नगेंद्र : (२२ मार्च १९१५ –    ). हिंदीतील प्रसिद्ध समीक्षक आणि नाणावलेले प्राध्यापक. जन्म आत्रौली (जि. अलीगढ) येथे. पूर्ण नाव नगेंद्र नगाइच. इंग्रजी व हिंदी विषय घेऊन ते दोनदा एम. ए. झाले. १९४६ मध्ये ‘रीतिकाव्य की भूमिका तथा देव और उनकी कविता’ या विषयावरील त्यांच्या प्रबंधाला आग्रा विद्यापीठाकडून डी. लिट्. पदवी मिळाली. एम्. ए. झाल्यानंतर दिल्ली येथील वाणिज्य महाविद्यालयात त्यांनी दहा वर्षे इंग्रजीचे अध्यापन केले. काही काळ आकाशवाणीमध्येही त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठात हिंदी विभागप्रमूख म्हणून काम केले. दिल्ली विद्यापीठात कला विद्याशाखेचे अधिष्ठाते (१९५८—६०) म्हणून तसेच मानव्यविद्या-संशोधन-मंडळाचे अध्यक्ष (१९६०— ६२), केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष (१९६४—६९), विविध विद्यापीठांच्या संशोधन समित्या, निवड समित्या, कार्यकारी मंडळे यांचे सदस्य, भारत सरकारच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्य, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वैज्ञानिक व पारिभाषिक संज्ञा समितीचे १९७१ पासून मानसेवी सल्लागार इ. मानाची पदे त्यांनी भूषविली. ‘साहित्य वाचस्पति’ ही उपाधीही त्यांना लाभली. १९६५ मध्ये त्यांच्या रससिद्धांत या ग्रंथास साहित्य अकादेमी पुरस्कार तसेच उत्तर प्रदेश शासनाचा विशेष पुरस्कारही प्राप्त झाला.

त्यांच्या साहित्यिक जीवनाचा प्रारंभ कवी म्हणून झाला. १९३७ मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह वनमाला प्रसिद्ध झाला तथापि हिंदी साहित्यात ते समीक्षक म्हणूनच विशेष ओळखले जातात. रससिद्धांताचे समर्थक म्हणून ते प्रसिद्ध असून त्यांच्यावर प्राचीन भारतीय काव्यशास्त्रातील भट्टनायक व अभिनवगुप्त, आधुनिक हिंदी साहित्यशास्त्राचे विद्वान पं. रामचंद्र शुक्ल व पाश्चात्त्य समीक्षकांपैकी बेनीदेत्ती क्रोचे व आय्. ए. रिचर्ड्‌स यांचा प्रभाव पडलेला आहे. त्यांच्या मते फ्रॉइडचे मनोविश्लेषण रससिद्धांताला पोषकच आहे. भारतीय आणि पाश्चात्त्य समीक्षापद्धतींचा समन्वय त्यांच्या लेखनात आढळून येतो. विचारांची गंभीरता, स्पष्टता, तर्कशुद्ध शैली, अनुभूतींवर आधारलेले विवेचन इ. वैशिष्ट्यांमुळे त्यांचे लेखन लोकप्रिय व प्रेरक झाले आहे.

रससिद्धांत  या ग्रंथात साहित्याच्या तात्त्विक अंगाचे सु. तीस वर्षे त्यांनी केलेले अध्ययन व चिंतन अत्यंत साक्षेपाने मांडले आहे. भारतीय रससिद्धांताची व्यापकता, सर्वसमावेशकता व साहित्याचा निकष म्हणून असलेली त्याची महती त्यांनी त्यात आवर्जून सिद्ध केली आहे. भारतीय आणि पाश्चात्त्य काव्यशास्त्रांच्या सखोल व तुलनात्मक अध्ययनातून त्यांनी असे मत व्यक्त केले आहे, की सैद्धांतिक समीक्षेच्या क्षेत्रात भारतीय काव्यशास्त्र हे पाश्चात्त्य काव्यशास्त्रापेक्षा खूपच प्रगत आहे. भारतीय व पाश्चात्त्य काव्यशास्त्रांचा व त्यांच्या पद्धतींचा समन्वय नगेंद्र यांच्या समीक्षेत आढळतो.

त्यांचे प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : वनमाला (काव्यसंग्रह, १९३७), सुमित्रानंदन पंत (१९३८), साकेत-एक अध्ययन (१९३९), विचार और अनुभूति (१९४४), देव और उनकी कविता (१९४९), रीतिकाव्य की भूमिका (१९४९), विचार और विवेचन (१९४९), आधुनिक हिंदी कविता की मुख्य प्रवृत्तियाँ (१९५१), रीतिकाल की भूमिका (१९५३), विचार और विश्लेषण (१९५५), भारतीय काव्यशास्र (१९५५), भारतीय काव्यशास्त्र की भूमिका (१९५५), भारतीय नाट्य साहित्य (संपा. १९५५), भारतीय वाङ्‌मय (१९५८), हिंदी साहित्य का बृहत् इतिहास (६ वा भाग, संपा. १९५८), अनुसंधान और आलोचना (१९६१), कामायनी के अध्ययन की समस्याए (१९६२), रससिद्धांत (१९६४), मानविकी पारिभाषिक कोश (संपा. साहित्य खंड, १९६५ व मनोविज्ञान खंड, १९६८), आलोचक की आस्था (१९६६), चेतना के बिंब (१९६७), पाश्चात्य काव्यशास्त्र : सिद्धांत और वाद (१९६७), भारतीय काव्यशास्त्र की परंपरा (१९७५), सियाराम शरण गुप्त इत्यादी. यांशिवाय त्यांनी ॲरिस्टॉटलच्या काव्यशास्त्राचा तसेच द सब्लाइमसारख्या ग्रंथांचे हिंदीत अनुवादही केले आहेत. इंडियन लिटरेचर (संपा. १९५९) सारखा आधुनिक भारतीय भाषा-साहित्यांचा आढावा घेणारा इंग्रजी ग्रंथही त्यांनी संपादित केला आहे.

संदर्भ : रांग्रा, रणवीर, संपा. डॉ. नगेंद्र: व्यक्तित्व और कृतित्व, दिल्ली, १९६५.

बांदिवडेकर, चंद्रकांत