पंडित, विष्णु परशुराम शास्त्री : (१८२७-१८७६). मराठी ग्रंथकार, वृत्तपत्रकार् आणि समाजसुधारक, जन्म साताऱ्याचा घराणे सातारा जिल्ह्यातील बावधान ह्या गावचे. सातारचे प्रख्यात विद्वान राघवेंद्राचार्य गजेंद्रगडकर आणि त्यांचे चिरंजीव नारायाणाचार्य ह्यांच्याकडे न्याय आणि व्याकरण ह्या शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पुण्याच्या सरकारी पाठशाळेत इंग्रजीचे अध्ययन केले. महादेवशास्त्री कोल्हटकर आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर हे त्यांचे सहाद्यायी होते. १८४८ मध्ये त्यांनी सरकारी शिक्षणखात्यात नोकरी पतकरली तेथे शिक्षक, भाषांतरकार, भाषांतरपरीक्षक अशी कामे केली. १८६४ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मुंबईच्या इंदुप्रकाश ह्या सामाजिक. सुधारणावादी वृत्तपत्राचे ते संपादक झाले. बालविवाह, पुनर्विवाह, केशवपन, जरठकुमारीविवाह इ. प्रश्नांवर आपले पुरोगामी विचार त्यांनी सडेतोडपणे मांडले. त्यासाठी प्राचीन धर्मग्रंथांचाही त्यांनी अभ्यास केला. स्त्रियांच्या उन्नतीची त्यांना तळमळ होती. पुनर्विवाहाचा केवळ पुरस्कार करूनच ते थांबले नाहीत, तर एका विधवेशी स्वतः विवाह करून आपण कर्ते सुधारक असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. १८७० मध्ये पुण्यास शंकराचार्याच्या अध्यक्षते खाली झालेल्या पुनर्विवाहविषयक वादात भाग घेऊन आपले विचार त्यांनी साधार आणि तर्कशुद्धपणे मांडले होते. पुनर्विवाहाच्या सशास्त्रते-संबंधी त्यांनी दिलेली काही व्याख्याने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली आहेत (१८७०). ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांनी पुनर्विवाहाच्या सशास्त्रतेसंबंधी लिहिलेल्या ग्रंथाचे त्यांनी केलेले विधवाविवाह हे भाषांतर १८६४ मध्ये प्रसिद्ध झाले.

त्यांच्या अन्य ग्रंथांत मॅक्‌डॉनल्डकृत कॉनिकल ऑफ नाना फरनवीस ह्या आणि अन्य काही ग्रंथांच्या आधारे लिहिलेली नाना फडनवीस ह्यांची संक्षिप्त बखर (१८५९), मरेकृत हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडियाच्या १० ते १४ प्रकरणांवर आधारित हिंदुस्थानाचा इतिहास (१८६१), इंग्रेजी आणि मराठी कोश (१८६४), संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश (१८६५) आदींचा समावेश होतो. शंकर पांडुरंग पंडित ह्यांच्या साहाय्याने त्यांनी तुकारामाच्या अभंगांची गाथा दोन खंडांत संपादिलेली आहे (१८६९, १८७३).

कुलकर्णी, अ. र.