पॅरा-अमिनो सॉलिसिलिक अम्‍ल

पॅरा-अमिनो सॅलिसिलिक अम्‍ल : हे क्षयरोगावरील एक प्रभावी औषध असून ते एक कार्बनी अम्‍ल आहे. रासायनिक सूत्र C6H4ONH2COOH. ४-ॲमिनो सॅलिसिलिक अम्‍ल, ४-ॲमिनो-२-हायड्रॉक्सिबेंझॉइक अम्‍ल, ‘पासा’ (PASA), ‘पास’ (PAS) यानावांनीही हे अम्‍ल ओळखले जाते. त्याची रेणवीय संरचना पुढीलप्रमाणे आहे. १९०१ मध्ये प्रथम त्याचे संश्लेषण करण्यात आले (कृत्रिम रीत्या तयार करण्यात आले). त्याच्या क्षयरोधी शक्तीचा शोध १९४६ साली जे. लेमन यांनी लावला. मानवाच्या क्षयरोगावर त्याचा औषध म्हणून उपयोग त्याच वर्षी प्रथम करण्यात आला. सॅलिसिलिक अम्‍ल आणि बेंझॉइक अम्‍ल यांच्या अनुजातांच्या (एका पदार्थांपासून तयार केलेल्या दुसऱ्या पदार्थांच्या) सेवनामुळे ऑक्सिजन जास्त प्रमाणात आत घेतला जातो, तर कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकला जातो. यामुळे क्षयाच्या सूक्ष्मजंतूंच्या चयापचयावर (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींवर) परिणाम होतो असे आढळून आले. यातूनच सॅलिसिलिक अम्‍ल आणि बेंझॉइक अम्‍ल यांच्या अनुजातांवर संशोधन करून पासचा क्षयरोधी औषध म्हणून उपयोग होईल असे दिसून आले.

स्ट्रेप्टोमायसीन अथवा आयसोनिकोटिनिक अम्‍ल हायड्राझाइड (आय एन एच) यांबरोबर पास दिल्यास क्षयरोग सूक्ष्मजंतूंच्या उद्‍भवास रोध होतो. म्हणून सामान्यत: पास हे वरील औषधांबरोबर दिले जाते. पास शरीरात जलद शोषले जाते, तसेच ते जलद बाहेर टाकले जाते. म्हणून पासचे रक्तातील प्रमाण कायम ठेवण्यासाठी त्याची जास्त मात्रा देणे आवश्यक असते. रोगी माणसाला दिवसातून १०–१५ ग्रॅ. पर्यंत पास दिल्यास त्याचे सर्वसाधारण अनिष्ट परिणाम दिसत नाहीत पण काही रोग्यांना जास्त मात्रा दिल्यास अधिहृषता (अलर्जी) व जठरक्षोभ यांचा त्रास होतो. सतत पास दिल्यास सूक्ष्मजंतूंवर काही वेळा परिणाम होत नाही, असेही आढळून आले आहे.

पास निरनिराळ्या पद्धतीने तयार करतात परंतु औद्योगिक दृष्ट्या ते मेटा ॲमिनो फिनिलपासून तयार करतात. हे अम्‍ल चूर्णरूप असून त्याचा रंग पांढरा असतो. त्याचा उकळबिंदू १३५–१४०से. आहे. ते पाण्यात विरघळत नाही अल्कोहॉलात विरघळते. त्याचे सोडियम लवण पाण्यात विरघळते व त्याच स्वरूपात ते रोग्याला देतात. नवीनच सुरुवात झालेल्या फुप्फुसाच्या क्षयरोगावर त्याचा उपयोग होतो पण जुनाट क्षयरोगावर आणि तीव्र सार्वदेहिक क्षयावर त्याचा परिणाम होत नाही. सर्वसाधारणत: ते स्ट्रोप्टोमायसीन वा आय एन एच बरोबर सर्व प्रकाराच्या क्षयावर तोंडावाटे दिले जाते.

नागले, सु. कृ.