameed, Abdul, Unani, Science Today, August, 1974.

    3. Sigerist, H. E. History of Medicine, New York, 1955.

     ४. दलजीतसिंह, यूनानी-चिकित्सा-विज्ञान, देहली, १९५१.

    ५. दलजीतसिंह, यूनानी द्रव्यगुण-विज्ञान, बम्बई, १९४९.

    ६. शुक्ल, मन्शाराम, यूनानी चिकित्सा सागर, बनारस, १९५०.

सुभान, एस्‌. ए. भालेराव, यं. त्र्यं.