सुमित्रानंदन पंतपंत, सुमित्रानंदन : (२० मे १९००–२८ डिसेंबर १९७७). हिंदी काव्यातील छायावादी प्रवाहाचे प्रमुख प्रवर्तक. जन्म उत्तर प्रदेशात कौसानी (जि. अलमोडा) येथे. लहानपणीच त्यांची  आई वारली. वडिलांनी व आजीने त्यांचे पालनपोषण केले. मूळ नाव गुसाई दत्त. काव्यलेखनासाठी त्यांनी आपले मूळ नाव बदलून ‘सुमित्रानंदन’ हे टोपण नाव घेतले. कुशाग्र बुद्धी आणि जातिवंत प्रतिभा लाभलेले ते हिंदीतील श्रेष्ठ कवी होत. महाविद्यालयीन शिक्षणासाठी बनारस येथील क्वीन्स कॉलेजात त्यांनी नाव दाखल केले तथापि असहकाराच्या चळवळीच्या वेळी त्यांनी शिक्षण सोडून दिले. स्वभाव समाजभीरू आणि एकांतप्रिय असल्यामुळे ते प्रत्यक्ष राजकारणापासून तसे दूरच राहिले. मात्र स्वाध्यायाने त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाची उणीव भरून काढली. संस्कृत, बंगाली व इंग्रजी भाषा-साहित्यांचाही त्यांचा व्यासंग होता. विशेषतः इंग्रजी काव्याचे सखोल परिशीलन त्यांनी केले, १९५०–५७ पर्यंत ‘आकाशवाणी’वर हिंदी विभागप्रमुख म्हणून व १९५८ नंतर सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. वेळोवेळी त्यांना विविध पुरस्कार व बहुमानही प्राप्त झाले. सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार (१९६२), सन्मान्य डी.लिट्. (विक्रम विद्यापीठ–१९६५ व गोरखपूर विद्यापीठ–१९६९), हिंदी साहित्य संमेलनाकडून साहित्य वाचस्पती (१९६४) तसेच नागरी प्रचारिणी सभा व उत्तर प्रदेश सरकारकडूनही विविध पुरस्कार त्यांना लाभले.

त्यांनी काव्यरचनेस १९१६ पासून सुरवात केली. त्यांचे आरंभीचे काव्यसंग्रह उच्छवास (१९२०) व ग्रंथि (१९२०) हे होत. त्यांच्या १९१६–२७ ह्या काळातील कवितांचा संग्रह १९२७ मध्ये वीणा या नावाने प्रसिद्ध झाला. १९२८ मध्ये त्यांचा पल्लव हा महत्त्वाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि तो अतिशय गाजलाही. हिंदीमध्ये ज्याला छायावादी काव्य म्हणतात, त्याची सर्व वैशिष्ट्ये, गुणदोष, सामर्थ्य आणि मर्यादा त्यांच्या पल्लव या संग्रहात आढळतात. सौंदर्याचे वेड, स्त्रीकडे पहाण्याची उदात्त दृष्टी, करुणा व अश्रू यांच्याकडे असलेली स्वाभाविक ओढ, सूक्ष्मतेचा हव्यास, नवी प्रतीके आणि प्रतिमा यांचा चपखल उपयोग, विशेषणविपर्यास इ. पाश्चात्य प्रभावातून आलेले काव्यविशेष तसेच स्वर, नाद आणि रंग यांत तल्लीन होण्याची तरल संवेदनशीलता, निसर्ग-घटनांबद्दल सानंद आश्चर्य, कौतुक व जिज्ञासा ही सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या पल्लवमध्ये आढळतात. या संग्रहास असलेली त्यांनी प्रस्तावना तिच्यातील काही आक्रमक विद्यानांमुळे गाजली. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या व्रज या काव्यभाषाविरुद्ध पंतांनी खडी बोलीचा पक्ष हिरिरीने तर मांडलाच पण तिच्या उज्ज्वल भविष्याची खात्रीही आपल्या काव्यरचनेच्या आधारे पटवून दिली. या प्रस्तावनेत सुमित्रानंदन भाषेचे–विशेषतः काव्यभाषेचे–केवढे मर्मज्ञ होते, याचाही पुरेपूर प्रत्यय येतो.

ग्रंथि, वीणा, पल्लव या काव्यसंग्रहांत पंताचे निसर्गप्रेम प्रकर्षाने प्रत्ययास येते. निसर्गाच्या मनोरम रूपांची अतिशय सुंदर दृक्‌चित्रे या संग्रहांत प्रचुर रूपांत आढळतात. त्यांच्या विलक्षण कल्पनाशक्तीचे वैभव या निसर्गचित्रांकनात आढळते. पंत विचाराने आणि परिणामतः काव्यमद्येही गतिशील राहिलेले आहेत. गुंजन (१९३२) मध्ये ते माणसाच्या सुखदुःखाबद्दल अधिक जागरूक झालेले दिसतात. पुढे त्यांच्यावर गांधीवाद व साम्यवाद या दोहोंचाही प्रभाव पडलेला दिसतो आणि त्यांत ते समन्वय करण्याचाही प्रयत्न करताना दिसतात. युगान्त (१९३६), युगवाणी (१९३९), ग्राम्या (१०४०) या संग्रहात ते पल्लवमधील कवितांपेक्षा काहीशा वेगाळ्या कविता लिहिताना दिसतात. या संग्रहांत त्यांची कविता विचारांनी शोषून घेतल्याचा भास होतो. १९३०–४० या कालावधीतील कालाकांकर या गावातील वास्तल्यानेही त्यांच्यावर पुरता प्रभाव टाकलेला दिसतो. परिणामतः ग्राम्यामध्ये भारतीय खेड्यांतील जीवनाची चित्रे आली आहेत. पुढे उदय शंकर या प्रख्यात नर्तकाबरोबर त्यांना भारतभर प्रवास घडला आणि त्यांचा योगी अरविंदबाबू यांच्याशीही संबंध आला. अरविंदांच्या तत्त्वज्ञानाने ते भारावून गेले आणि त्यांच्या काव्यात पुन्हा एकदा परिवर्तन पडून आले. १९४६ नंतरचे त्यांचे काव्य म्हणूनच नवमानवतावादी आहे. अरविंदाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. स्वर्णकिरण (१९४७), स्वर्णधूली (१९४७), युगपथ (१९४८), उत्तरा (१९४९), वाणी (१९५७), हे काव्य संग्रह मानवाच्या उज्ज्वल भविष्याविषयी आणि त्याच्या अंतिम श्रेयस प्राप्त करण्याच्या सामर्थ्याविषयी कवीचा आशावाद व्यक्त करतात. ग्राम्यामध्ये किंचित झाकळलेला आशावाद येथे नव्या जोमाने उसळताना दिसतो. सौंदर्य, आनंद, माधुर्य आणि आदर्श या त्यांच्या मूळ भूमिकेकडे ते परतलेले दिसतात. त्यांच्या कला ओर बूढा चाँद (१९५७) या संग्रहातील कवितांवर प्रयोगवादी रचनेचा प्रभाव पडलेला दिसतो. त्यांच्या या काव्यसंग्रहाला साहित्य अकादेमीचा १९६१ मध्ये पुरस्कार लाभला. त्यांनी लोकायतन (१९६४) नावाचे महाकाव्यही लिहिले. भारत सरकारने या काव्याला १५ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक दिले. भारतीय ज्ञानपीठाचाही सर्वोच्च पुरस्कार मिळविण्याचा मान १९६८ मध्ये त्यांच्या चिदंबरा (१९५९) ह्या १९३७–५७ मधील निवडक कवितांच्या संग्रहास लाभला. चिदंबरामध्ये त्यांच्या काव्याच्या दुसऱ्या परिवर्तनातील निवडक कविता संकलित केलेल्या आहेत. या काळातील भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतिबिंब ह्या कवितांत पडले आहे. कवीने आपल्या मर्यादित त्या काळाचे अंतर्बाह्य जीवन चित्रित करून त्यांतील प्रेरणांना नव्या मानवतावादी कल्पनेतून अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.


काव्याखेरीज त्यांनी काही काव्यरूपके, नाटके व कथासंग्रहही लिहिले आहेत. ज्योत्स्ना (१९३४) हे नाटक रजतशिखर (१९५१), शिल्पी (१९५२), अलिमा (१९५५), सौवर्ण (१९५७) इ. त्यांची काव्यरूपके विशेष प्रसिद्ध आहेत. पाँच कहानियाँ (१९३६) हा त्यांचा कथासंग्रह आहे. गद्यपथ हा त्यांचा समीक्षात्मक ग्रंथ आणि साठ वर्ष–एक रेखांकन (१९६०) हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे.

सुमित्रानंदन पंतांनी हिंदी काव्य अनेक दृष्टींनी समृद्ध केले. नवनव्या सामाजिक व सांस्कृतिक विचारांनी त्यांनी आपली कविता सातत्याने समृद्ध करत नेली. भौतिकता व आध्यात्मिकता यांच्यातील द्वैत दूर सारून उच्च नैतिक आदर्शाची आवश्यकता त्यांनी आपल्या काव्यातून सतत प्रतिपादन केली. हिंदी खडी बोली ही सूक्ष्मातिसूक्ष्म भावकल्पनांना अभिव्यक्त करण्यास समर्थ असल्याची साक्ष त्यांनी स्वतःच्या काव्यावरून पटविली. कमालीचे मार्दव व गाढ व्यंजनाशक्ती आपल्या काव्यातून अभिव्यक्त करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी खडी बोलीचा समर्थ वापर करून सिद्ध केले. काव्याचे माध्यम म्हणून येणाऱ्या शब्दांच्या सूक्ष्म अर्थच्छटा, ध्वनिवलये, नादशक्ती, विशिष्ट सूचनशक्ती यांचा अतिशय मूलगामी व सूक्ष्म विचार त्यांनी केला. नवे विचार व नव्या जाणिवा व्यक्त करण्यासाठी जागरूक असलेला हा कवी आपल्या मर्यादांचे उल्लंघन करण्याचा सतत प्रयत्न करतो. त्यांची दृष्टी विश्वातील विसंगती, विषमता व भयावहता पाहत असताना दुर्दम्य आशावादी भूमिकेतून मंगल भविष्याची स्वप्ने पाहण्यातही रमते. त्यांच्या काव्याच्या मूल्यमापनाबद्दल हिंदी विद्वानांमध्ये तीव्र मतभेद आहेत पण त्यांनी केलेली हिंदी भाषेची सेवा व एक श्रेष्ठ कवी म्हणून असलेले त्यांचे हिंदीतील महत्त्वपूर्ण स्थान सर्वाकडूनच निर्विवादपणे मान्य केले जाते. अलाहाबाद येथे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

संदर्भ : १. अरविंद, पंत की काव्यसाधना, पाटणा, १९५३.

    २. गुप्त, रामचंद्र, पंत की काव्यकला और जीवदर्शन, आग्रा, १९५४.

    ३. नगेंद्र, सुमित्रानंदन पंत, आग्रा, १९५२.

    ४. वाजपेयी, नंददुलारे, कवि सुमित्रानंदन पंत, दिल्ली, १९७६.

    ५. विश्वंभरनाथ ‘मानव’, सुमित्रानंदन पंत, अलाहाबाद, १९५४.

    ६. शर्मा, विजयकुमार, युगकवि पंत की काव्यसाधना, दिल्ली, १९६२.

    ७. सिन्हा, कृष्णकुमार, आधुनिक कवि पंत, पाटणा, १९५३.

बांदिवडेकर, चंद्रकांत