हेरगिरी, लष्करी : (एस्पिओनेज, मिलिटरी) . शत्रूच्या लष्करी कारवायांविषयी गुप्त माहिती खबरे, गुप्तहेर, एजंट किंवा अवैध क्लृप्त्यांद्वारे मिळविण्याची प्रक्रिया. प्राचीन व मध्ययुगीन काळी राजेलोक गुप्तहेरांकरवी आणि खबऱ्यांद्वारे शत्रूची माहिती मिळवीत असत. आधुनिक काळात साधारणतः बरीचशी माहिती संदेश माध्यमांद्वारे प्राप्त होते परंतु अणुशक्ती संशोधन केंद्रे, शस्त्रास्त्रांचे उत्पादन व साठे, संरक्षण योजना व संघटना, परराष्ट्रीय संबंध इत्यादींविषयीची अन्य देशांची माहिती मिळविणे फारकठीण असते कारण या सर्व बाबतींत कमालीची गुप्तता पाळली जाते. म्हणून गुप्तहेरांचे व फितुरांचे जाळे अशा ठिकाणी हेरगिरीमार्फत गुप्तपणे निर्माण करावे लागते. त्यामुळे गुप्तवार्ता संकलनाचे तंत्र आत्मसातकरता येते आणि हेरगिरी हे त्याचे प्रमुख साधन होय. हेर व हेरगिरीची लष्कराला नितान्त गरज असून हेरांकरवी मिळालेल्या शत्रुविषयक माहितीचा युद्धांसाठी महत्त्वाचा उपयोग होतो. तसेच ते शासनसंस्थेचे फार मोठे आधारस्तंभ असतात. 

 

राज्यशास्त्र व युद्धशास्त्र ह्यांचा व्यवहारात घनिष्ठ अन्योन्य संबंध असतो. परस्परांच्या सहकार व समन्वयाने शत्रुविषयक मिळविलेल्या गुप्त माहितीची आपापसांत देवघेव होत असली, तरी युद्धशास्त्रज्ञ व सेनापती यांचा हेतू शांततेच्या काळात गुप्त रीत्या व प्रत्यक्ष युद्धात आघाडीवरचे सैनिक, युद्धकैदी आणि इतर साधनांनी मिळविलेल्या युद्धावश्यक माहितीचा राष्ट्रसंरक्षण व यशस्वी युद्धयोजना व कृतींसाठी प्रकर्षाने उपयोग करणे, एवढ्यापुरताच मर्यादित असतो. त्यासाठी आवश्यक अशी संघटना आणि कार्यालये यांची तरतूद प्रत्येक राष्ट्राच्या संरक्षणव्यवस्थेत आवर्जून केलेली असते. 

 

प्राचीन व मध्ययुगीन काळ : हेर व हेरगिरीचा उल्लेख रामायण, महाभारत, ऋग्वेद, मनुस्मृती, शुक्रनीती इ. राजनीतीवरील ग्रंथांतून आढळतो. तसेच कौटिल्यानेसुद्धा आपल्या कौटिलीय अर्थशास्त्रा त हेर व हेरगिरीचा उल्लेख विविध नावांनी पुढीलप्रमाणे केला आहे : कापटिक, उदास्थित, गृहपतिक, वैदेहक, तापसवेषधारी, सत्री, तीक्ष्ण, रसद आणि भिक्षुकी असे नऊ प्रकार व त्यांची कामे विश्लेषणात्मक रीत्या सांगितली आहेत. कौटिल्य म्हणतो की, हेर व हेरगिरी विभागात काम करणाऱ्यांची परस्परांत ओळख नसावी, अन्यथा अनेक घोटाळे होण्याचा संभव असतो. तसेच त्यांची बायका-मुले राजाने आपल्या ताब्यात ठेवावी. त्यामुळे स्वराष्ट्राशी द्रोह होणार नाही. 

 

हेरगिरीचे महत्त्व छ. शिवाजी महाराजांनीही जाणले होते. त्यांच्या सैन्यातील बहिर्जी नाईक, नानाजी प्रभू मुसेखोरकर, सुंदरजी प्रभू वगैरे हेरांकडून माहिती घेऊनच महाराज रणनीती ठरवीत असत. पेशवे काळातही ही पद्धत कार्यवाहीत होती. 

 

आधुनिक काळ : हेरगिरी म्हणजे स्वहित संरक्षणासाठी संबंधित, प्रतिस्पर्धी अथवा शत्रू ह्यांच्या हालचालींची संगतवार व सूक्ष्म माहिती मिळविण्यासाठी गुप्तपणे व दक्षतापूर्वक करण्यात येणारी टेहळणी होय. राज्यशासन व्यवस्थेकडून अशा प्रकारच्या विशेष धाडसी कामगिऱ्या पार पाडण्यासाठी प्रसंगोपात्त संरक्षण दलाला आवाहन केले जाते आणि संरक्षण दले अशा कामगिऱ्या पूर्ण क्षमतेने पार पाडण्यास समर्थ असतात. लष्करी हेरगिरी म्हणजे युद्धोपयोगासाठी, संभाव्य आणि प्रत्यक्ष शत्रूंसंबंधी सर्व प्रकारची युद्धावश्यक माहिती परिश्रमपूर्वक गोळा करून तिचे परिशीलन करून तर्कशुद्ध निष्कर्ष काढले जातात आणि त्यांचा चातुर्याने युद्ध-सिद्धीसाठी उपयोग केला जातो. संरक्षण व्यवस्थेत लष्करी हेरगिरीसाठी पुढील प्रकारची संघटना व कार्यपद्धती सर्वसाधारणपणे कार्यरत असतेः सरसेनापतीच्या हाताखालील प्रमुख कार्याधिकाऱ्यांपैकी कार्यकारी संचालकाच्या कार्यालयात लष्करी मोहिमा खात्याच्या जोडीने महत्त्वाचे लष्करी गुप्तवार्तासंकलन खाते असते. या खात्यात एकीकडे लष्करी मोहीम खाते, तर दुसरीकडे मध्यवर्ती गुप्तवार्ता खाते व परराष्ट्र मंत्रालय या खात्यांशी सहकार-समन्वयी घनिष्ट संबंध असतो. शिवाय परराष्ट्रातील दूतावासामध्येे या खात्यातर्फे एक (जरूरीप्रमाणे अधिक) सैनिकी साहाय्यक अधिकारी नियुक्त केलेला असतो. संबंधित देशातील युद्धोपयोगी सर्व माहिती संकलित करून त्या खात्यास पुरविण्याचे काम प्रामुख्याने त्याच्याकडे दिलेले असते. संकलन केलेल्या वार्तांची नियतकालिके व अहवाल राजनैतिक डाकेबरोबर तो मध्यवर्ती गुप्तवार्ता खात्याकडे मायदेशी रवाना करत असतो. त्याचप्रमाणे देशातील किंवा परदेशात असलेल्या आपल्या लष्करी पलटणींकडून अशीच आवश्यक युद्धोपयोगी माहितीपत्रके मुदतीने वा वेळोवेळी मागविण्याची व्यवस्था या खात्यामार्फत केली जाते. अर्थात ही सर्व माहिती गुप्त या सदरात गुप्तपणेच दक्षतापूर्वक दिली व घेतली जाते. अशा प्रकारची सैनिकी व मुलकी संबंधित कार्यकारी घटकांकडून व वेळोवेळी वापरलेल्या इतर मार्गांनी वा साधलेल्या संधानाने मिळविलेल्या सर्व गुप्त माहितीचे यथायोग्य संकलन व संपादन करून लष्करी मोहीम खाते आणि इतर सर्व घटकांना आवश्यक तेवढी व उपयोगी माहिती मुदतीने वा वेळोवेळी पुरविण्याची जबाबदारी या खात्याचीच असते. लष्करी गुप्तवार्तासंकलनाचे विश्लेषण व मूल्यांकन हे महत्त्वाचे असून माहिती कितपत खरी, समर्पक, विश्वासार्ह व मौलिक आहे, हे पडताळण्यासाठी तिचे विश्लेषण व मूल्यमापन केले जाते. 

 

याशिवाय युद्धकाळात प्रत्येक लढाऊ सैन्यदलात एक गुप्तवार्ता अधिकारी नियुक्त केलेला असतो. त्याच्याकडे आघाडीवर धाडलेल्या टेहळणी, लढाऊ व गस्तीत भाग घेतलेल्या सैनिकांची उलट तपासणी करून शत्रूसंबंधीची आवश्यक ती माहिती गोळा करणे, तसेच अटक केलेल्या युद्धकैद्यांची प्राथमिक उलट तपासणी करून त्यांच्याकडून माहिती काढणे, त्यांना पुढील तपासणीसाठी बंदोबस्ताने योग्य ठिकाणी रवाना करणे वगैरे कामे दिलेली असतात. ह्याशिवाय शत्रुमुलखात टेहळणी विमाने धाडून आवश्यक त्या प्रांताचे हवाई छायाचित्रण करून सर्व प्रकारच्या मार्गांनी-सुद्धा आवश्यक ती माहिती गोळा करण्यात येत असते. 

 

पहा : गुप्तवार्ता. 

 

संदर्भ : 1. Newman, Bernard, The World of Espionage, London, 1962.

           २. कंगले, र. पं. प्राचीन भारतीय राजनीती, मुंबई, १९६९.

           ३. भावे, वा. कृ. शिवराज्य व शिवकाल, पुणे, १९५७

पाटणकर, गो. वि.