हाथरसी काका : (१८ सप्टेंबर १९०६–१८ सप्टेंबर १९९५). हिंदी साहित्यातील प्रख्यात हास्य-व्यंग्य लेखक. त्यांचे मूळ नाव प्रभुलाल शिवलाल गर्ग. ‘हाथरसी काका’ हे त्यांचे टोपणनाव. एका नाटकातील त्यांच्या गाजलेल्या काकाच्या भूमिकेमुळे आणि हाथरस या त्यांच्या जन्मगावावरून ते ‘हाथरसी काका’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे शिक्षण इगलास (अलीगढ, उत्तर प्रदेश) येथे झाले. बालपणापासूनच त्यांना चित्रकला, नृत्य, नाट्य, संगीत यांची आवड होती. हिंदी, इंग्रजी, उर्दू , गुजराती, मराठी इ. भाषा त्यांनी आत्मसात केल्या. सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह रतनदेवी यांच्याशी झाला.

काका हाथरसी

१९३२ मध्ये हाथरसी काकांनी ‘संगीत कार्यालय’ नावाची संस्था हाथरसमध्ये काढली. तिचे मूळ नाव ‘गर्ग आणि कंपनी’. या प्रकाशनसंस्थेद्वारे त्यांनी भारतीय संगीत व नृत्यावर आधारित अनेक पुस्तके प्रकाशित केली. त्यांची पहिली कविता गुलदस्ता या मासिकात प्रकाशित झाली (१९३३). पुढे १९३५ मध्ये त्यांनी संगीतपत्रिका हे मासिक सुरू केले. या दोन्ही प्रकाशनांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या हास्य-व्यंग्य रचनांद्वारे तत्कालीन वाईट प्रथा, स्वार्थांधता, भ्रष्टाचार अशा अनेक गोष्टींवर आसूड ओढले. तत्कालीन दरबारी व धार्मिक वातावरणात अडकलेल्या संगीताला मोकळा श्वास दिला. तसेच तराणा, ठुमरी, धृपद-धमार अशा रचनांबरोबरच लोकसंगीत, गीत, गझल, कव्वाली यांसारख्या संगीतप्रकारांना लोकप्रिय करण्याचे कार्य त्यांनी केले. १९५७ मध्ये स्वातंत्र्ययुद्ध जन्मशताब्दीनिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर संपन्न झालेल्या कवी संमेलनात ‘क्रांति का बिगुल’ ही काव्यरचना त्यांनी सादर केली आणि ती सर्वोत्कृष्ट ठरली.

काका की कचहरी (१९४६), पिल्ला (१९५०), म्याऊ (१९५४), दुलत्ती (१९६१), काका के कारतूस (१९६३), काकदूत (१९६४), काका की फुलझडियाँ (१९६५), काका के कहकहे (१९६६), महामूर्ख संमेलन (१९६६), चकल्लस (१९६८), काकाकोला (१९६८), हसगुल्ले (१९६८), काका के धडाके (१९६९), कहं काका कविराय (१९७०), फिल्मी सरकार (१९७२), काका की चौपाल (१९८२), तुक्तम् शरणम् गच्छामी (१९८७), काका शतक (१९९२) इ. त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ होत. मीठी मीठी हँसायन हा त्यांचा हास्य-व्यंग्य शैलीतील एक कार्यक्रम आकाशवाणीवरून दररोज सलग ११ वर्षे प्रसारित झाला व त्याने एक विक्रम प्रस्थापित केला. मेरा जीवन : ए वन (१९९३) ही त्यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे. हास्यकवी संमेलनाची परंपरा निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. शिवाय आपल्या काव्यविषयक सादरीकरणाने देश-विदेशांतील अनेक व्यासपीठे त्यांनी गाजविली.

हाथरसी काकांच्या साहित्य, संगीत, कला इ. क्षेत्रातील कार्याची नोंद घेऊन भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला (१९८५). त्यांनी स्थापन केलेल्या विश्वस्त संस्थेमार्फत दरवर्षी सर्वोत्कृष्ट हास्यव्यंग्यकार साहित्यिकास संगीत सन्मान पुरस्कार देण्यात येतो.

हाथरसी काकांच्या स्मरणार्थ १८ सप्टेंबर हा दिवस ‘हास्यदिवस’ म्हणून घोषित केला गेला. दिल्लीतील एका उद्यानासही ‘ हाथरसी उद्यान’ असे नाव देण्यात आले आहे.

दीक्षित, दुर्गा; लवटे, सुनीलकुमार