चतुर्वेदी, माखनलाल : (४ एप्रिल १८८९—३० जानेवारी १९६८). हिंदीतील प्रसिद्ध कवी, निबंधकार, नाटककार, पत्रकार व देशभक्त. मध्य प्रदेशात बावई येथे एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे घराणे राधावल्लभ संप्रदायाचे अनुयायी होते. त्यामुळे माखनलाल यांच्या मनावरही वैष्णव संप्रदायाचा खोल संस्कार झाला. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी घरीच संस्कृतचे अध्ययन केले. नंतर त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली, ‘एक भारतीय आत्मा’ ह्या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. १९२१ मध्ये त्यांनी स्वातंत्र्यआंदोलनात भाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला. प्रभा, कर्मवीर, प्रताप  ह्या नियतकालिकांचे ते संपादक होते. भरतपूर येथील ‘संपादक संमेलना’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले (१९२७). हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमानही त्यांना मिळाला (१९४३). १९५९ मध्ये सागर विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डी. लिट्‌. देऊन आणि १९६३ मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला.

माखनलाल चतुर्वेदीत्यांच्या काव्यात वरकरणी विरोधी भासणाऱ्या गुणांचा आणि वैशिष्ट्यांचा सुखद व कलात्मक उत्कर्ष साधणारा समन्वय आढळतो. त्यात भक्तकवीची नम्रता, समर्पण भावना व बंडखोर राष्ट्रीय बाण्याच्या कवीचा आवेश, स्फोटक विचार यांचा मिलाफ आहे. आत्मसमर्पणाची त्यागमय वृत्ती आणि पुरुषार्थाचा समर्थ हुंकार त्यांच्या काव्यात एकाच वेळी आढळतो. आज व माधुर्य, वीरत्व व करुणा, संयम व अनिर्बंधता, भावना व कल्पना यांचा समन्वय त्यांच्या काव्यात प्रत्ययास येतो. त्यांनी देशभक्तीने ओथंबलेली कविता लिहिली आहे व त्यासोबतच तत्कालीन राजकीय व सामाजिक घटनांविषयीही आपली काव्यात्मक प्रतिक्रिया नोंदवली आहे. देशभक्तीशिवाय त्यांच्या काव्यात इतरही अनेक प्रवृत्ती आढळतात. आध्यात्मिक आणि गूढगुंजनपर कविताही त्यांनी लिहीली आहे. त्यांच्या या कवितेवर वैष्णव संप्रदाय, निर्गुण भक्तिसंप्रदाय आणि सूफी पंथ ह्यांच्या विचारप्रणलींचा प्रभाव पडलेला दिसतो. त्यांची प्रेमपर कविता उत्कटतेने रसरसलेली आहे. प्रौढ वयात त्यांनी विशुद्ध निसर्गपर कविताही लिहिली आहे. उदा., बीजुरी काजल आँज रही   ह्या संग्रहातील त्यांची कविता. त्यांचे पुढील काव्यसंग्रह विशेष उल्लेखनीय होत : हिमकिरीटिनी (१९४२), हिमतरंगिनी (१९५२ – साहित्य अकादेमीचा ह्या संग्रहास पुरस्कार लाभलेला आहे), माता (१९५२), युगचरण (१९५६), समर्पण (१९५७), वेणु लो गुँजे धरा (१९६०) आणि बीजुरी काजल आँज रही (१९६४).

साहित्य देवता (१९४३) हा त्यांच्या ललित निबंधांचा संग्रह त्यातील वैशिष्ट्यपूर्ण काव्यात्मक गद्य शैलीसाठी हिंदी साहित्यात गाजला. कृष्णार्जुन युद्ध (१९१८) हे त्यांचे नाटक तत्कालीन ‘पारसी थिएटर’च्या प्रभावाने विकृत बनलेल्या नाट्यसाहित्यात आपल्या वेगळेपणामुळे नावाजले गेले. त्यांचा अमीर इरादे, गरीब इरादे (१९६०) हा निबंधसंग्रह त्यातील सूक्ष्म व मौलिक चिंतन, कल्पनाशक्ती आणि खास शैली या बाबतींत लक्षणीय आहे. समय के पाँवमध्ये म. गांधी, लो. टिळक इ. संबंधीचे त्याचे स्मृतिलेख आणि कला का अनुवाद (दुसरी आवृ. १९५६) ह्या संग्रहात त्यांच्या कथा संकलित आहेत. माखनलाल स्वतंत्र वक्तृत्वशैली लाभलेले प्रभावी वक्ते होते. त्यांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह चिंतक की लाचारी (१९६५) नावाने प्रसिद्ध झाला आहे. खांडवा येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : १. जोशी, श्रीकांत, संपा. माखनलाल चतुर्वेदी : यात्रा-पुरूष, दिल्ली, १९६९.

           २. कौशिक ऋषी जैमिनी ‘बरूआ’, माखनलाल चतुर्वेदी : जीवनी, बनारस, १९६०.

बांदिवडेकर, चंद्रकांत