सुमन, शिवमंगल सिंग : (५ ऑगस्ट १९१५ – ). हिंदी साहित्यातील छायावादोत्तर युगातील एक थोर कवी. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात उनाओ जिल्ह्यातील (उत्तर प्रदेश) झागरपूर खेड्यात झाला. सुरुवातीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एम्.ए. (१९४०) आणि पीएच्.डी. या पदव्या बनारस हिंदू विश्वविद्यालयातून घेतल्या आणि अध्यापन या व्यवसायाला वाहून घेतले. मध्य प्रदेशातील इंदूर व उज्जैन येथील महाविद्यालयांत अध्यापन करुन ते उज्जैनच्या माधव महाविद्यालयात प्राचार्य झाले व नंतर त्यांची विक्रम विद्यापीठात (उज्जैन) कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली (१९६८– ७८). त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश हिंदी संस्थानचे उपाध्यक्षपद (लखनौ) व कालिदास ॲकॅडेमीचे कार्यकारी अध्यक्षपद (उज्जैन) भूषविले. शिवाय भारतीय विद्यापीठांच्या संघटनेचे (नवी दिल्ली) ते सन्माननीय अध्यक्ष होते (१९७७-७८).

सुमन ह्यांनी विपुल काव्यलेखन केले असून त्यांच्या काव्यावर मार्क्सवादी पुरोगामी विचारसरणीचा प्रभाव जाणवतो. तसेच त्यांच्या भावकवितांतून सामाजिक वास्तवाची प्रखर जाणीव व्यक्त होते, तद्वतच सामान्य जनांच्या सुखदुःखांची प्रगल्भ जाण त्यांच्या प्रागतिक काव्यातून प्रकट होते. हिल्लोल (१९३९) या त्यांच्या सुरुवातीच्या काव्यसंग्रहातून रम्याद्‌भुत भाव आणि बंडखोर मानसिकता आढळते. ही वृत्ती अधिक आक्रमकतेने त्यांच्या प्रगल्भ प्रौढावस्थेत लिहिलेल्या प्रलय सृजन (१९५०) आणि जीवन के गान (१९४२) या दोन काव्यसंग्रहांतून दृग्गोचर होते. या संग्रहांतील ‘नई आग है’, ‘मॉस्को अभी दूर है’, ‘गांधी और निराला’, ‘सांसो का हिसाब’ इ. कविता ते विविध कार्यक्रमांतून जोशपूर्ण आवाजात सादर करीत.

त्यांचे काही महत्त्वाचे व सुप्रसिद्घ साहित्य पुढीलप्रमाणे : युग का मोल (१९४५), विश्वास बढता ही गया (१९४८), पर आँखे नही भरी (१९५६), विंध्य हिमालय (१९६०), मिट्टी की बारात (१९७२), वाणी की व्यथा (१९८०), कांटे अंगुठों की वंदनवारे (१९९१) हे सर्व काव्यसंग्रह महादेवी की काव्यसाधना (१९५१), गीती काव्य : उद्यम और विकास (१९९५) हे समीक्षाग्रंथ प्रकृति पुरुष कालिदास (१९६१) हे नाटक इत्यादी. हिंदीतील प्रगतिवादी काव्याला त्यांनी नवे सामर्थ्य प्राप्त करुन दिले. त्यांची भाषाशैली साधी, अनलंकृत, जोशपूर्ण, रसाळ आणि रांगडी तसेच बोली भाषेशी मिळतीजुळती आहे.

त्यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी देव पुरस्कार (१९५८), सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार (१९७४), साहित्य अकादेमी पुरस्कार (१९७४–मिट्टी की बारात या काव्यसंग्रहासाठी), पद्मश्री (१९७४), मध्य प्रदेश शासनातर्फे शिखर सन्मान (१९९३), भारत भारती पुरस्कार (१९९३) इ. विशेष महत्त्वाचे होत. यांशिवाय त्यांना भागलपूर विद्यापीठ व जबलपूर विद्यापीठ यांनी अनुक्रमे १९७३ व १९८३ मध्ये सन्माननीय डी.लिट्. ही पदवी प्रदान केली. त्यांनी अनेक देशांना सदिच्छा भेटी दिल्या. वृद्घापकाळाने त्यांचे उज्जैन येथे निधन झाले.

देशपांडे, सु. र.