बिहारी : (सु. १५९५-१६६३). रीतिकालीन एक श्रेष्ठ हिंदी कवी. जन्म ग्वाल्हेर येथे. त्याचे नाव बिहारीलाल की बिहारीदास हा वादाचा मुद्दा आहे तथापि ‘बिहारी’ ह्या नावाने तो प्रख्यात आहे. बिहारीचे शिक्षण आचार्य कवी केशवदासांकडे झाल्याचे मानले जाते. बिहारीच्या वडिलांचे नाव केशवराय पण हे केशवराय म्हणजे हिंदीतील रीतिकालीन प्रख्यात आचार्य ⇨ केशवदास (सु. १५५५ – सु. १६१७) होत, असे काही अभ्यासक मानतात तर काहींच्या मते बिहारीचे वडिल केशवदास नसून ते त्याचे गुरु होत. बिहारीच्या जन्मस्थानाबाबतही अभ्यासकांत मतभेद आहेत. ग्वाल्हेरऐवजी बसुआ गोविंदपूर किंवा मथुरा असे पर्याय त्याबाबत सांगितले जातात. जन्मवर्षाबाबतही १५९५ व १६०३ हे पर्याय मानले जातात. चरित्रविषयक हे वादाचे मुद्दे सोडता प्रख्यात काव्यग्रंथ बिहारी-सतसईचा तो कर्ता व जयपूरचे महाराजा जयसिंहाच्या दरबारात तो राजकवी होता, असे सर्वच अभ्यासक मानतात. बिहारीने ओर्च्छामध्ये (मध्य प्रदेश) संस्कृत, प्राकृत, उर्दु, फार्सी इ. भाषांचा अभ्यास केला. ⇨निंबार्क यांच्या संप्रदायाची त्याने दीक्षा घेतली होती तसेच रहीम (१५५६-१६२६) ह्या हिंदी कवीशीही त्याचा संबंध आला होता. जयपूरनरेश जयसिंह हे आपली पट्टराणी अनंतकुमारीच्या मोहपाशात इतके गुरफटले होते, की राज्यकारभाराकडे त्यांचे लक्षच नव्हते. बिहारी तेथे गेला असता, सरदारांनी त्याच्याशी विचारविनिमय करून बिहारीने लिहिलेला एक दोहा जयसिंहांकडे पाठविला. त्याचा भावार्थ असा : ‘हे भ्रमरा मध नसलेल्या व विकसित न झालेल्या कळीतच तू गुंतून राहिलास, तर पुढे काय स्थिती होईल?’ ह्या दोह्याने महाराज ताळ्यावर आले. त्यांनी बिहारीला एकेक दोह्याला एकेक सुवर्णमोहोर देऊन त्याच्याकडून अनेक सरस दोह्यांची रचना करून घेतली. ह्या दोह्याचा संग्रह म्हणजेच बिहारी-सतसई.

सु. ७१३ दोहे असलेल्या बिहारी-सतसई ह्या मुक्तक काव्याचा विषय मुख्यतः शृंगार आहे. सतसईतील दोह्यांची विभागणी तीन भागांत करता येईल. नीतिविषयक, अध्यात्मपर आणि शृंगारिक. यातील शृंगारीक दोह्यांची संख्या अधिक तर आहेच, पण सरसही आहे. हिंदीतील अन्य कुठल्याही ग्रंथास सतसईइतकी प्रतिष्ठा आणि लोकप्रियता लाभली नाही. तसेच रामचरित मानसाचा अपवाद सोडता सतसईखेरीज अन्य कुठल्याही हिंदी ग्रंथावर इतकी चर्चा व विवेचन झाले नाही. सतसईवर अनेक (सु. ५४) टीका व विवरणग्रंथ लिहिले गेले. ⇨’रत्नाकर’-जगन्नाथदास (१८६२-१९३२) यांनी संपादित केलेली बिहारी-सतसईची सटीक आवृत्ती सर्वोत्कृष्ट व प्रमाणभूत मानली जाते. हालकृत गाथासप्तशतीचा तसेच अमरुकृत शृंगार-शतक, भर्तृहरीकृत शृंगारशतक तसेच आर्यासप्तशती या ग्रंथांचा प्रभाव या काव्यावर आहे. इतकी अल्प काव्यरचना करून इतका मोठा सन्मान व लोकप्रियता प्राप्त झालेला कवी हिंदीत बिहारीशिवाय अन्य नाही. मुक्तकासारख्या रचनाप्रकाराचे अंतःसामर्थ्य व शृंगारिक आशयाचे सौंदर्य यांचा अपूर्व मेळ साधण्यात बिहारी यशस्वी झाला. त्याच्या लोकप्रियतेचे व प्रतिष्ठेचे हेच मर्म होय. मुक्तक प्रकारातील रचनेचा परमोत्कर्ष त्याच्या सतसईत आढळतो.

नायक-नायिकांच्या विरह व मीलन या दोन्ही अवस्थांचे चित्रण सतसईत आहे. शृंगाराचा रमणीय आविष्कार, कौशल्यपूर्ण अलंकारयोजना, लक्षणा आणि व्यंजनायुक्त शब्दप्रयोगांचा चपखल वापर, नीतिभक्तिविषयक विचार व सुभाषिते, अन्योक्ती-वक्रोक्तीचे अनेक प्रकार, अनेक विषयांचे व लोकव्यवहाराचे कवीचे ज्ञान इ. गुणांमुळे हे काव्य कलात्मक व लोकप्रिय झाले. त्यात प्रधान रस शृंगार असला, तरी वीर, हास्य इ. रसांचाही मनोज्ञ आविष्कार आढळतो. अनेक ठिकाणी त्यात वक्रोक्तीचा व अतिशयोक्तीचा हव्यासही दिसतो तथापि बहुतांश रचना सखोल अनुभूतीतून उतरली असल्याने कवी म्हणून त्याचे स्थान श्रेष्ठ ठरते. त्यच्या दोह्यांमध्ये स्वतंत्र कल्पकतेची भरारी, सूचकता, अर्थगांभीर्य, विशुद्ध ब्रज भाषेचा आविष्कार यांचा एकात्म व कलात्म प्रत्यय येतो. ह्या काव्याचे ‘गागर में सागर’ असे वर्णन केले जाते. ब्रज भाषेचे व्याकरण लिहावयाचे झाल्यास ते बिहारीच्याच भाषेवरून लिहावे लागेल, असे विद्वानांचे मत आहे. बिहारीची तुलना इतर श्रेष्ठ कवींशी केली जाते. बिहारी व ⇨देव (सु. १६७३-१७६०) यांच्या तुलनेने हिंदी साहित्यविश्व काही काळ विशेष गाजले.

बिहारीच्या प्रभावाने व अनुकरणाने हिंदीत सतसईसारखे अनेक ग्रंथ लिहिले गेले. उदा., मतिराम सतसई, शृंगार-सतसई, रतन हजारा तसेच नौसई, ग्यारहसइ इत्यादी. रसलीन (सु. १६८९-१७५०), पद्माकर भट्ट (१७५३-१८३३), ‘रत्नाकर’-जगन्नथदास या कवींवर बिहारी-सतसईचा खूपच प्रभाव पडला. ह्या काव्याने संस्कृतमध्ये पं. परमानंद यांनी व उर्दूत मुन्शी देवप्रसाद प्रीतम यांनी अनुवाद केले आहेत.

 पहा : हिंदी साहित्य (रीतिकाल).

 संदर्भ : १. गुप्त, गणपतिचंद्र, हिंदी काव्य मे शृंगारपरंपरा और महाकवि बिहारी, आग्रा, १९५९. 

           २. भगवानदीन, लाला, बिहारी और देव, वाराणसी, १९२६. 

           ३. मिश्र, कृष्णबिहारी, देव और बिहारी, लखनौ, १९२०. 

           ४. मिश्र, विश्वनाथप्रसाद, बिहारी की वाग्विभूति, वाराणसी.

           ५. ‘रत्नाकर’-जगन्नाथदास, संपा. बिहारी, रत्नाकर, लखनौ, १९२६.

 दुबे, चंदूलाल द्रविड, व्यं. वि.