चौहान, सुभद्राकुमारी : (५ ऑगस्ट १९०५—१५ फेब्रुवारी १९४८). प्रसिद्ध हिंदी कवयित्री. जन्म अलाहाबाद जवळील निहालपूर येथे. शिक्षण अलाहाबाद येथे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर नवलपूर येथील प्रसिद्ध वकील ठाकोर लक्ष्मणसिंह यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वेळोवेळी त्यांनी राष्ट्रीय आंदोलनात भाग घेऊन अनेक वेळा कारावासही भोगला. वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच त्या कविता रचू लागल्या. हिंदी साहित्यात कवयित्री म्हणून त्या विशेष प्रसिद्ध असल्या, तरी त्यांनी कथा व निबंधलेखनही केलेले आहे. राष्ट्रभक्ती व कौटुंबिक जीवनातील सुख-दुःखाचे प्रसंग त्यांनी आपल्या काव्यात विशेष उत्कटतेने चितारले आहेत. 

सुभद्राकुमारी चौहान

वात्सल्यभावनेचा उत्कृष्ट परिपोष त्यांच्या काव्यात आढळतो. त्यांची कविता अत्यंत सुबोध आणि सरस आहे. राष्ट्रीय भावनेच्या ओजस्वीतेसोबतच कौटुंबिक भावभावनांची अवीट गोडीही त्यांच्या कवितेत आढळते. भावनाप्रधानता, स्वप्नमयता, आदर्शाची ओढ व उदात्तता हे हिंदीतील छायावादी (स्वच्छंदतावादाशी मिळत्या जुळत्या) काव्याचे विशेष त्यांच्या काव्यात आढळतात तथापि दुर्बोधता किंवा क्लिष्टता मात्र त्यात कुठेही आढळत नाही. त्यांच्या कथांत कौटुंबिक जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण व स्त्रीजीवनाबद्दल प्रगाढ सहानुभूती आहे. स्त्रीसुलभ कोमलता व ऋजुता त्यांच्या सर्वच लेखनात जाणवते. त्यांच्या कथांना दोन वेळा ‘सेक्सरिया पुरस्कार’ मिळाला. त्यांची कविता झाँशी की रानी  (१९२६), मुकुल  (१९३१) व त्रिधारा  (१९३५) यांत आणि कथा बिखरे मोती  (१९३२), उन्मादिनी  (१९३४) व सीधेसाधे चित्र  (१९४७) यांत संगृहीत आहेत. त्यांनी काही निबंध लिहिले आहेत. जबलपूर येथे त्यांचे निधन झाले.

बांदिवडेकर, चंद्रकांत