वर्मा, रामकुमार : (१५ नोव्हेंबर १९०५-५ ऑक्टोबर १९९०). आधुनिक हिंदी कवी, नाटककार व समीक्षक. जन्म मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यामध्ये. त्यांचे वडील लक्ष्मीप्रसाद डेप्युटी कलेक्टर व आई राजरानी देवी कवयित्री होती. तिच्याच मार्गदर्शनाखाली त्यांचे प्रारंभीचे शिक्षण झाले. सुरुवातीचे शालेय रामकुमार वर्माशिक्षण एक-दोन वर्षे मराठीतून झाले. अभ्यासाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांत, विशेषतः नाटकांत काम करण्यात, त्यांची चमक दिसून आली. वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांनी १९२२ मध्ये असहकाराच्या चळवळीत भाग घेण्यासाठी काही काळ शिक्षण सोडले पण आईच्या आग्रहाखातर ते पुन्हा चालू ठेवले. काही काळ  ‘रॉबर्ट्‍सन कॉलेज’, जबलपूर येथे त्यांनी शिक्षण घेतले व त्यानंतर प्रयाग विश्वविद्यालयातून हिंदी विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने एम्.ए. झाले. त्यांच्या हिंदी साहित्यका आलोचनात्मक इतिहास या प्रबंधाला नागपूर विद्यापीठाने डॉक्टरेट दिली. प्रयाग विश्वविद्यालयात प्रारंभी प्राध्यापक व पुढे हिंदी विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले व अखेर त्याच पदावर सेवानिवृत्त झाले. हिंदी साहित्य संमेलनाचे परीक्षा-मंत्री म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. रशियन सरकारच्या निमंत्रणावरून मॉस्को विद्यापीठात त्यांनी एक वर्ष हिंदीचे अध्यापन केले.

रामकुमार ह्यांना काव्यलेखनाची प्रेरणा त्यांचे कवी व वैद्य असलेले आजोबा छत्रसाल, रसिक वडील, संगीताची जाणकार व कवयित्री आई, तसेच शिक्षक विश्वंभरप्रसाद गौतम ‘विशारद’ यांच्याकडून मिळाली. त्यांच्या प्रारंभीच्या कविता विद्यार्थी पत्रातून प्रसिद्ध झाल्या. द्विवेदी युग व छायावादी युग यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काव्यरचनेला प्रारंभ केला. रहस्यवादी (गूढगुंजनपर) कवींमध्ये त्यांचे विशेष स्थान आहे. त्यांचे वीर हमीर (१९२२), चित्तौडकी चिता (१९२९), अंजलि (१९३०), अभिशाप (१९३१), निशीथ (१९३५), चित्ररेखा (१९३६), जौहर (१९४१) इ. काव्यसंग्रह उल्लेखनीय आहेत. तसेच हिंदी गीतिकाव्य (१९३१), कबीर पदावली (१९३८), आधुनिक हिंदी काव्य (१९३९) हे त्यांनी संकलन-संपादन केलेले काव्यसंग्रह होत. हिमहास (१९३५) हे गद्यगीत व एकलव्य (१९६४) हे खंडकाव्य त्यांनी लिहिले. त्यांच्या सुरुवातीच्या कविता सृष्टिवर्णनपर आहेत. पुढे मात्र केवळ बाह्य वर्णनावर भर देण्याऐवजी जडशीळ सृष्टी व सचेतन मानव यांतील परस्परसंबंध शोधणारी नवी दृष्टी त्यांच्या कवितांत दिसून येते. लौकिक जगतावर अलौकिक सत्तेचे वर्चस्व असल्याची जाणीवही त्यांत दिसते. आपल्या कवितांतून आपले जीवन उतरले आहे, अशी कवीची भावना आहे. कुतूहल, भावुकता, कल्पनासौंदर्य, रूपक व उत्प्रेक्षांचे रमणीय सौंदर्य इ. गुण त्यांच्या काव्यात दिसून येतात.

नाट्यक्षेत्रात, विशेषतः एकांकिका-लेखनात, त्यांनी विशेष कामगिरी केली. काही टीकाकारांच्या मते ते आधुनिक हिंदी एकांकिकांचे जनक होत. बादल की मृत्यु ही त्यांची पहिली एकांकिका १९३० मध्ये प्रसिद्ध झाली. पृथ्वीराजकी आँखे (१९३८), रेशमी टाई (१९४१), शिवाजी (१९४३), सप्त किरण (१९४७), चार ऐतिहासिक एकांकी (१९५०), रूपरंग (१९५१), कौमुदी महोत्सव (१९४९), विजयपर्व इ. त्यांचे एकांकी नाटक-संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सामाजिक एकांकिकांमध्ये मध्यमवर्गीय समस्यांचे चित्रण व समाजजीवनाचे वास्तव दर्शन घडते. त्यांत हृदयस्पर्शी घटनांचे प्रत्ययकारी चित्रणही आहे. त्यांच्या बऱ्याच एकांकिका आदर्शप्रधान आहेत. ऐतिहासिक नाट्यकृतींद्वारा त्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. त्यांच्या नाट्यकृतींचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रयोगक्षमता. शॉ, इब्सेन, माटरलिंक, चेकॉव्हप्रभृती पाश्चात्त्य नाटककारांचा त्यांच्यावर प्रभाव असला, तरी त्यांची मूलतः भारतीय असलेली प्रकृती त्यातून प्रकर्षाने उठून दिसते.

सृजनशील साहित्यनिर्मितीबरोबरच समीक्षाक्षेत्रातील त्यांची कामगिरीही मोलाची आहे. साहित्य समालोचना (१९२९), कबीरका रहस्यवाद (१९३०), हिंदी साहित्यका आलोचनात्मक इतिहास (१९३९) हे त्यांचे गाजलेले टीकाग्रंथ होत.

त्यांना विद्यार्थिदशेतच काव्यनिर्मितीबद्दलचे खन्ना पारितोषिक लाभले. चित्ररेखा काव्यसंग्रहाला हिंदीतील सर्वश्रेष्ठ ‘देव पुरस्कार’ (१९३६) सप्त किरण एकांकिका संग्रहासाठी ‘अखिल भारतीय साहित्य संमेलन’ पुरस्कार, विजयपर्व नाटकासाठी ‘मध्य प्रदेश शासन परिषदे’कडून प्रथम पुरस्कार, रिमझिम एकांकिका संग्रहाला राष्ट्रीय पारितोषिक (१९५०), पद्मभूषण पदवी, उत्तर प्रदेश शासनाकडून मंसूर पंथ ग्रंथाबद्दल पारितोषिक असे अनेक मान-सन्मान त्यांना लाभले. त्यांच्या काही ग्रंथांच्या चौदापर्यंत आवृत्त्या निघाल्या, हे त्यांच्या लोकप्रियतेचे एक गमक होय. अलाहाबाद येथे त्यांचे निधन झाले.

दुबे, चंदुलाल द्रविड, व्यं. वि.

Close Menu
Skip to content