निर्बीजीकरण : (स्टरिलायझेशन). प्रजोत्पत्ती थांबविण्याकरिता पुरुष व स्त्री यांच्या शरीरांतील अनुक्रमे शुक्रवाहिनी आणि अंडवाहिनी या नलिकांवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांना निर्बीजीकरण म्हणतात. पुरुषातील शुक्राणू (प्रजोत्पादक पेशी) आणि स्त्रीमधील अंड यांचा मिलाफ झाल्याशिवाय गर्भधारणा होत नाही आणि म्हणून दांपत्यापैकी एकाचे निर्बीजीकरण केल्यास गर्भधारणा होत नाही.

निर्बीजीकरणाची माहिती मानवाला फार प्राचीन काळापासून असावी. पशूंचे खच्चीकरण त्याला अगोदर ज्ञात झाले असावे. अर्थात आधुनिक काळात ज्या हेतूने निर्बीजीकरण केले जाते तो हेतू त्या काळात त्याला अज्ञात असावा किंबहुना त्याला त्याची गरजही नसावी. इंग्रजी भाषेतील यूनक (eunuch) हा हिजडा, खोजा किंवा क्लीब या अर्थाचा शब्द मूळ ग्रीक भाषेतील ‘अंथरूण’ आणि ‘रक्षण’ या अर्थाच्या दोन शब्दांपासून बनला आहे. प्राचीन काळी गुलामांचे मुद्दाम खच्चीकरण करीत. कारण अशा गुलामांना जनानखान्याचे रक्षक नेमणे निर्धोक असे. यामागे जनावर जसे खच्चीकरणानंतर अधिक माणसाळते तसाच गुलामही अधिक विश्वासू बनविण्याचाही हेतू असावा. प्राचीन काळी काही धर्मांतून खच्चीकरण विधीच अस्तित्वात होता. रोमन सैन्याधिकारी जेव्हा घर सोडून वर्षानुवर्षे मोहिमेवर जात तेव्हा आपल्या स्त्रियांच्या रक्षणाकरिता ते असे हिजडे नेमीत. चीनमध्ये ख्रिस्तपूर्व ११०० च्या सुमारास खच्चीकरण प्रचारात होते. प्राचीन भारतात व्यभिचार केल्यास खच्चीकरणाची शिक्षा प्रचलित होती. अलीकडील काळात खच्चीकरणाचा उगम मेसोपोटेमियात झाला असे म्हणतात. बडोद्याच्या महाराजांनी १८८० च्या सुमारास या प्रथेस कायद्याने बंदी घातली. भारतात गुजरात, मध्य प्रदेश यांसारख्या काही राज्यांतून अजूनही ‘हिजडा संप्रदाय’ अस्तित्वात आहे. खुद्द मुंबईत हिजड्यांच्या अनेक वस्त्या आहेत.

खच्चीकरण हे खऱ्या अर्थाने निर्बीजीकरण होते. कारण जेथे शुक्राणू तयार होतात (बीज) ते वृषणच कापून टाकीत. त्यामुळे प्रजोत्पत्ती हमखास थांबत असे. मात्र संपूर्ण नपुंसकत्व प्राप्त होत असे. शिवाय खच्चीकरण कायम टिकणारे असल्यामुळे मैथुनक्षमताच संपूर्ण नाहीशी होत असे.

विज्ञान प्रगतीबरोबरच शरीररचनाविषयक ज्ञान जसे वाढत गेले तसे प्रजोत्पत्ती थोपविण्याकरिता शुक्राणू व अंड यांच्या मिलाफात अडथळे आणण्याचे निरनिराळे मार्ग शोधण्यात आले. याकरिता शोधण्यात आलेल्या सर्व उपायांचा समावेश ‘संततिप्रतिबंधात्मक’ उपायांत केला जाऊ लागला. वर उल्लेखिलेल्या शस्त्रक्रिया यातच मोडतात.

पुरुषातील शस्त्रक्रिया : पुरुषामध्ये वृषणकोशातील दोन्ही बाजूंस असलेल्या शुक्रवाहिनीचा छोटासा तुकडा (२ ते २·५ सेंमी.) कापून काढून टाकतात. या शस्त्रक्रियेला ‘शुक्रवाहिनीच्छेदन’ म्हणतात व ती केवळ काही मिनिटांत स्थानिक संवेदनाहारक अंतःक्षेपणाच्या (इंजेक्शनाच्या) प्रभावाखाली करतात. पुरुषातील आधुनिक शस्त्रक्रिया अत्यंत सोपी व निर्धोक आहे. अशा हजारो शस्त्रक्रिया केवळ बाह्योपचार म्हणून करता येतात. उपचारानंतर २४ ते ४८ तासांच्या आत रुग्ण सर्व काम पूर्ववत करू शकतो. कोणतीही लैंगिक दुर्बलता, वासनालुप्तता किंवा इतर मानसिक दुष्परिणाम आढळून येत नाहीत. छेदनशस्त्रक्रियेनंतर जरूर पडल्यास नलिका पुन्हा जोडता येतात. शुक्रवाहिनीविच्छेदनाऐवजी धातूचे चाप किंवा तांब्याची तार गुंडाळून वाहिन्या बंद करता येतात व या शस्त्रक्रियेला ‘शुक्रवाहिनीबंधन’ म्हणतात. या दुसऱ्या प्रकारानंतर नलिका पूर्ववत करणे अधिक सोपे असते. शस्त्रक्रियेनंतरही काही काळापर्यंत शुक्राणू पुरुषांच्या जननमार्गात, विशेषेकरून रेताशयात, जिवंत व उत्पादनक्षम अवस्थेत शिल्लक असतात. म्हणून पुरुषातील शस्त्रक्रियेनंतर दरमहा रेताची सूक्ष्मदर्शकीय तपासणी करावी लागते. अशी लागोपाठ दोन वेळा तपासणी करून तीमध्ये शुक्राणू अजिबात न दिसले, तरच ती शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे मानतात. लैंगिक दृष्ट्या सुदृढ प्रकृतीच्या पुरुषात १० किंवा त्याहून अधिक वेळा रेतस्खलन झाल्यानंतर रेताशयात बहुधा जिवंत शुक्राणू उरत नाहीत.

स्त्रियांतील शस्त्रक्रिया: स्त्रियांतील शस्त्रक्रियेला ‘अंडवाहिनीच्छेदन’ म्हणतात. प्रसूतीनंतर तिसऱ्या किंवा पाचव्या दिवसापर्यंत गर्भाशय बरेचसे वर असल्यामुळे अंडवाहिन्याही उदरभित्तीच्या जवळ आलेल्या असतात आणि म्हणून ही शस्त्रक्रिया उदरमार्गाने करणे सोपे जाते. ही शस्त्रक्रिया योनिमार्ग वापरूनही करतात. मात्र त्या वेळी गर्भाशय शक्यतो नेहमीच्या अवस्थेत श्रोणिगुहेत (कमरेजवळील हाडांनी बनलेल्या पोकळीत) असावे लागते. छेद-प्रसूतीच्या (सीझरियन छेद घेऊन झालेल्या प्रसूतीच्या) वेळीच कधीकधी ही शस्त्रक्रिया करून टाकणे हितावह असते. काही शस्त्रक्रियातज्ञ गर्भपाताकरिता केलेल्या शस्त्रक्रियेबरोबरच ताबडतोब ही शस्त्रक्रिया करून टाकतात.

काही नव्या उपकरणांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पुरुषातील शस्त्रक्रियेएवढीच सोपी बनली असून ती बाह्यरुग्ण विभागातच करता येऊ लागली आहे. अलीकडे अंडवाहिनीच्छेदनापेक्षा ‘अंडवाहिनीबंधन’ करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. कारण या नलिका पुन्हा जोडण्याचा प्रसंग उद्‌भवल्यास (मूल व्हावेसे वाटल्यास किंवा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास) या दुसऱ्या प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर अधिक सोपे असते. अंडवाहिनीबंधन चार प्रकारांनी  करता येते : (१) वाहिनी साध्या दोऱ्याने बांधणे, (२) संश्लेषित (कृत्रिम) धाग्याने बांधणे, (३) धातूच्या चापाने दाबून बंद करणे आणि (४) अग्निकर्म.

या दोन्ही प्रकारच्या शस्त्रक्रिया उदरदर्शक (लॅपरॉस्कोप) उपकरण वापरून करता येतात. बेंबीच्या खाली  अगदी छोटा छेद करून उदरभित्तीतून हे उपकरण उदरगुहेत शिरकविता येते. त्यामधून गर्भाशय, अंडवाहिन्या आदी अवयव अगदी स्पष्ट दिसतात. हे उपकरण स्थानिक संवेदनाहारक अंतःक्षेपण देऊन वापरता येते. शस्त्रक्रियेच्या वेळी आतडी मध्ये येऊ नयेत म्हणून या उपकरणातून पुरेसा कार्बन डाय-ऑक्साइड वायू उदरगुहेत सोडतात त्यामुळे आतडी वर सरकून शस्त्रक्रियाक्षेत्र मोकळे होते. शस्त्रक्रियेनंतर हा वायू त्याच उपकरणातून काढून टाकतात. या शस्त्रक्रिया योनिमार्गातून करता येतात. त्याकरिता निराळे उपकरण वापरतात व त्याला ‘कल्डोस्कोप’ म्हणतात. या उपकरणाचा वापर करताना निराळ्या बाह्य वायूच्या दाबाची गरज नसते कारण छेदातून बाहेरची हवा आत शिरून आतडी वर सरकविते.

स्त्रियांमध्ये हृदय, फुप्फुस, वृक्क (मूत्रपिंड) आदी इंद्रियांच्या महत्त्वाच्या विकृती, मधुमेह, अशक्तपणा, पांडुरोग वगैरे विकारांत आरोग्यरक्षणाच्या दृष्टीनेही या शस्त्रक्रिया उपयुक्त असतात.

पुरुष किंवा स्त्री कोणावरही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी दांपत्याची लेखी संमती घेतली पाहिजे.


इ. स. १९६० च्या सुमारास निर्बीजीकरण शस्त्रक्रिया प्रजोत्पत्ती रोखण्याचा व त्याद्वारे लोकसंख्या नियंत्रणाचा एक मार्ग म्हणून जगातील सर्व प्रगतीशील राष्ट्रांनी उपयोगात आणावयास सुरुवात केली. भारतामध्ये १९७२–७३ मध्ये ३१,२१,८५६ निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या गेल्या. १९७३–७४ मध्ये एकूण शस्त्रक्रियांची संख्या बरीच घटली आणि ५,३९,२९५ अंडवाहिनीच्छेदन शस्त्रक्रिया व ४,०३,१०७ शुक्रवाहिनीच्छेदन शस्त्रक्रिया झाल्या. १९५२ ते मार्च १९७५ या काळात एकूण १·६२५ कोटी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यांचे दर हजारी प्रमाण २७·३ पडले आहे. पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात (१९७४–७९) या शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढविण्याकरिता जादा आर्थिक व इतर लाभ मिळण्याची योजना आखण्यात आली आहे. मुलांच्या संख्येवर अवलंबून असलेली १५० रुपयांपर्यंतची बक्षिसे देण्यात येणार आहेत. काही राज्य सरकारांनी व केंद्र सरकारने आपल्या नोकरवर्गाकरिता प्रोत्साहनात्मक तसेच शिक्षात्मक नियम केले आहेत. अलीकडे या शस्त्रक्रिया संपूर्णपणे स्वेच्छेने करून घेण्यावर भर देण्यात येत आहे.

सुप्रजननशास्त्रज्ञांचेही लक्ष या शस्त्रक्रियांकडे गेले आहे. मानसिक विकृती व गुन्हेगारी प्रवृत्ती आनुवंशिक असतात, असा विचार मान्य झाल्यानंतर अमेरिकेतील २७ राज्यांनी १९३१ च्या सुमारास निर्बीजीकरणविषयक कायदे केले आहेत. १९३५ मध्ये असेच कायदे डेन्मार्क, स्वित्झर्लंड, जर्मनी, नॉर्वे व स्वीडन या देशांनीही केले आहेत.

भालेराव, कमल य. भालेराव, य. त्र्यं.

पशूंतील निर्बीजीकरण : शस्त्रक्रिया करून नरातील वृषण व माद्यांतील अंडाशय काढून टाकणे, याला निर्बीजीकरण म्हणतात. शस्त्रक्रिया न करता नरातील निर्बीजीकरण करण्याच्या अन्य पद्धती पशूंमध्ये अस्तित्वात आहेत. पशूंमध्ये विविध कारणांसाठी बहुतांशी नरांचे निर्बीजीकरण करतात व त्याला खच्ची करणे म्हणतात.

प्राचीन काळी आदिमानवालाही पाळीव जनावरांचे वृषण काढून टाकल्यास त्यांचा अवखळपणा व हिंस्र वृत्ती कमी होते, हे माहीत होते. वैदिक काळापासून भारतामध्ये घोड्यांचे खच्चीकरण करण्यात येत होते, हे ऋग्वेदातील वध्र्‌यश्व (वध्रि-अश्व म्हणजे ज्यांचे घोडे खच्ची केले आहेत असा) या उल्लेखावरून दिसते. तसेच वळू (खच्ची न केलेला) व बैल (खच्ची केलेला) या अर्थांचे शब्दही वारंवार आलेले आहेत. होमर यांच्या काळी (ख्रि. पू. आठव्या शतकात) ग्रीसमध्ये जनावरे खच्ची करण्याची सर्रास माहिती होती. स्ट्रॅबो यांनी सिथीयन (काळ्या व कॅस्पियन समुद्रांच्या उत्तरपूर्वेकडील विभागातील, हल्ली रशियात असलेल्या भागातील) व सरमाटियन (व्हिश्चला व व्होल्गा नद्यांमधील प्रदेशातील, हल्ली पोलंड व प. रशियातील) लोकांमध्ये घोडे खच्ची करण्याची चाल होती असे लिहिले आहे. अथर्ववेदामध्येही वृषण चेचून खच्ची करण्याच्या पद्धतीचा उल्लेख आढळतो.

कारणे : कळपामध्ये माजावर आलेल्या माद्यांच्या अस्तित्वामुळे खोंड आणि खच्ची न केलेले घोडे यांना काबूत ठेवणे कठीण होते. त्यांच्यातील मारामारीमुळे शिंग तुटणे, पाय मोडणे व गुराख्यांना होणारे अपघात वारंवार घडतात. यासाठी कळपातील खोंड व घोडे खच्ची करणे जरूरीचे होते. खच्ची न केलेल्या नराचे मांस खच्ची केलेल्यापेक्षा थोडे निकृष्ट दर्जाचे असते, असा समज काही देशांमध्ये आहे. खच्ची न केलेल्या नराचे मांस दक्षिण फ्रान्स व इटली येथे अधिक पसंत केले जाते तर इंग्लंडमध्ये याउलट परिस्थिती आहे. मांसोत्पादनासाठी गुरे गलेलठ्ठ होण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येते असे. अलीकडील काळात मांसोत्पादनासाठी गलेलठ्ठ होणाऱ्या जातींची गुरे वयात येण्याच्या सुमारासच मारली जात असल्यामुळे निर्बीजीकरणाचे फारसे महत्त्व राहिलेले नाही. तरीसुद्धा खोंड, कालवडी, डुकरे, मेंढे यांचे निर्बीजीकरण त्या अधिक लवकर लठ्ठ होण्यासाठी वयात येण्यापूर्वी बरेच आधी केले जाते.

पशूंतील नरांचे खच्चीकरण करण्याचे आणखी एक कारण म्हणजे इष्ट गुणांचा अभाव असल्यामुळे प्रजननाला अयोग्य असलेल्या नरापासून निकृष्ट दर्जाची प्रजा निर्माण होऊ नये व कळपातील उत्कृष्ट वळूंचा (नरांचा) वापर करणे सोईचे व्हावे हे आहे. याशिवाय डुक्कर व बोकड यांच्या मांसाला येणारा उग्र दर्प कमी करण्यासाठी, कुत्रा व बोका यांचे माजावर आलेल्या माद्यांच्या मागे भटकणे थांबवून नको असलेल्या प्रजोत्पादनास आळा घालण्यासाठी, अष्ठीला ग्रंथीचा स्राव मूत्रात मिसळल्यामुळे बोक्याच्या अंगाला येणारा मूत्राचा दर्प कमी करण्यासाठी इ. कारणांसाठीही निर्बीजीकरण करण्यात येते.

वय : सामान्यतः पाळीव प्राण्यातील नर प्रजननक्षम होण्याच्या (वयात येण्याच्या) सुमारास किंवा त्यानंतरच्या नजीकच्या काळात त्यांना खच्ची करण्यात येते. तरीसुद्धा खच्ची करण्याच्या उद्देशावर हे अवलंबून असते. शिंगरू ५ महिन्यांच्या सुमारास खच्ची करणे हितावह असते. काही लोकांच्या मते घोडे १ वर्षाचे झाल्यावरच खच्ची करावेत, इंग्लंडमध्ये बग्गीचे घोडे २ वर्षांचे झाल्यावर खच्ची करतात, तर खोंड २ ते ८ महिन्यांच्या वयाला खच्ची करतात. भारतामध्ये खोंड १ ते १·५ वर्षाचा झाल्यावर खच्ची करतात. कोकरू व करडू १ आठवडा ते १ महिन्याच्या वयाला, तर डुकरातील नर ७ ते ९ आठवडे वयाला (त्याचे आईचे दूध पिणे बंद होण्याच्या सुमारास) खच्ची करतात. असे असले तरी अमेरिकेत अलीकडे कोकरे व डुकराची पिले यांचे खच्चीकरण ४ ते ७ दिवसांच्या वयाला करण्याची प्रथा सर्रास रूढ झाली आहे. पाळीव पशूंच्या सर्व जातींतील नर वयात येण्याआधी खच्ची केल्यास कायमचे वंध्यत्व येणे, जनन तंत्रातील इंद्रियांची वाढ खुंटणे, कंकालातील (हाडांच्या सांगाड्यातील) लांब हाडांची लांबी वाढल्यामुळे उंची वाढणे, कामप्रेरणा कमी होणे, स्नायूमध्ये चरबी साठत गेल्यामुळे कलेवराची प्रत चांगली होणे इ. हितकारक परिणाम दिसून आले आहेत.

पद्धती : निर्बीजीकरण मुख्यत्वे दोन पद्धतींनी करतात. शस्त्रक्रिया करून वृषण काढून टाकणे ही एक व शुक्ररज्जूमधील रेतोवाहिनी, वृषणाला रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिणी तसेच तंत्रिका (मज्जा) निष्क्रिय करून वृषणाची अपपुष्टी (रक्तपुरवठ्याअभावी वाळून जाणे) घडवून आणणे ही दुसरी पद्धत होय. यांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे.

शस्त्रक्रिया : मुष्कावरील (वृषण जीमध्ये असतात त्या पिशवीवरील) त्वचेला चाकूने काप घेऊन त्यातून वृषण बाहेर काढतात व शुक्ररज्जू मोकळी करून तिला शक्य तितक्या वरच्या बाजूस चाप लावतात. वृषणाच्या उलट बाजूस चापालगत रोहिणी व रेतोवाहिनी बंद करण्यासाठी तातीने घट्ट बांधतात. यानंतर चापाच्या वृषणाकडील बाजूस डागण्यांनी जाळून हळूहळू शुक्ररज्जू तोडली जाते व तिला लटकलेली वृषणे आपोआपच वेगळी होतात. या क्रियेत रोहिण्यांची तोंडे बंद होऊन रक्तस्राव होत नाही. रक्तवाहिन्यांची तोंडे बंद झाली आहेत व रक्त वाहत नाही याची खात्री करून घेण्यासाठी चाप बेताबेताने सैल करून काढतात. क्वचित कोठून रक्त येत असल्यास त्या ठिकाणी पुन्हा डागणी लावून रक्तस्राव बंद करण्यात येतो. अलीकडे डागण्यांनी दाहकर्म न करता पीळ देणारा चिमटा, चिरडणारा चिमटा असे चिमटे वापरून शुक्ररज्जू तोडण्याची क्रिया केली जाते. घोड्याचे निर्बीजीकरण अजूनही या पद्धतीनेच करतात. कोकरू, करडू व डुकराची पिले यांचे निर्बीजीकरण या पद्धतीने करतात पण डागण्यांऐवजी पीळ देणारा चिमटा किंवा चिरडणारा चिमटा वापरून करतात. कुत्र्याचे निर्बीजीकरण करताना वृषणाच्या त्वचेवर काप घेऊन शुक्ररज्जू मोकळी केल्यावर तिला दोन रोहिणीचाप लावून वरचा स्थिर ठेवून खालच्याला पीळ देत देत शुक्ररज्जू व तिला लटकलेली वृषणे अलग करतात किंवा चापाच्या वरच्या बाजूस घट्ट बंधन बांधून त्याखाली शुक्ररज्जू कापतात. बोक्याचे निर्बीजीकरण कुत्र्याप्रमाणेच करतात. हेन्‍री ग्रे यांनी बोक्याची शुक्ररज्जू पीळ देऊन काढण्याऐवजी डागणीने जाळून वेगळी करावी अशी शिफारस केली आहे.


दुसऱ्या पद्धतीमध्ये मुष्काच्या त्वचेवर काप न देता अधिवृषणाच्या (वृषणाच्या वर असलेल्या लंबवर्तुळाकार भागाच्या) वरच्या बाजूस चिरडणारा चिमटा लावून त्वचेसकट आतील शुक्ररज्जू चिरडण्यात येते. दोन लाकडी दांडक्यांच्यामध्ये शुक्ररज्जू घट्ट पकडून लाकडी हातोड्याने शुक्ररज्जू व वृषण काही वेळ बडवत राहतात. यामुळे शुक्ररज्जूमधील वृषणाकडे जाणारी रेतोवाहिनी व रक्तवाहिन्या चेचल्या जाऊन वृषणाचा रक्तपुरवठा बंद होतो. पुढील तीन चार महिन्यांत रक्तपुरवठ्याअभावी वृषणाची अपपुष्टी होऊन ते निष्क्रिय होतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतामध्ये खोंड व रेडे या रीतीने खच्ची केले जात असत. महाराष्ट्रातही हीच पद्धत प्रचारात होती व अशा खच्चीकरणाला खोंड बडविणे असे म्हणतात. अजूनही खेडेगावातून क्वचित या पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीने निर्बीजीकरण करताना जनावराला फार क्लेश होतात आणि बडवलेल्या भागावर सूज येऊन जनावर ८–१५ दिवस आजारी होते.

बर्डिझू चिमटा

बर्डिझू नावाच्या इटालियन संशोधकांनी तरफेच्या तत्त्वाचा उपयोग करून शुक्ररज्जू चेचण्याची क्रिया ३० सेकंदांत होईल असा ‘बर्डिझू चिमटा’ तयार केला आहे. चिमट्याच्या तोंडात अधिवृषणाच्या वरच्या बाजूस मुष्काच्या त्वचेसह शुक्ररज्जू पकडतात. तोंडाच्या कडा बोथट असल्यामुळे त्वचा कापली जात नाही, मात्र चिमट्याच्या हस्तकांच्या साहाय्याने तोंड बंद केल्यावर त्यात पकडलेल्या शुक्ररज्जूवर ४०० किग्रॅ. वजनाचा दाब पडून शुक्ररज्जू संपूर्णपणे चिरडली जाते. चिमट्याच्या तोंडातून शुक्ररज्जू निसटून जाऊ नये एवढीच काळजी घ्यावी लागते. पोमेरॉ यांनी शुक्ररज्जू निसटून जाऊ नये अशी सुधारणा या चिमट्याच्या तोंडाच्या भागात केली आहे. या चिमट्याने खच्चीकरण करण्यास दोन मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत नाही. शिवाय ते विनाक्लेश व रक्तहीन होते.

भारतामध्ये आता खोंड, रेडे खच्ची करण्यासाठी पशुवैद्य बर्डिझू चिमट्याचा वापर सर्रास  करतात. अलीकडे छोटा बर्डिझू चिमटा तयार करण्यात आला असून त्याचा वापर शेळ्या व मेंढ्या या जातींतील नरांना खच्ची करण्यासाठी करतात. दोन्ही प्रकारच्या चिमट्यांचे उत्पादन भारतामध्ये केले जाते.

इंग्लंडमध्ये १९५४ च्या पशुसंरक्षण कायद्याप्रमाणे घोडा, गाढव, खेचर, खोंड व मेंढा यांचे १२ महिने वयानंतर, डुकराचे ७ महिने, कुत्र्याचे ३ महिने व मांजराचे ६ महिने वयानंतर खच्चीकरण करताना भूल देणे आवश्यक आहे.

पशूंमध्ये माद्यांचे निर्बीजीकरण नरांच्या मानाने बऱ्याच कमी प्रमाणात केले जाते. एक नर त्याच्या आयुष्यात ५०० च्या वर प्रजेला जन्म देऊ शकतो. तर एक मादी जास्तीत जास्त ६ ते ८ (आकडे वळू व गाय यांच्या बाबतचे आहेत) पिलांना जन्म देते हे लक्षात घेतल्यास निकृष्ट प्रजोत्पत्ती थांबविण्यासाठी नर खच्ची करणेच श्रेयस्कर ठरते.

पोलोच्या खेळात व सैन्यात वापरल्या जाणाऱ्या घोडीचे निर्बीजीकरण करतात. तसेच ऋतुकालामध्ये शर्यतीतील कर्तृत्व कमी होऊ नये म्हणून घोड्यांच्या शर्यतीत वापरल्या जाणाऱ्या घोडीचे निर्बीजीकरण करतात. गाई दूध देत असताना त्यांचे निर्बीजीकरण केल्यास त्या बऱ्याच काळापर्यंत (४ वर्षांपर्यंत) दूध देत राहतात असे दिसून आले आहे. केवळ अर्थोत्पादनासाठी काही शहरांतील दुग्धशाळांमध्ये दुग्धोत्पादनाच्या दृष्टिकोनातून गाई ठेवल्या जातात. अशा गायींचे निर्बीजीकरण केल्यास त्यांच्याकडून बराच काळ दूध मिळत राहते. शिवाय या काळात त्या लठ्ठ होत राहिल्यामुळे आटल्यावर त्यांच्यापासून मांसही अधिक प्रमाणात मिळू शकते व दुहेरी फायदा होतो.उत्तर व दक्षिण अमेरिकेमध्ये मांसोत्पादनासाठी गुरांचे मोठाले कळप पाळण्यात येतात. त्या ठिकाणी गायींचे निर्बीजीकरण करणे नित्याचे झाले आहे. यामुळे त्या लवकर लठ्ठ होऊन त्यांच्यापासून अधिक व चांगल्या प्रतीचे मांस मिळते. तसेच मांसोत्पादनाकरिता पाळण्यात येणाऱ्या डुकरांच्या कळपातील कोवळ्या माद्यांचे (१० आठवडे वयाला) निर्बीजीकरण केल्यास त्या लवकर लठ्ठ होतात व त्यामुळे मांसोत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

माद्यांचे निर्बीजीकरण उदरच्छेदन करून अथवा योनिमार्गावाटे अंडाशय काढून टाकून करतात. दोन्हीही अंडाशये काढून टाकणे जरूर असते.

निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रियेनंतर काही वेळा रक्तस्राव, अंतर्गळ (अस्वाभाविक छिद्रातून एखाद्या इंद्रियाचा भाग बाहेर जाणे), पर्युदरशोथ (पोटाच्या पोकळीतील इंद्रियांवरील आवरणाची दाहयुक्त  सूज), धनुर्वात इ. उपद्रव उद्‌भवतात व त्यांकडे वेळीच लक्ष द्यावे लागते. शस्त्रक्रियेनंतरच्या २४ तासांत रक्तस्राव होण्याचा धोका असतो. त्यानंतर सहसा होत नाही. रक्तस्राव अतीव झाल्यास मृत्यू येण्याचा संभव असल्यामुळे ताबडतोब इलाज करतात. घोडे आणि कोकरांमध्ये धनुर्वाताचा धोका बराच असतो. घोड्यांना शस्त्रक्रियेच्या आधी धनुर्वातविरोधी लस टोचल्यास व कोकरांमध्ये शुक्ररज्जू तोडण्याची क्रिया पीळ देणाऱ्या चिमट्याऐवजी डागण्यांनी जाळून केल्यास धनुर्वात होण्याची भीती राहत नाही. बर्डिझू चिमट्याने खच्चीकरण केल्यास वरील धोके आपोआपच टाळले जातात.

दीक्षित, श्री. गं. नातू, वा. रा.

पहा : कुटुंबनियोजन.

संदर्भ : 1. Holvey, D. N. Talbott, J. H., Eds. The Merck Manual of Diagnosis and Therapy, Rahway, N. J., 1972.

              2. Miller. W. C. West, G. P. Black’s Veterinary Dictionary, London, 1962.

              3. O’Corner, J. J. Dollar’s Veterinary Surgery, London, 1962.

              4. Sabiston, D. C., Ed. Davis-Christopher Textbook of Surgery, Philadelphia, 1972.