भट्ट, बालकृष्ण : (३ जून १८४४-२० जुलै १९१४). हिंदी साहित्येतिहासातील भारतेंदू युगातील प्रख्यात निबंधकार, समीक्षक व पत्रकार. जन्म अलाहाबाद येथे. त्यांचे वडील व्यापारी होते. मातेच्या संस्कारामुळे त्यांना शिक्षणाची गोडी लागली. प्रथम ते संस्कृत शिकले व नंतर अलाहाबादच्या मिशन स्कूलमधून मॅट्रिक झाले, नंतर याच शाळेत ते शिक्षक म्हणून काम करू लागले परंतु तेथील वातावरणात त्यांचे मन फार काळ रमू शकले नाही. त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व संस्कृतचा सखोल अभ्यास केला. प्रथम अलाहाबाद येथील सी.ए.व्ही.स्कूल या संस्थेत व नंतर कायस्थ पाठशाळा महाविद्यालयात त्यांनी संस्कृत अध्यापन केले परंतु आपल्या जहाल राजकीय विचांरामुळे त्यांना लवकरच ही नोकरीही सोडावी लागली, मध्यंतरीचा काळ आर्थिक अडचणीत हाल अपेष्टांत गेला. १८७७ मध्ये त्यांनी अलाहाबाद येथून हिंदी वर्धिनी सभेच्या वतीने हिंदी प्रदीप नावाचे मासिक सुरू केले. नाटक इतिहास, साहित्य, तत्त्वज्ञान, राजकारण, विविध विद्या, विनोद इ. विषयांचा चिकित्सक परामर्श ह्या मासिकात असे. व्यापक सामाजिक सांस्कृतिक प्रबोधनाच्या उद्यिष्टाने त्यांनी हे मासिक मोठ्या जिद्दीने निर्भीडपणे व चिकाटीने सलग ३३ वर्षे चालविले. १९०९ मध्ये ते बंद पडले. भट्ट यांच्या आयुष्याच्या शेवटी शेवटी श्यामसुंदर दास यांनी त्यांना हिंदी शब्दकोशाचे संपादक म्हणुन बोलावले परंतु थोडयाच अवधीत त्यांनी ते काम सोडले. अलाहाबाद येथेच त्यांचे निधन झाले.

भारतेंदूंच्या नंतरच्या काळातील निबंधकार, समीक्षक व पत्रकार, म्हणून बालकृष्णांचे हिंदी साहित्यातील स्थान मानाचे आहे. निबंधांव्यतिरिक्त त्यांनी समीक्षा, नाटक, कादंबरी व कथा हे साहित्यप्रकारही हाताळले पण त्यांचा हिंदी साहित्यावर निबंध, समीक्षा पत्रकारिता म्हणूनच ठसा विशेषत्वे उमटला. त्यांच्या लेखनावर भारतेंदूंचा प्रभाव पडलेला दिसतो. हिंदी प्रदिप हे मासिक चालवून आणि विविध विषयांवर उत्कृष्ट लेखन करून त्यांनी राष्ट्रजागृतीचे कार्य केले. पांडित्यपुर्ण, गंभीर शैलीपेक्षाही आत्माविष्कार करणारी ललितमधुर खेळकर शैली प्रथमच त्यांच्या निबंधात आढळून येते. ते हिंदीतील आद्य ललित निबंधकार मानले जातात. त्यांच्या निबंधाची एकूण संख्या हजारावर भरते आणि त्यातील सु. १०० निबंध उत्कृष्ट म्हणून गणले जातात. राजकीय, सामाजिक, साहित्यिक इ. विविध विषयांवर त्यांनी ते लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा हिंदी भाषेचे ‘ॲडिसन’ म्हणून गौरवपुर्ण उल्लेख केला जातो. त्यांच्या काळातील लेखकांवर त्यांचा बराच प्रभाव पडला व अनेक लोकांना प्रभाव पडला व अनेक लेखकांना प्रेरणाही मिळाली.

रामविलास शर्मा यांनी त्यांना हिंदी साहित्यसमीक्षेचे जनक म्हटले आहे. १८८१ मध्ये त्यांनी वेदांची मार्मिक समीक्षा केली. १८८६ मध्ये संयोगिता स्वयंवरावर कठोर टीका केली. प्राचीन अर्वाचीन साहित्याची त्यांनी वेळोवेळी साक्षेपी समीक्षा केली. हिंदीत सामाजिक जाणिवेच्या दृष्टीतून साहित्यसमीक्षा करण्याचा सर्वप्रथम प्रयत्न त्यांचाच आहे. त्यांनी काही कादंबऱ्या, कथा व सामाजिक पौराणिक नाटके लिहीली आहेत तथापि ती सामान्य दर्जाची आहेत. सामाजिक प्रेरणेतुन त्यांनी आपले बहुतांश लेखन केले. त्यांच्या उल्लेखनीय साहित्यकृती अशा : कादंबऱ्या-नूतन ब्रह्मचारी (१८८६), सो अजान एक सुजान (१८९०) तसेच गुप्त वैरी (१८८२), दक्षिणा (१८८४), रसातल (१८९२), हमारी घडी ह्या अपुर्ण कादंबऱ्या आहेत. नाटके-चंद्रसेन (१८७७), पद्मावती (१८७८), सीता वनवास (१८८२), नलदमयंती (१८९७), शिशुपालवध (१९०३), शिक्षादान या जैसेको तैसा (१९१२), पृथुचरित या वेणीसंहार (१९४८) इत्यादी निबंध-साहित्य सुमन (१८८६), भट्ट निबंधावली (२ भाग १९४१,४२), भट्ट निबंधामाला (२ भाग-१९४७).

संदर्भ : १. पुरोहित, गोपाल, निबंधकार बालकृष्ण भट्ट, लखनौ, १९१५.

           २. शर्मा, राजेंद्र प्रसाद, हिंदी गद्यके निर्माता पंडित बालकृष्ण भट्ट:जीवन और साहित्य, आग्रा, १९५८.

दुबे चंदूलाल द्रविड व्य. वि.