सोबती, कृष्णा : (१८ फेब्रुवारी १९२५). प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार व कथालेखिका. गुजरात (पश्‍चिम पंजाब, पाकिस्तान) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे आरंभीचे शिक्षण दिल्ली व सिमला येथे झाले. लाहोर येथे त्या उच्च शिक्षण घेत असताना त्यांचे कुटुंब फाळणीमुळे निर्वासित म्हणून भारतात आले. त्यानंतर त्यांनी लेखन हाच आपला व्यवसाय निश्‍चित केला. आरंभी त्यांनी काव्यलेखन केले असले, तरी अल्पकाळातच त्या कथा-कादंबरी लेखनाकडे वळल्या.

कृष्णा सोबती

‘लामा’ व ‘नफिसा’ या त्यांच्या कथा १९४४ मध्ये प्रसिध्द झाल्या. ‘दो राहें : दो बाहें’ (१९५९) ही त्यांची कथा ग्यारह सपनोंका देश या त्यांच्या कादंबरीतील एका प्रकरणाच्या रूपात आधी प्रसिद्ध झाली आणि नंतर तिला कादंबरीरूप प्राप्त झाले. अन्य कथासंग्रहांपैकी बादलोंके घेरे (१९८०), यारों के यार तीन पहाड (१९८९) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह होत.

चन्ना ही त्यांनी १९५२ मध्ये लिहिलेली त्यांची अप्रकाशित कादंबरी पुढे अनेक वर्षांनी पुनर्लेखनाच्या स्वरूपात जिंदगीनामा या शीर्षकार्थाने १९७९ मध्ये प्रसिद्ध झाली. सर्व पंजाबची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी व लोकजीवन या कादंबरीच्या केंद्रस्थानी असून धीट (बोल्ड) स्त्री-व्यक्तिरेखांद्वारे समाजातील विसंगतींवर त्यांनी प्रहार केला आहे. डर से बिछडी (१९५८), मित्रो-मरजानी (१९६६), सूरजमुखी अंधेरे के (१९७२), ए लडकी (१९९१), दिलो-दानिश (१९९३), समय सरगम (२०००) या त्यांच्या अन्य कादंबऱ्या होत. त्यांच्या कादंबऱ्यांतील व्यक्तिरेखा वास्तववादी असून, विशेषत्वाने त्यांनी आपल्या स्त्री-व्यक्तिरेखांना सामर्थ्यशाली रूपांत चित्रित केले आहे. मित्रो-मरजानीमध्ये परंपरावादी कुटुंबाच्या चौकटीत बंदिस्त झालेल्या एका विवाहित स्त्रीच्या लैंगिक व्यथांचे धीट व प्रत्ययकारी चित्रिण केले आहे. सूरजमुखी अंधेरे के या कादंबरीत त्यांनी एका बलात्कारित बालिकेच्या उद्ध्वस्त जीवनाचे चित्रण केले असून तिच्या समस्यांचे, अंतर्बाह्य साकल्याने चितारले आहेत.

सोबती यांनी ‘हशमन’ या टोपणनावानेही काही लेखन असून त्यांच्या अन्य ललित लेखनात हम हशमत (१९७७) या व्यक्तिचित्रसंग्रहाचा (काही लेखक व आप्तजन यांची शब्दचित्रे) समावेश होतो. तसेच सोबती-एक सहसोबत (१९८९) हा लेखसंग्रह; पहाडोंसे लिखे दो पत्र हे प्रवासवर्णन व शब्दोंके आलोक में  हे आत्मचरित्रपर लेखन हे त्यांचे अन्य उल्लेखनीय ललित साहित्य होय. त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्यांचे विविध भारतीय भाषांतून व इंग्रजीतूनही अनुवाद झाले आहेत. त्यांच्या दिलो-दानिश या कादंबरीचा रीमा आनंद व मीनाक्षी स्वामी यांनी द हार्ट हॅज इट्स रीझन्स (२००५) या शीर्षकाने इंग्रजीत अनुवाद केला असून या अनुवादित साहित्यकृतीला क्रॉसवर्ड पुरस्कार लाभला आहे. सोबती यांची भाषाशैली आवेशपूर्ण, चटकदार, प्रभावी व ओघवती आहे. त्यांनी दिल्ली प्रशासनाच्या ॲडल्ट्स एज्युकेशन पत्रिकेच्या संपादिका; ‘निराला सृजन पीठ’, भोपाळच्या निवासी लेखिका; वर्धा येथील महात्मा गांधी विद्यापीठाच्या सदस्या; ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या विश्वस्त इ. विविध नात्यांनी संपादन व लेखनकार्य केले आहे. त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांमध्ये जिंदगीनामा या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार (१९८०), साहित्य शिरोमणी पुरस्कार (१९८१), हिंदी अकादेमी पुरस्कार (१९८२), मैथिलीशरण गुप्त पुरस्कार, साहित्य कला परिषद पुरस्कार, साहित्य अकादेमी फेलोशिप (१९९६), कथा चुडामणी पुरस्कार (१९९९), शलाका पुरस्कार (२०००–२००१) इत्यादींचा समावेश होतो. भारत सरकारने देऊ केलेला ‘पद्मभूषण’ हा किताब (२०१०) त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेपासून दूर राहून आपले लेखन स्वातंत्र्य जपण्यासाठी नाकारला.

पोळ, मनीषा