‘हरिऔध’ – अयोध्यासिंह उपाध्याय‘हरिऔध’ – अयोध्यासिंह उपाध्याय : (१५ एप्रिल १८६५ –१६ मार्च १९४७). एक चतुरस्र हिंदी लेखक. त्यांनी हिंदी खडी बोलीत पहिले महाकाव्य रचले. ‘हरिऔध’ हे त्यांचे टोपणनाव. जन्म निजामाबाद (जि. आझमगढ, उत्तर प्रदेश) येथे झाला. वडिलांचे नाव भोलासिंह आणि आईचे नाव रुक्मिणीदेवी. त्यांचे पूर्वज मूळचे बदायूँचे. जहांगीर बादशहाच्या कारकीर्दीत त्यांचे घराणे दिल्लीचे रहिवासी होते पण राजकीय कोपामुळे त्यांना दिल्ली सोडून निजामाबादला जावे लागले. येथे त्यांनी धर्मांतर केले व शीख धर्म स्वीकारला.

हरिऔध यांनी प्रारंभीचे शिक्षण घरी घेऊन ते मिडल व्हर्नाक्युलर (इयत्ता सातवी) पास झाले (१८७९). नंतर काही वर्षांनी ते बनारसच्या क्वीन्स कॉलेजात दाखल झाले परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनामहाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले नाही. स्वप्रयत्नाने घरीच राहून वाचन-मनन करून संस्कृत, फार्सी, उर्दू , गुरुमुखी, पिंगल इ. भाषांत प्रावीण्य संपादून ते बहुभाषी झाले. हरिऔध यांनी शासकीय सेवापरीक्षा दिली व ते मंडल निरीक्षक झाले (१८८९). तत्पूर्वी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांचा विवाह अनंतकुमारींशी झाला होता (१८८४). घरदार, नोकरी सांभाळत ते सतत लेखन, वाचन, मनन व चिंतन यांत व्यग्र असत. त्यांचा लेखनातील व्यासंग पाहून त्यांची नियुक्ती बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या हिंदी भाषा विभागात मानसेवी अध्यापक म्हणून करण्यात आली. पुढे ते हिंदी भाषा विभागाचे प्रमुख झाले.

हरिऔध हे हिंदी साहित्यात कवी म्हणून सर्वश्रुत असले, तरी त्यांच्या लेखनाचा प्रारंभ मात्र गद्य लेखनाने झाला. त्यांनी प्रेमकांता कादंबरी लिहून हिंदी साहित्यात पदार्पण केले (१८९४). नंतर त्यांनी ठेठ हिंदी का ठाठ (१८९९) आणि अधखिला फूल (१९०७) या आणखी दोन कादंबऱ्या लिहिल्या. या दोन्ही सामाजिक कादंबऱ्या आहेत. पैकी ठेठ हिंदी का ठाठ मध्ये त्यांनी जरठ विवाहाचे दुष्परिणाम दाखवले आहेत. अधखिला फूल ही कादंबरी धर्माचे महत्त्व अधोरेखित करते परंतुधार्मिक अंधश्रद्धेचा विरोध नोंदवण्यासही ती विसरत नाही. हिंदी भाषाविकासाच्या दृष्टीने या दोन्ही कादंबऱ्या महत्त्वाच्या मानल्या जातात. ठेठ हिंदी का ठाठ मध्ये हरिऔध यांनी प्रतिज्ञापूर्वक हिंदी खडी बोलीगद्याचे समर्थन केले आहे. हा काळ भाषिक विकासाचा व आग्रहाचाकाळ असल्याने यास अधिक महत्त्व होते. अधखिला फूल मध्ये हरिऔध यांनी अनेक तद्भव शब्दांचा हेतुतः उपयोग केला. पुढे ते शब्द रूढ होऊन बोली भाषेचा अविभाज्य भाग बनले. त्यांनी ⇨ वॉशिंग्टन अर्व्हिंग लिखित रिप् व्हॅन् विंकल चा अनुवाद त्याच शीर्षकार्थाने केला. हरिऔध निबंधकारही होते. त्यांचे नीति निबंध, उपदेश कुसुम हे संग्रह बहुचर्चित झाले होते. हरिऔध विनोदाचेही व्यासंगी होते. विनोद वाटिका हा व्यंगात्मक निबंधसंग्रह त्यांनी सिद्ध केला. त्यांची भूमिका सुधारकाची होती. त्यांनी आपल्या साहित्यातून सामाजिक विसंगतीवर बोट ठेवत, त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. लोकजीवनाचे ते समर्थक होते. हरिऔध यांनी प्रद्युम्न विजय (१८९३) आणि रुक्मिणी परिणय (१८९४) या दोन नाटकांचे लेखन केले होते. या नाट्यलेखनावर ⇨ भारतेंदु हरिश्चंद्र यांच्या नाट्यलेखनाचा प्रभाव जाणवतो मात्र भारतेंदु हरिश्चंद्रांची नाटके काव्यात्मक होती. शिवाय ती ब्रज भाषेत लिहिलेली होती. हरिऔध यांनी त्यांना हिंदी खडी बोलीच्या गद्यशैलीत सादर केले. त्यांनी दोन महाकाव्येही रचली. शिवाय त्यांच्या कवितांचे १४ काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांचा रसिक रहस्य हा पहिला काव्यसंग्रह १८९९ मध्ये प्रकाशित झाला. अखेरपर्यंत ते काव्यरचना करत राहिले. त्यांच्या समग्र कविता प्रेमांबुवारिधि (१९००), उद्बोधन (१९०६), काव्योपवन (१९०९), कर्मवीर (१९१६), ऋतु मुकुर (१९१७), पद्यप्रसून (१९२५), चौखे चौपदे (१९३२), चुभते चौपदे (१९३२), बोलचाल (१९४०), रसकलस (१९४०) यांसारख्या काव्यसंग्रहांत संकलित आहेत. यांपैकी काव्योपवनमध्ये हरिऔध यांनी कल्पित छंदांची रचना केली असून त्यांच्या चौखे चौपदेमध्ये दोहा, कवित्व, सर्वेय्या इ. छंदरचना आढळते. चुभते चौपदेत लोकोक्तीचे प्राधान्य दिसून येते.

प्रियप्रवास (१९१४) आणि वैदेही वनवास (१९४०) ही त्यांची दोन महाकाव्ये. प्रियप्रवास हे कृष्णकथेवर आधारित विरहकाव्य आहे. कृष्ण मथुरेस गेल्यानंतर वृंदावनवासीयांच्या, मुख्यतः गोपिकांच्या, विरहाचे हे काव्य असून या काव्याची भाषा संस्कृत काव्याच्या रसात्मकतेची आठवण करून देणारी आहे. यात संस्कृत वर्ण-वृत्तांचा भरपूर उपयोग केला गेला आहे तथापि या काव्याच्या महाकाव्यात्मकतेबाबत तत्कालीन समीक्षकांत मतभेद दिसून येतात. आचार्य रामचंद्र शुक्लांसारख्या दिग्गज समीक्षकांनी त्यांच्या महाकाव्यात्मकतेपुढे प्रश्नचिन्ह उभे केले होते. तरीसुद्धा या महाकाव्याचे महत्त्व त्यातील कृष्णचरित्राच्या मानवीकरणात आहे. हरिऔधवर्णित या काव्याचा नायक कृष्ण देव हा अवतारी पुरुष नाहीतो लोकरक्षक नेता आहे. या आधुनिक दृष्टिकोणामुळेच त्यांचे प्रियप्रवास हे श्रेष्ठ काव्य ठरले कारण त्यांनी मध्यकालापासून प्रचलित कृष्णचरित्रास लोकरूप दिले. प्रियप्रवासच्या तुलनेत त्यांनी नंतर रचलेले वैदेही वनवास हे महाकाव्य लहान असले, तरी अधिक कलात्मक झाले आहे. यात हरिऔध यांनी सीतेचा वनवास चित्रित केला आहे. तो करुणरसाने भरलेला आहे. या महाकाव्याची भाषा रोजच्या व्यवहारातील असल्याने तिच्यात सहजपणा आला आहे.

हरिऔध यांचे समग्र काव्य बुद्धिवादी व पुरोगामी आहे. त्यांच्या काव्यात विषय, भाषा व शैलीची विविधता दिसून येते. त्यांच्या व्यक्तिगत आणि साहित्यिक व्यक्तिमत्त्वात समन्वयवादी वृत्ती आढळते. हिंदू-शीख, धर्म-देश, संस्कृत खडी बोली, भक्ती आणि सेवा, व्यक्ति-समाज, प्राचीन–आधुनिक असा सर्वसमावेशक संगम, अद्वैतता यांमुळेही हरिऔध काळाच्या पुढे असल्याचे लक्षात येते. हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले (१९२४). नागरी प्रचारिणी सभा, आरा (जौनपुर, उ. प्र.) तर्फे त्यांच्या साहित्यिक योगदानाच्या सन्मानार्थ गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. हरिऔध यांच्या प्रियप्रवास या हिंदी खडी बोलीतील पहिल्या महाकाव्यास त्या काळातील सर्वोच्च, प्रतिष्ठित ‘मंगलाप्रसाद पारितोषिक’ बहाल करण्यात आले होते.

निजामाबाद येथेच त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

संदर्भ : १. उमेशशास्त्री, हिंदी के प्रतिनिधी कवि, जयपूर, १९८०.

            २. चतुर्वेदी, राजेश्वरप्रसाद, हमारे कवी और लेखक, लखनऊ.

            ३. नगेंद्र हरदयाल, हिंदी साहित्यका इतिहास, नोएडा, २०१२.

            ४. वर्मा, धीरेंद्र व इतर, संपा. हिंदी साहित्यकोश, भाग २, वाराणसी, १९६३.

            ५. वर्मा, धीरेंद्र व इतर, संपा. हिंदी साहित्य, तृतीय खंड, प्रयाग, १९६९.

लवटे, सुनीलकुमार