सोडा ॲश : हे व्यापारी दर्जाचे कार्बोनेटाचे (Na2CO3) एक रूप असून ते महत्त्वाचे औद्योगिक संयुग आहे. त्याला निर्जलीकृत सोडियम कार्बोनेट किंवा भस्मीकृत सोडा असेही म्हणतात. कार्बॉनिक अम्लाचे सोडियम लवण पांढरे किंवा पारदर्शक असून ते निसर्गात व्यापकपणे आढळते. सोडा ॲश आणि डेकॅहायड्रेट सोडियम कार्बोनेट (Na2CO3.10H2O), वॉशिंग (धुण्याचा) वा साल सोडा यांसारख्या सोडियम कार्बोनेटाच्या रूपांना सामान्यपणे सोडा म्हणतात. सौम्य व तीव्र क्षारांच्या (अल्कलींच्या) मिश्रणाला रूपांतरित सोडा म्हणतात.

उत्पादन : १७९० मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ नीकॉला लब्लां यांनी विकसित केलेल्या प्रक्रियेने प्रथमच सोडा ॲशचे व्यापारी उत्पादन करण्यात आले. लब्लां प्रक्रियेत साध्या मिठावर संहत (प्रमाण जास्त असलेल्या) सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया करून मिळविलेले सोडियम सल्फेट वापरले जात होते. हे सोडियम सल्फेट चुनखडकाबरोबर तापवून सोडा ॲश व कॅल्शियम सल्फाइड तयार करण्यात येत असे. १८६१ मध्ये बेल्जियम रसायनशास्त्रज्ञ अर्नेस्ट सॉल्व्हे यांनी सोडा ॲश तयार करण्याची अमोनिया-सोडा प्रक्रिया यशस्वीपणे वापरून दाखविली. नंतर याच प्रक्रियेने बहुतेक सोडा ॲश तयार होऊ लागले. या प्रक्रियेत कळीचा चुना वापरतात. एक टन सोडा ॲश तयार करण्यासाठी साधारणपणे सात क्विंटल उच्च कॅल्शियमी चुना लागतो.

सोडा ॲश निर्मिती प्रक्रिया

सॉल्व्हे प्रक्रियेमध्ये कार्बन डाय-ऑक्साइड व अमोनिया या वायूंचे मिश्रण काळजीपूर्वक नियंत्रित अशा परिस्थितींत मिठाच्या विद्रावातून जाऊ देतात. या विक्रियेने सोडियम बायकार्बोनेट (NaHCO3) अवक्षेपित होते. (साक्याच्या रूपात खाली बसते) आणि नंतर ते गाळून वेगळे करतात. विद्रावातील अमोनिया वायू मिळवून पुन्हा वापरतात. एकोणिसाव्या शतकात अमोनिया वायू अतिशय महाग असल्याने तो असा पुन्हा मिळविणे आवश्यक होते. हे सोडियम बायकार्बोनेट तापवून सोडा ॲश आणि त्याच्याबरोबर पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड वायू मिळतात.

निसर्गातही सोडियम कार्बोनेट (सोडा ॲशचे रूप) सेस्क्विकार्बोनेटाच्या रूपांत आढळते. थर्मोनॅट्राइट [Na2(CO3).Na (HCO3).2H2O] हे करडसर वा पिवळसर पांढरे असून तंतुमय वा स्तंभाकार थरांत आणि संपुंजित रूपात आढळते व अल्कोहॉलात विरघळत नाही विद्रावात व लवणी अवशिष्ट निक्षेपात आढळते. थर्मोनॅट्रॉइट आणि नॅट्रॉन (Na2CO3.10H2O) हे पांढरे, पिवळे वा करडे असून पाण्यात विरघळते व अल्कोहॉलात विरघळत नाही विद्रावात व लवणी अवशिष्ट निक्षेपात आढळते. थर्मोनॅट्रॉइट आणि नॅट्रॉन रूपांत तसेच काही खनिज जलांत सोडा ॲश आढळते. प्राचीन खारी सरोवरे व समुद्र यांचे बाष्पीभवन होऊन मागे राहिलेल्या इतर खनिजांबरोबर ट्रोना व नॅट्रॉन ही खनिे आढळतात. वाळवंटी क्षेत्रात सोडा ॲशचे विस्तृत निक्षेप आढळतात. तेथील काही निक्षेपांचे विद्युत् विच्छेदन करून सोडा ॲश मिळवितात.

उपयोग : काच उद्योग, तसेच प्रक्षालके, स्वच्छताकारके, विरंजन यांसारख्या रासायनिक उद्योगांत तसेच खनिज तेल परिष्करात कारखान्यांत सोडा ॲश सर्वाधिक वापरले जाते. ते काच आणि धातुनिर्मिती उद्योगांत म अभिवाह म्हणून आणि रासायनिक उद्योगांत सोडियम नायट्रेट, तसेच सोडियम फॉस्फेटे व सिलिकेटे इ. रसायने तयार करण्यासाठी वापरतात. सोडा बायकार्बोनेट व सोडियम हायड्रॉक्साइड (दाहक सोडा) यांच्या उत्पादनामध्ये सोडा ॲशचे कार्य महत्त्वाचे असते. त्याच्यावर कार्बन डाय-ऑक्साइडाची विक्रिया करून सोडा बायकार्बोनेट तयार करतात. साबण, लाकडाचा लकदा या उद्योगांत सोडा ॲश वापरतात. पाणी मृदू करणारा घटक म्हणून आणि सोडा स्फटिक या रूपात सामान्य स्वच्छताकारक द्रव्य म्हणून ते वापरतात.

लेले, आ. मा. ठाकूर, अ. ना.