भट्ट, पद्माकर : (१७५३-१८३३). हिंदी साहित्याच्या रितीकालातील शेवटचे श्रेष्ठ कवी, ‘पद्माकर’ या नावाने हिंदी साहित्यात ते प्रसिद्ध आहेत. जन्म सागर येथे. पद्माकरांचे मूळ घराणे आंध्र प्रदेशातील तथापि नंतर ते उत्तर भारतात विविध ठिकाणी स्थायिक झाले. पद्माकरांच्या वडिलांचे नाव मोहनलाल ते बांदा येथे राहत. बांदा येथेच पद्माकरांचा जन्म झाल्याचा काही अभ्यासक मानतात. काव्यप्रतिभेचा वारस त्यांना वंशपरंपरेने मिळाला. त्यांच्या वंशाचे नावच ‘कवीश्वर’ असे पडले होते. अमोघ पाडिंत्य आणि प्रतिमा शाली काव्यशक्तीमुळे अनेक दरबारांत त्यानां राजाश्रय मिळाला, निरनिराळ्या राजांकडून देणग्या मिळाल्या गावे इनाम मिळाली. तसेच जयपूरच्या राजाकडून ‘कविराज शिरोमणी’ ही पदवीही मिळाली. कानपूर येथे ते निधन पावले.
पद्माकर यांनी लिहिलेले बहुतेक सर्व काव्य राजांच्या आज्ञेवरून अगर त्यांच्या गौरवासाठी लिहिलेले आहे. जगदविनोद हा विशेष प्रसिद्ध असा रसविषयक विवरण ग्रंथ त्यांनी जयपूरच्या दरबारात लिहिला. यात नवरसांच्या वर्णनाबरोबर नायिकांचेही वर्णन आहे. शृंगारिक काव्यपरंपरेतील एक श्रेष्ठ ग्रंथ म्हणून यास मान्यता मिळाली आहे. जयपूर येथेच रचलेल्या पद्मामरण या अलंकारशास्त्रावरील ग्रंथात विविध अलंकारांचे निरूपण आहे. अलंकाराची लक्षणे व उदाहरणे देताना त्यांनी त्यात अनुप्रासांचा योग्य वापर केलेला आहे. पद्माकरांचे भाषेवरील प्रभुत्व या ग्रंथात विशेषत्वाने जाणवते.
हिम्मतबहादुर बिरूदावली, प्रतापसिंह बिरूदावली व आलीजाह प्रकाश अथवा आलीजाह सागर (१८२१) ह्या प्रबंध काव्यग्रंथाची रचना त्यांनी अनुक्रमे हिम्मतबहादुर, जयपुरचे प्रतापसिंह, व ग्वाल्हेरचे दौलतराव शिंदे याच्यां दरबारात केली. दौलतराव शिंदे याच्यांकडे असताना त्यानी संस्कृत हितोपदेशाचा हिंदीत गद्य पद्यात्मक अनुवाद केला.
कुष्ठरोग जडल्यामुळे आयुष्याची शेवटची सात वर्षे त्यांनी कानपूर जवळ गंगातीरी घालविली. तेथेच गंगा नदीच्या सौदर्याने मोहित होऊन गंगालहरी हा ग्रंथ लिहीला, प्रबोध-पचासा हा नीतिपर कवितांचा संग्रह आणि रामरसायन हे वाल्मीकी रामायणाचे दोहा चौपाई या छंदात केलेले भांषातर तसेच कपिल पचीसी वा ईश्वर पचीसी हे त्यांचे अन्य ग्रंथ होत. जगद्विनोदला मिळालेली लोकप्रियता त्यांच्या अन्य ग्रंथांस मिळू शकली नाही. काव्यशैली व भाषेवरील प्रभुत्व यामुंळे त्यांची तुलना ⇨ बिहारी व ⇨ तुलसीदास यांच्याशी केली जाते.
रीतिशास्त्राचे जाणकार, शृगांर व भक्तीसोबतच वीररसातही उत्कृष्ट रचना करण्यात निष्णात, मुक्तक व प्रबंध ह्या दोन्ही शैलींवर प्रभुत्व, उत्कृष्ट अनुवादक, भाषाप्रभू आणि ‘पचासा’-शैलींचे प्रवर्तक म्हणुन त्यांचे हिंदी साहित्यातील स्थान विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.
संदर्भ : मित्र, विश्वनाथप्रसाद संपा, पद्माकर ग्रंथावली वाराणसी, १९५९.
दुबे चंदूलाल द्रविड व्य. वि.