मिश्रबंधु : हे चार सख्खे बंधू. त्यांपैकी गणेशबिहारी मिश्र, श्यामबिहारी मिश्र आणि शुकदेवबिहारी मिश्र हे तिघे लेखक होते. विशेषतः श्यामबिहारी व शुकदेवबिहारी यांनी महत्त्वाचे लेखन केले. श्यामबिहारी (? १८७३–१९ फेब्रुवारी १९७४), शुकदेवबिहारी (१८७८–१९ मे १९५१) या दोघांचा जन्म इटौजा (जि. लखनौ) या गावी झाला. या दोघांचे शिक्षण कैनिंग कॉलेज, लखनौमध्ये झाले. श्यामबिहारी इंग्रजी घेऊन अलाहाबाद येथून एम्. ए. झाले. त्यांना पुढे अलाहाबाद विद्यापीठाने १९३७ मध्ये सन्मान्य डी.लिट. दिली. १८९७ मध्ये ते उपजिल्हाधिकारी झाले. १९२४–२८ ‘कौन्सिल ऑफ स्टेट’ मध्ये ते सन्मान्य सदस्य होते. ओर्छा दरबारातून त्यांना ‘रायराजा’ उपाधी दिली गेली. शुकदेवबिहारींनी १९०१ मध्ये वकिलीची परीक्षा पास केली. पाच वर्षे वकिली केली. पुढे ते मुन्सफ झाले. भरतपूर संस्थानात ते दिवाण होते. १९२७ मध्ये ब्रिटिश शासनाने त्यांना ‘रायबहादूर’ ही पदवी दिली. १९३० मध्ये ते यूरोपात गेले. १९३० मध्येच पाटणा विद्यापीठात ‘रामदीन सिंह रीडरशिप व्याख्यानमाले ’त ‘भारतीय इतिहास पर हिंदी का प्रभाव’ या विषयावर त्यांनी भाषणे दिली.

मिश्रबंधू समीक्षक व इतिहासलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. सुमारे हजार पृष्ठे होतील एवढी काव्यरचना त्यांनी ब्रज भाषेत केली. त्यांनी ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदीत कादंबऱ्यांना सर्वप्रथम पुरेपूर ऐतिहासिक आधार त्यांनी दिला परंतु ह्या कादंबऱ्या फारशा मनोरंजक व साहित्यगुणांनी संपन्न नाहीत.त्यांनी नेत्रोन्मिलन नावाचे नाटक लिहिले असून त्यात तत्कालीन कचेरीतील वातावरण रंगविले आहे. शिवाजी हे त्यांचे ऐतिहासिक नाटकही प्रकाशित झाले आहे.

मिश्रबंधूंचा १९११ मध्ये प्रकाशित झालेला हिंदी नवरत्न हा समीक्षात्मक ग्रंथ विशेष महत्त्वाचा आहे. त्यात हिंदीच्या नऊ कवींच्या काव्याची समालोचना आहे. मिश्रबंधु विनोद या नावाने १९१३ मध्ये तीन खंडांत प्रकाशित झालेल्या ग्रंथात हिंदी कवींची माहिती त्यांनी दिलेली आहे. १९३४ मध्ये या ग्रंथाचा चौथा खंड प्रकाशित झाला. यात आधुनिक काळातील कवींचा परिचय दिलेला आहे. हिंदी नवरत्न ग्रंथ म्हणजे कवींच्या समीक्षेचा प्रारंभ, असे डॉ. श्यामसुंदर यांनी नमूद केले आहे. कवीची कला, भाषासंवेदना, विचार, जीवनदृष्टी यांचा समालोचनेत समावेश करून हिंदी समीक्षेची पातळी त्यांनी वाढवली असे म्हणता येईल. रस, ध्वनी, गुण, अलंकार या व्यतिरिक्त अनेक बाबींचा समीक्षकाला विचार करावा लागतो, हे त्यांचे विधान महत्त्वाचे आहे. हिंदी समीक्षेत मूल्यमापन करणारी समीक्षा मिश्रबंधूंनी सुरू केली. कवींच्या मूल्यमापनामध्ये त्यांनी विवेचनाची विभागणी केली आहे. कवींच्या तीन श्रेणी करून त्यांत नऊ कवींचा विचार केला आहे. समीक्षेला आवश्यक तटस्थपणा, मूल्यमापनाचे निकष, कवींची सामाजिक-मानसिक पार्श्वभूमी यांबरोबरच तुलनात्मक दृष्टी या घटकांमुळे त्यांची समीक्षा महत्त्वाची ठरते. ‘शास्त्रीय समीक्षेचे प्रगल्भ स्वरूप’ असे त्यांच्या समीक्षेचे वर्णन भगवत्‌स्वरूप मिश्र यांनी हिंदी आलोचन-उद्‌भव और विकास या ग्रंथात केले आहे. मिश्रबंधु विनोदमध्ये शेकडो कवींच्या काव्याचे मार्मिक विवेचन त्यांनी केले आहे. त्यांची समीक्षा अर्थमीमांसा, भाष्य, आस्वादन, प्रशंसा या दृष्टींनी महत्त्वाची असून काही ठिकाणी ती संस्कारवादीही झाली आहे. कवींच्या काव्याचे मर्म, काव्याचा उत्कर्ष, त्यांची भाषा यांचे त्यांनी विश्लेषण केले असून भारतीय व पाश्चात्य समीक्षाप्रणालींचा समन्वयच आपल्या समीक्षालेखनात साधलेला आहे. त्यांनी मिश्रबंधु विनोद ह्या ग्रंथाला साहित्याचा इतिहास असे म्हटले नाही. मात्र आरंभी ‘संक्षिप्त इतिहास प्रकरणा’ मध्ये हिंदी साहित्याच्या इतिहासाची चर्चा केली आहे. साहित्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून हिंदी साहित्याची तीन युगांत-पूर्व, मध्य, उत्तर-त्यांनी वाटणी केली आहे. प्रत्येक युगाचे दोन दोन भाग केले आहेत. प्रारंभीच्या इतिहासाला दिले गेलेले नाव-‘आदिकाल’- मिश्रबंधूंनीच प्रवर्तित केले आहे. एक प्रकारे ग्रीअर्सननंतर मिश्रबंधूंनीच हिंदी साहित्याचा विधिवत इतिहास लिहिण्याच्या दृष्टीने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

मिश्रबंधूंचे महत्वाचे ग्रंथ असे : लव-कुश चरित्र (१८९९), श्री विक्टोरिया शतक (१९०१), हिंदी अपील (१९०१), भारत विनय (१९१६), पद्य पुष्पांजलि (१९२९) नाटक : नेत्रोन्मिलन (१९१५), पूर्व भारत (१९२२), उत्तर भारत (१९३२), शिवाजी (१९३७), ईशान वर्मन नाटक (१९३७), रामचरित्र (१९४४) कादंबरी : वीरमणि (१९१७), पुष्पमित्र (१९४४), चंद्रगुप्त मौर्य (१९४७), चंद्रगुप्त विक्रमादित्य (१९४८), स्वतंत्र भारत (१९५०), उदयन (१९५१), विक्रमादित्य निबंध : सुमनांजलि (३ भाग, १९२६), पुष्पांजलि (१९४१) धर्म-तत्त्वज्ञान : आत्मशिक्षण (१९१८), भारतीय धर्म और दर्शन (१९५०) इतिहास समीक्षाः हिंदी नवरत्न (१९११), मिश्रबंधु विनोद (३ भाग १९१३, ४ था भाग १९३४), भारतवर्ष का इतिहास, भारतीय साहित्य पर हिंदी साहित्य का प्रभाव (१९३४), हिंदी साहित्य का इतिहास (१९३५), बुद्धपूर्व का भारतीय इतिहास (१९३९), साहित्य पारिजात, हिंदी की गद्यशैली का विकास (१९५०) इत्यादी.

बांदिवडेकर, चंद्रकांत