पेरू–१ :(जांब हिं. अमरूद गु. जमरूख, जामफळ क. गोवा, पेरला इं. ग्वाहा लॅ. सिडियम गुयाव्हा कुल-मिर्टेसी). हा परिचित लहान काटक वृक्ष मूळचा मेक्सिकोतील व अमेरिकेतील इतर उष्ण प्रदेशांतील असून हल्ली उष्ण कटिबंधातील इतर प्रदेशांत त्याचा बराच प्रसार झालेला आहे. उंची जास्तीत जास्त ९ मी. पर्यंत असते. त्याचा विस्तार ५ – ६ मी. असतो. खोडावरील सालीचे पिंगट व जाडसर तुकडे सतत सुटून जातात. कोवळ्या फांद्या चौकोनी व पाने लंबगोल १० – १५ सेंमी. लांब व समोरासमोर असतात पानांत अंतर्धारी शिरा व पारदर्शक प्रपिंडांचे (ग्रंथींचे) ठिपके दिसतात. फुले लहान पांढरी १-३ फुलांचा झुबका एप्रिल-मेमध्ये पानांच्या बगलेत येतो. संदले पाच व
ती सतत फळावर राहतातप्रदले पाच व सुटीकेसरदले असंख्य, सुटी संवर्तावर उगवलेली अधःस्थ किंजपुटात ४—५ कप्पे व त्यांत अनेक बीजके असतात [→ फूल ]. मृदुफळ पिकल्यावर पिवळे ते पांढरा, पिवळट किंवा लालसर मगज ( गर ) व कठीण बियांनी भरलेले गोलसर किंवा कुंभाकृती व ५ सेंमी. किंवा अधिक लांब असते.स्वादिष्टपणामुळे ते आवडीने खातात. पोटदुखी आणि हिरड्यांमधून होणाऱ्या रक्तस्रावावर उपयोगी आहे.त्याची जेली, मुरंबे करतात व त्यांचा जेवणात वापर केला जातो. ते पौष्टिक, सारक व थंड असते आणि लाकूड कठीण असून कुर्हाडी व भाल्यांचे दांडे, कातीव वस्तू, बंदुकीचे दस्ते इत्यादींसाठी वापरतात. आसामात साल व पाने यांचा कातडी कमाविण्यासाठी व रंगविण्यासाठी उपयोग करतात. मुळाची साल स्तंभक ( आकुंचन करणारी ) असून जखमा व व्रण यांनी लावण्यास उपयुक्त त्यात ‘यूजेनॉल’ नावाचे बाष्पनशील ( बाष्परूपाने उडून जाणारे ) तेल असते. पानांचा काढा पटकीवर काही प्रमाणात गुणकारी. सालीचा काढा मुलांच्या अतिसारावर वापरतात. फळात क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते व ते सिट्रस वंशातील ( लिंबू वंशातील ) फळांशी तुलना करता ४ ते ५ पट अधिक असते. मात्र त्यात अ जीवनसत्वाचा अभाव असतो. फळांत ८१. ७ % जलांश, ०.९ % प्रथिने, ०.३ % स्निग्ध पदार्थ आणि ११.२ % इतर कार्बोहायड्रेट पदार्थ असतात.
पहा : मिर्टेसी.
वि. पं.
हवामान व लागवडीखालील क्षेत्र : पेरूला १०० सेंमी. पर्यंत वार्षिक पर्जन्यमान आणि हिवाळ्यात व उन्हाळ्यात कोरडे राहणारे उष्ण प्रदेशीय हवामान लागते. त्याखाली भारतात १९६० – ६५ च्या दरम्यान सु. ४९, ००० हेक्टर क्षेत्र होते. त्यापैकी ८,०१० हेक्टर बिहारमध्ये, २४,२९० हेक्टर उत्तर प्रदेशात आणि ४,०५० हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रात आहे. पेरूच्या उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश सर्वांत महत्त्वाचे राज्य आहे व त्यात भारतातील पेरूच्या एकूण क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र आहे. सबंध देशामध्ये व किंबहुना जगामध्ये उत्कृष्ट प्रकारांच्या पेरूच्या पैदासीकरिता अलाहाबादची ख्याती आहे. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत या फळाची लागवड होते परंतु विशेषेकरून ती नासिक, पुणे आणि जळगांव या जिल्ह्यांत आहे.
जमीन, लागवड व खते : पेरूची झाडे चुनखडीच्या वगैरे जमिनीत वाढू शकत असली, तरी ९० – १५० सेंमी. खोल, मध्यम काळी, पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन त्याला जास्त मानवते. पाण्याचा चांगला निचरा असलेल्या हलक्या प्रकारच्या जमिनीमध्ये हे फळझाड चांगले वाढते व बऱ्यापैकी उत्पन्न येते. लागवडीसाठी निवडलेली जमीन खोल नांगरून कुळवून भुसभुशीत आणि सपाट करतात. तिच्यामध्ये आखणी करून झाडात हमचौरस ४-५ मी. अंतर राहील अशा हिशोबाने ओळीत ९० x ९० x ९० सेंमी. मापाचे खड्डे खणून ते उन्हात तापू देतात. पावसाळ्याच्या आधी कुजलेले शेणखत आणि खड्डे खणताना निघालेली जमिनीच्या पृष्ठभागावरील माती यांच्या समप्रमाण मिश्रणाने भरून काढतात. पहिल्या पावसाने खड्ड्यातील माती खाली बसून जमिनीसपाट झाली म्हणजे त्यांच्यामध्ये पेरूची रोपे किंवा कलमे लावतात. उत्कृष्ट जातींच्या फळांसाठी कलमे पसंत करतात. ती भेट कलम, दाब कलम किंवा गुटी कलम पद्धतीने तयार केलेली असतात [ ® कलमे]. तमिळनाडू व प. बंगालमध्ये गुटी कलमे लावण्याचा प्रघात आहे. परंतु इतर भागात दाब कलमे विशेष पसंत केली जातात. कलमाची खड्ड्यात लागण केल्याबरोबर त्याच्या बुंध्याजवळची माती हाताने दाबून घट्ट बसवितात, त्याच्याजवळ ३–४ सेंमी. जाड, १.२५ – १.५० मी. उंच बांबू खोल रोवतात, त्याला २ -३ जागी कलम सुतळीने सैलसर बांधतात व लगेच पाणी देतात. वर्षभर त्यांची जोपसना करून दुसऱ्या वर्षी पावसाळ्यात प्रत्येकी १० किग्रॅ. शेणखत देतात. पुढे दरवर्षी १० किग्रॅ. प्रमाणे प्रमाण वाढवीत जाऊन पाचव्या वर्षी झाडाला ५० किग्रॅ. शेणखत देतात. हे प्रमाण झाडाच्या अखेरीपर्यंत कायम ठेवतात. याशिवाय दर झाडाला २ -३ किग्रॅ. पर्यंत यूरिया वरखत म्हणून घालतात. उन्हाळी हंगामात पाण्याची पाळी दर ८ – १० दिवसांनी आणि हिवाळी हंगामात २ ते ३ आठवड्यांनी देतात. लागणीनंतरच्या दुसऱ्या वर्षांत प्रत्येक झाडावर जमिनीपासून ९० सेंमी. उंचीवर चारही बाजूंना सारख्या वाढवील अशा ४–५ फांद्या ठेवून बाकीच्या सर्व छाटून टाकतात. पेरूच्या बागेत पहिली चारपाच वर्षे केळी, पपईसारखी फळझाडे आणि टोमॅटो, वांगी कांदे, लसूण वगैरे भाजीपाल्याची पिके लावतात. त्यांच्यापासून पेरूचे उत्पन्न सुरू होईपर्यंत आर्थिक मदत होते व पेरूच्या झाडांची जोपासनाही होते.
बहार व आंतर मशागत : पेरूला चवथ्या-पाचव्या वर्षी फळे धरू देतात. याच्या आधी आलेली फुले-फळे काढून टाकतात. आठव्या वर्षांपासून पुष्कळ फळे धरतात आणि त्यानंतर सु. ३० वर्षेपर्यंत चांगले उत्पन्न येते. पेरूला फुले–फळे येण्यासाठी बहार धरावा लागतो. भारतात साधारणत: मृग बहार धरतात. त्यासाठी झाडांना विश्रांती देतात. त्यांना मार्च ते मे महिन्यात पाणी देत नाहीत. मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात झाडांच्या रांगांमधील जमीन नांगरून आधी उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक झाडाच्या आळ्यामध्ये खत घालून नांगरलेली जमीन कुळवून आळी दुरुस्त करून माफक पाणी देतात. साधारणत: १०-१५ दिवसांत नवीन फूट निघून असंख्य फुले येतात. पुढे नियमितपणे पाणी देणे व तण काढणे हीच आंतर मशागतीची कामे असतात. फळे पाचसहा महिन्यांत पक्व होतात त्या वेळी त्यांच्या सालीवर पिवळसर रंग चढतो. अशी फळे झाडावरून हाताने तोडून काढतात. फळे झाडावर जास्त पक्व होऊ देत नाहीत कारण पाखरे त्यांचा नाश करतात अथवा ती गळून जमिनीवर पडल्यामुळे खराब होतात. तोडलेले पेरू प्रतवारी लावून करंड्यांत भरून विक्रीकरिता बाजारात पाठवितात.
प्रकार : सफेदा, लखनौ-४९, नासिक, धोल्का, धारवाड, चित्तीदार, करेला, हरीजा, गुलाबी वगैरे. लखनौ-४९ व धोल्का या प्रकारांची फळे मोठी, गर गोड, बी कमी असून नरम असते. लखनौ-४९ प्रकारची झाडे जोमदार वाढीची असून त्यांच्या फांद्या आडव्या पसरतात. त्यांना फळे जास्त लागतात. गराला मनपसंत स्वाद असतो. सर्वसाधारणपणे फळाचे वजन १६८ ग्रॅम भरते. फळांचा दर्जा स्थानिक प्रकारापेक्षा वरचढ असतो परंतु फळ चांगले टिकत नाही. धारवाड प्रकारची फळे मध्यम आकारमानाची, अंडाकृती व देठाकडे निमुळती असतात. बी पुष्कळ प्रमाणात आणि कठीण असते. फळे जास्त दिवस टिकतात. गर पांढरा किंवा गुलाबी असतो. नासिक प्रकाराची फळे बाटलीच्या आकाराची, गर पांढरा किंवा गुलाबी व बी पुष्कळ प्रमाणात असते. फळे जास्त दिवस टिकतात. उत्तर प्रदेशातील सफेदा प्रकारच्या फांद्या आडव्या वाढून जवळजवळ जमिनीस टेकतात. फळ गोल किंवा अंडाकृती गर पांढरा, मऊ आणि गोड असतो. फळाचे सर्वसाधारण वजन १६० ग्रॅम भरते. करेला हा उत्तर प्रदेशातील प्रकार असून त्याचा गर पांढरा आणि गोड असतो. फळे बाटलीच्या आकाराची असून साल खडबडीत असते. हरीजा हा बिहारमधील उत्कृष्ट प्रकार असून त्याची फळे गोल आणि पांढऱ्या गराची असतात. उत्तर प्रदेशातील चित्तीदार प्रकाराची फळे गोल असून त्यांचा गर पांढरा, मऊ आणि गोड असतो. फळावर अत्यंत लहान तांबडे ठिपके असतात. पेरूच्या झाडांचे आयुष्य ४० वर्षेपर्यंत असते.
उत्पन्न : बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडाला ८ ते १० वर्षांनंतर ४०० ते ५०० फळे धरतात व त्यांचे वजन ६४ ते ८१ किग्रॅ. असते. त्याच वयाच्या कलमी झाडाला दरवर्षी १,००० ते २,००० फळे धरतात. एक हेक्टरमधील कलमी झाडांपासून ३०,००० ते ५०,००० किग्रॅ. वजनाची फळे मिळतात. सामान्यत: १० ते २५ वर्षांच्या वयोमानात झाडे जास्त चांगले उत्पन्न देतात.
भोरे, द. पां.
रोग : हे कणखर झाड असल्याने त्यावर मर व खैरा यांव्यतिरिक्त अन्य गंभीर रोगांचा प्रादुर्भाव आढळत नाही.
मर : हा रोग फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम प्रकार सीडी या कवकामुळे ( बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे ) होतो. उत्तर प्रदेश व बिहार राज्यांत हा एक पेरूवरील महत्त्वाचा रोग मानला जातो. या रोगामुळे प्रथम पाने पिवळी पडून वाळतात आणि गळतात नंतर फांद्या वाळतात आणि कालांतराने सर्व झाड वाळून जाते. याकरिता रोगप्रतिकारक प्रकाराच्या झाडांचीच लागवड करतात.
खैरा : हा रोग कोलेटॉट्रिकम, ग्लोमरेल्ला सीडी आणि पेस्टॉलॉप्सीस सीडी या कवकांमुळे होतो. या रोगामुळे फळावर गोल तपकिरी ठिपके आढळतात. त्यांमुळे फळांच्या प्रतीवर परिणाम होतो. काही वेळा दूषित फळांची वाढ न होता ती आकारमानाने लहान राहतात. उपाय म्हणून १ टक्का बोर्डो-मिश्रण दर १५ दिवसांनी फवारतात. रोगाच्या सुरुवातीलाच फवारणी केल्यास रोगप्रसाराला आळा बसतो. झाडाच्या सालीवरील खैरा या रोगाचाही प्रादुर्भाव काही ठिकाणी आढळतो. त्याच्यामुळे साल वाळते व फांद्या सुकून मरतात.
जस्त या मूलद्रव्याच्या उणीवेमुळे पेरूवर केवडा रोग आढळतो. त्यावर उपाय म्हणून झिंक सल्फेटाचा विद्राव फवारतात.
कीड : पेरूवर खोडकिडा, खवले कीटक, फळमाशी यांचा उपद्रव आढळतो.
खोडकीडा : ही कीड भोके पाडून खोड व फांद्या पोखरते. त्यामुळे फांद्या वाळतात. उपाय म्हणून कीटकाने पाडलेल्या भोकांत पेट्रोल किंवा केरोसीनचा बोळा बसवितात.
खवले कीटक : पानांवर किंवा फळांवर हे कीटक आढळतात. उन्हाळ्यात त्यांचा उपद्रव तीव्र झालेला आढळतो. नियंत्रणासाठी फिश ऑइल, रोझीन सोप वा ०.०३ टक्के कसाचे डायझिनॉन फवारतात.
फळमाशी : या किडीमुळे बरेच नुकसान होते. फळमाशी फळाच्या सालीखाली अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या फळातील गर खात वाढतात. असली किडलेली फळे पक्व होण्यापूर्वीच पिवळी पडतात पण माणसांनी खाण्यासाठी निरुपयोगी असतात. यावर उपाय म्हणून किडकी फळे गोळा करून जाळून टाकतात आणि झाडावर बीएचसी मारतात.
रूईकर, स. के.
संदर्भ : 1. C. S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. 8, New Delhi, 1969.
2. I. C. A. R. Fruit Culture in India, New Delhi, 1963.
३. नागपाल, र.ला. अनु. पाटील, ह. चिं.फळझाडांच्या लागवडीची तत्त्वे आणि पद्धती आणि फळे टिकवून ठेवण्याची तत्त्वे आणि पद्धती, मुंबई, १९६३.
“