माथुर, गिरिजाकुमार : (२२ ऑगस्ट १९१९–     ). प्रख्यात आधुनिक हिंदी कवी. जन्म अशोकनगर (मध्य प्रदेश) येथे. गिरिजाकुमारांच्या जन्मापासून त्यांच्या आईला जडलेले आजारपण पुढे सु. ३३ वर्षे टिकले. त्यांचे वडील व दोन चुलते यांनी खूप प्रेम दिले पण आईच्या प्रदीर्घ आजारपणामुळे ते ज्या वातावरणात वाढले, ते काहीसे उदास होते. त्यांच्या काव्यात उदासीनता, एकटेपणा व दुःख यांची जी छाया दिसते, त्याचे मूळ ह्या वातावरणात आहे. गिरिजाकुमार अन्तर्मुखी स्वभावाचे होते. घरचे वातावरण तसे अतिशय सुसंस्कृत होते. घरी तत्त्वज्ञानावरच्या ग्रंथांचा विपुल संग्रह होता. वडील शिक्षक होते व मामा संगीतज्ञ होते. आई आजारी असली, तरी विदुषी होती. वडिलांनाही काव्याची आवड होती. गिरिजाकुमारांनी हिंदीची रीतिकविता लहानपणीच वाचली होती आणि तिचा संस्कार त्यांच्यावर झाला होता. कवी होण्याची महत्त्वाकांक्षा लहानपणापासूनच त्यांनी मनात बाळगळी होती. वयाच्या बाराव्या वर्षी सातवी इयत्तेनंतर ते झांशीला आले व तिथल्या ऐतिहासिक आणि साहित्यिक वातावरणाचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला. १९३४ मध्ये गणेशोत्सवात झालेल्या समस्यापूर्ती कवितासंमेलनात त्यांनी ‘आरती’ कविता वाचली व त्यांचे प्रचंड कौतुक झाले. मिल्टन, शेली, कीट्स, मैथिलीशरण गुप्त, ‘निराला’ या कवींचा त्यांच्यावर प्रभाव आहे. १९३७ मध्ये ‘बिखरी स्मृतियाँ’ नावाची ४०० ओळींची प्रदीर्घ कविता त्यांनी लिहिली त्यातला काही भाग वीणा, कर्मवीरसारख्या प्रतिष्ठित पत्रिकांत छापून आला पण ती कविता पुढे गहाळ झाली.

गिरिजाकुमार लखनौ विद्यापीठातून इंग्रजी साहित्य घेऊन एम्.ए. तसेच एल्. एल्. बी. ही झाले. याच वर्षी कवयित्री शकुन्त यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांचा मंजीर हा पहिला काव्यसंग्रह १९४१ मध्ये प्रकाशित झाला. काही दिवस वकिली केल्यावर दिल्ली आकाशवाणीवर त्यांची नियुक्ती झाली आणि नंतर ते उपमहानिदेशक म्हणून तेथून निवृत्त झाले. १९४३ मध्ये प्रकाशित झालेल्या तार सप्तक या अज्ञेयांनी संपादित केलेल्या कवितासंग्रहात त्यांना स्थान मिळाले. १९४६ मध्ये ते लखनौला गेले व त्याच वर्षी त्यांचा नाश और निर्माण काव्यसंग्रह प्रकाशित झाला. १९५० मध्ये आकाशवाणीवरील नोकरीचा राजीनामा देऊन ते इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिसमध्ये हिंदी प्रसारणासाठी न्यूयॉर्कला गेले. १९५३ मध्ये विदेश भ्रमण करून आल्यावर लखनौ आकाशवाणी केंद्रात उपनिदेशक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आकाशवाणी प्रतिनिधि-मंडळांतून रशिया, चेकोस्लोव्हाकिया, स्वित्झर्लंड इ. देशांचा प्रवासही त्यांना घडला. १९५५ मध्ये त्यांचा धूप के धान कवितासंग्रह प्रकाशित झाला. यांशिवाय शिला पंख चमकिलै (१९६१), जो बँध नही सका (१९६६), भीतरी नदी की यात्रा (१९७५), छाया मत छूना मन (१९७८), साक्षी रहे वर्तमान (१९७९) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. कल्पांतर (१९८३) हे त्यांचे विज्ञानकाव्य होय. नई कविता : सीमाए और संभावनाएं (१९६६) हा त्यांचा समीक्षापर ग्रंथ तर जनम कैद (१९५७) हे त्यांचे नाटक होय.

माथुरजींनी कालानुरुप आपल्या कवितेतील आशय, शैली, भाषा यांत बदल केले. मूलतः त्यांची संवेदना मधुर, स्वच्छंदतावादी व रसात्मक आहे. विज्ञानाची शकावली व विज्ञानाचा प्रतिमात्मक -प्रतीकात्मक उपयोग आधुनिक हिंदी कवितेत त्यांनीच प्राचुर्याने केला. वैयक्तिक प्रेम अत्यंत स्पष्ट व मूर्त शब्दांत त्यांनी निर्भीडपणे व्यक्त केले. त्यांची प्रणयकविता मीलन-विरहाच्या अनेक सुखदुःखात्मक संवेदनांनी समृद्ध आहे. निसर्गाचे चित्रणही या अनुभवांची पार्श्वभूमी या नात्याने तीत रेखीवपणे येते. उदासीनतेबरोबरच आस्था व आशा यांचे स्वर त्यांच्या काव्यात उत्कटतेने व्यक्त झाले आहेत. त्यांची कविता मुख्यतः नागर भावनेने ओतप्रोत आहे. माणसाची प्रतिष्ठा त्यांना महत्त्वाची वाटते आणि म्हणूनच माणसावर आक्रमण करणाऱ्या राजकीय, वैज्ञानिक परिस्थितीवर त्यांनी कठोरपणे प्रहार केले आहेत. माथुरांच्या कवितेत भाषेचे भान विलक्षण सूक्ष्मदर्शी आहे. सूक्ष्म लयीचे असंख्य प्रयोग त्यांनी कवितेत केले आहेत. त्यांच्या शब्दयोजनेत शब्दांची चोखंदळ पारख विशेषत्वाने आढळते. ते प्रयोगधर्मी कवी असून छंद, लय, ध्वनि-संयोजन, कथन-प्रणाली, दृष्टीचे वैविध्य यांत त्यांची प्रयोगशील वृत्ती आढळते. हिंदीच्या ‘नई कविता’ या प्रवाहात गिरिजाकुमार माथुरांचे स्थान फार वरचे आहे.

संदर्भ : १. नगेंद्र, आधुनिक हिंदी कविता की मुख्य प्रवृत्तियाँ, दिल्ली, १९६२. 

            २. बांदिवडेकर, चंद्रकांत, कविता की तलाश, दिल्ली, १९८३. 

            ३. विजयकुमारी, गिरिजाकुमार माथुर नई कविताके परिप्रेक्ष्यमे, दिल्ली, १९७६.

बांदिवडेकर, चंद्रकांत