प्रोटोझोआ: (आदिजीव अगर प्रजीव संघ). प्राणिसृष्टीतील सर्वांत खालच्या पातळीवरील संघाला प्रोटोझोआ संघ असे म्हणतात. या संघात अत्यंत सूक्ष्म, एककोशिक (ज्यांचे शरीर एका पेशीचे बनले आहे अशा) प्राण्यांचा समावेश होतो. हे प्राणी एकएकटे अगर समूहाने राहतात. हे प्राणी प्रमाणबद्ध नसतात. एककोशिक असल्यामुळे ह्या प्राण्यांच्या शरीरात ऊतक (समान रचना व कार्य असणारे पेशीसमूह) अथवा इंद्रिये नसतात परंतु बहुकोशिक प्राण्यांच्या शरीरात घडणाऱ्या अनेक जीवनावश्यक क्रिया या प्राण्यांच्या एका कोशिकेमध्ये चालत असतात. या प्राण्यांची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

लक्षणे: पृथ्वीवर सर्वप्रथम निर्माण झाल्यामुळे या प्राण्यांना आदिजीव म्हणतात. हे एककोशिक प्राणी सूक्ष्म, १ मायक्रॉन (१०-३ मिमी.) ते १६ मिमी. लांब असतात. काही वाटोळे लांबट तर काही अंडाकृती असतात, तर काहींचे आकार एकसारखे बदलत असतात. या प्राण्यांच्या कोशिकेमध्ये एक किंवा अनेक केंद्रक (कोशिकेतील कार्यावर नियंत्रण ठेवणारे जटिल गोलसर पुंज) असतात. केंद्रकाभोवती केंद्रकपटल असते. केंद्रकपटलाबाहेरील भागात कोशिकाद्रव्य असते. कोशिकापटलाचे दोन प्रकार असतात : बहिर्पटल आणि अंतर्पटल. बहिर्पटलाजवळील कोशिकाद्रव्य जास्त घट्ट असते. त्याला बहिर्द्रव्य असे म्हणतात, त्याच्या आतील कणिकामय (कणयुक्त) पातळ द्रव्याला अंतर्द्रव्य म्हणतात. अंतर्द्रव्यात अन्नरिक्तिका (पटलाने वेष्टित असलेली व जिच्यात अन्नपचनाची क्रिया होते अशी पोकळी),⇨संकोचशील रिक्तिका (आकुंचन पावणारी कोशिकेतील जलीय विद्राव व स्त्राव असलेली पोकळी) आणि हरितकणू (हरितद्रव्ययुक्त जीवद्रव्याचा विशेषित भाग) असतात. या प्राण्यांचे चलनवलन ⇨पादाम,⇨कशामिका किंवा⇨पक्ष्मामिका यांसारख्या सूक्ष्मांगामुळे होत असते [⟶ कोशिका प्राण्यांचे संचलन] .

काही आदिजीव प्राणिसदृश पद्धतीने सूक्ष्मजंतू, शैवल, यीस्ट व इतर सूक्ष्मजीवांचा अन्नासारखा उपयोग करतात. काही आदिजीव वनस्पतिसदृश पद्धतीने अंतर्द्रव्यातील हरितकणूंच्या साहाय्याने ⇨ प्रकाशसंश्लेषण करतात व स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. काही मृतोपजीवी (प्राण्यांच्या मृत अवशेषांवर जगणारे) असतात. काही सेंद्रीय अन्नकणांवर (वनस्पतींच्या मृत भागांवर) उपजीविका करतात, तर काही परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणारे) असतात.

श्वसनासाठी पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनाचा हे प्राणी उपयोग करतात. त्यांच्या शरीरातील उत्सर्जनाची (निरुपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकण्याची) क्रिया संकोचशील रिक्तिकेच्या साहाय्याने होते.

 

आदिजीवांचे प्रजोत्पादन अलैंगिक अगर लैंगिक पद्धतीने होते अलैंगिक पद्धतीमध्ये द्विभाजन (शरीराचे दोन सारखे भाग होणे), बहुभाजन (शरीराचे अनेक भाग होणे), मुकुलन (शरीरावर मुकुल म्हणजे कलिका उत्पन्न होऊन तीपासून नवीन प्राणी तयार होणे) किंवा कोशिकाद्रव्य विभाजन (बहुकेंद्रीय कोशिकेतील फक्त कोशिकाद्रव्याचे विभाजन होऊन नवीन प्राणी तयार होणे) या पद्धतींचा समावेश होतो. काही आदिजीव लैंगिक पद्धतीने – उदा., संयुग्मनाने, अर्धमिश्रणाने अंतःमिश्रणाने वा बीजाणुजननाने-प्रजोत्पादन करतात. बाह्य परिस्थिती ज्या वेळी प्रतिकूल असते त्या वेळी अनेक आदिजीव प्राणी स्वतःभोवती पुटी तयार करतात. [⟶प्रजोत्पादन].

प्रोटोझोआ संघातील बहुसंख्या प्राणी पाण्यात राहतात. काही गोड्या पाण्यात तर काही खाऱ्या पाण्यात आढळतात. यांशिवाय काही जाती परजीवी, सहभोजी (दोन जीवांची दोघांनाही उपयुक्त असणारी बाह्य भागीदारी) अगर सहजीवी (दोन जीवांची एकमेकांना उपयुक्त असणारी अंतर्गत भागीदारी) आहेत. या संघातील बहुसंख्य प्राणी निरुपद्रवी आहेत परंतु प्लास्मोडियम, ट्रिपॅनोसोमा, एंटामीबा यांसारखे काही प्राणी मानवी शरीरात वेगवेगळे रोग उत्पन्न करतात.

वर्गीकरण : प्रोटोझोआ संघातील ३,००० हून अधिक जातींच्या प्राण्यांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला आहे. कोशिकेची रचना व लक्षणे यांतील फरकामुळे या संघाचे चार वर्ग पाडण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.

(१) मॅस्टिगोफोरा किंवा फ्लॅजेलेटा : या वर्गातील प्राण्यांच्या कोशिकेवर कशाभिका असून त्यांच्या साहाय्याने या प्राण्यांचे चलनवलन होते. उदा., गियार्डिया. 

 (२) सार्कोडिना : या वर्गातील प्राणी पादाभांच्या साहाय्याने चलनवलन करतात. उदा., अमीबा. 

 (३) स्पोरोझोआ : या वर्गातील प्राण्यांना चलनवलन करण्यास योग्य अशी उपांगे (अवयव ) नसतात. हे प्राणी परजीवी आहेत. उदा., प्लास्मोडियम.

(४) सिलिओफोरा : या वर्गातील प्राण्यांच्या कोशिकेवर अनेक पक्ष्माभिका असून त्यांच्या साहाय्याने चलनवलन होते. उदा., पॅरामिशियम.

वर दिलेल्या प्रत्येक वर्गाची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

मॅस्टिगोफोरा किंवा फ्लॅजेलेटा :या वर्गातील अनेक प्राण्यांच्या कोशिकेमध्ये प्रकाशसंश्लेषण करू शकणारे हरितकणू असतात. हे प्राणी वनस्पतीसारखे कार्य करीत असतात म्हणून अशा प्राण्यांना फायटोफ्लॅजेलेटा असेही म्हणतात. उदा., ⇨यूग्लीना. ज्या प्राण्यांच्या कोशिकेमध्ये हरितकणू नसतात अशा प्राण्यांना झुफ्लॅजेलेटा असे म्हणतात.

झफ्लॅजेलेटा या उपवर्गातील काही प्राणी आकारमानाने लहान असून त्यांना एकच कशाभिका असते. काही आकारमानाने मोठे असून त्यांना अनेक कशाभिका असतात. त्यांचा उपयोग हालचालीसाठी होतो. कशाभिका ही गोलाकार, जोरजोराने फिरत असते व त्यामुळे हा प्राणी एखाद्या स्क्रूसारखा पाण्यामधून पुढे खेचला जातो.

कोडोसिगा हे प्राणी एकएकटे अगर समूहाने खाऱ्या आणि गोड्या पाण्यात राहतात. हेक्झामिटा साचलेल्या पाण्यात राहतात. मॅस्टिगअमीबा यांची अन्नभक्षणाची पद्धत अमीबासारखी असते. ट्रायकोर्निफा हे वाळवीच्या अन्ननलिकेत सापडतात. वाळवी लाकूड खात असली, तरी ते पचविण्याजोगे एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणारा प्रथिम पदार्थ) तिच्या अन्ननलिकेत तयार होत नाही. हे एंझाइम ट्रायकोर्निफा तयार करून लाकडाचे पचन करण्यास वाळवीला मदत करतात. अशाच जातीचे आदिजीव झुरळे, भुंगेरे यांच्या अन्ननलिकेत सापडतात व अन्नाचे पचन करण्यास मदत करतात. आदिजीव व कीटक या परस्परसंबंधाला सहजीवन असे म्हणतात. फ्लॅजेलेटा वर्गातील काही प्राणी मानवी शरीरात राहून निरनिराळे रोग उत्पन्न करतात. उदा., गियार्डिया लॅम्बलिया. या प्राण्यामुळे लहान मुलांना जुलाब होऊ लागतात. हे प्राणी लहान आतड्याच्या आतल्या बाजूवर चिकटून राहतात.⇨ट्रिपॅनोसोमा या मानवाच्या रक्तात राहणाऱ्या प्राण्यामुळे माणसाला ⇨ निद्रारोग हा रोग होतो. हे प्राणी त्से त्से या रक्तशोषणाऱ्या माशीमुळे मानवी शरीरात प्रवेश करतात. फ्लॅजेलेटा वर्गातील प्राणी द्विभाजन पद्धतीने प्रजोत्पादन करतात [⟶मॅस्टिगोफोरा]. 


सार्कोडिना : प्रोटोझोआ संघाच्या इतर वर्गातील प्राण्यांशी तुलना केली असता या वर्गातील प्राणी अत्यंत साध्या रचनेचे आहेत. या वर्गातील ⇨अमीबाची रचना खालीलप्रमाणे असते.

अमीबा अतिसूक्ष्म सु. ०·२५ मिमी. लांबीचा, धुसर व चमकणाऱ्या कणासारखा एककोशिक प्राणी आहे. त्याचा आकार अनियमित व प्रत्येक क्षणी बदलणारा असतो. याच्या कोशिकेवर उत्पन्न होणाऱ्या पादांभामुळे हा हालचाल करतो. पादांभाची संख्या व लांबी निश्चित नसते. भक्ष्य पकडताना आणि प्रचलन करताना पादाभ मोठे आणि स्पष्ट दिसतात. ते बोथट व बोटाप्रमाणे दिसतात.

अमीबाच्या कोशिकेभोवती जीवद्रव्यापासून (गुंतागुंतीचे रासायनिक संघटन असलेल्या मूलभूत सजीव द्रव्यापासून) बनलेले एक अत्यंत पातळ व लवचिक आवरण असते, त्याला कोशिकावरण किंवा जीवद्रव्य-कला म्हणतात. अमीबाच्या जीवद्रव्याचे बहिर्द्रव्य व अंतर्द्रव्य असे दोन थर असतात. बहिर्द्रव्य अकणिकामय व पारदर्शक असते. अंतर्द्रव्य कणिकामय व मध्यम पारदर्शक असते. जीवद्रव्याच्या मधोमध एक चक्राकार व बहिर्गोल केंद्रक असते. याशिवाय जीवद्रव्यात अनेक रिक्तिका असतात. काही रिक्तिकांत पाणी आणि अन्नकण असतात. या अन्नरिक्तिकेत अन्नाचे पचन होते. तसेच जीवद्रव्यात संकोचशील रिक्तिका असते. यात जीवद्रव्यातील कोन असलेले पाणी जमा होते. जीवद्रव्यातील पाण्याचे नियमन करणे हे संकोचशील रिक्तिकेचे कार्य आहे. संकोचशील रिक्तिकेत पाणी असेल त्या वेळीच ती दिसू शकते. पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास जीवद्रव्याची क्षमता कमी होतो. म्हणून संकोचशील रिक्तिका पाणी ग्रहण करते व हळूहळू मागील भागाकडे सरकत जाते. एका विशिष्ट मर्यादेनंतर संकोचशील रिक्तिकेत छिद्र तयार होऊन तिच्यातील पाणी कोशिकेबाहेर फेकले जाते. नंतर रिकामी झालेली संकोचशील रिक्तिका अदृश्य होते. पाण्याच्या या नियमनाला ‘तर्षण नियमन’ म्हणतात [⟶ तर्षण]. जीवद्रव्यात तैलगोल आढळतात. अमीबा ज्या पाण्यात राहतो त्या पाण्यातील डायाटम, डेस्मिड इ. सूक्ष्म वनस्पती, सूक्ष्म फ्लॅजेलेट प्राणी व जैव (सेंद्रिय) पदार्थ भक्षण करतो. अन्नरिक्तिकेतील अन्नपचन एंझाइमामुळे होते. न पचलेले अन्न कोशिकेबाहेर टाकण्यासाठी निश्चित छिद्र नसते, म्हणून कोशिकेच्या एका बाजूला सर्व मल जमा होऊन तेथे तात्पुरते छिद्र उत्पन्न होते व मलविसर्जन केले जाते. या क्रियेला बहिःक्षेपण म्हणतात. अमीबा जलश्वसन करतो. जीवद्रव्यातील प्रथिने व शर्करा यांच्या चयापचयामुळे (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमुळे) नायट्रोजनयुक्त पदार्थ तयार होतात. अमीबाच्या आवरणामधून ते तर्षण क्रियेद्वारे बाहेर टाकले जातात. अमीबाच्या कोशिकेत तंत्रिका तंत्र (मज्जा संस्था) नसूनही अमीबा संवेदनेला प्रतिक्रिया दाखवितो. प्रकाशकिरण तीव्र असले, तर अमीबा या किरणांपासून दूर जाऊ लागतो. त्याचप्रमाणे निरनिराळी रसायने, विद्युत् प्रवाह यांनाही अमीबा प्रतिक्रिया दर्शवितो, या क्षमतेला संवेदनशीलता म्हणतात

अमीबामध्ये प्रजोत्पादन अलैंगिक व लैंगिक पद्धतीने होते. 

अलैंगिक प्रजोत्पादन : याचे तीन प्रकार आहेत. 

(१) द्विभाजन : अमीबाचे केंद्रकासकट दोन लहान भाग होऊन प्रत्येक भाग स्वतंत्रपणे जीवन जगू लागतो. ही पद्धत अनुकूल परिस्थिती (विपुल अन्न व पाणी) असताना अवलंबिली जाते.

(२) बहुभाजन : प्रतिकुल परिस्थितीमध्ये ही पद्धत अवलंबिली जाते. अमीबा आपली कोशिका आकुंचित करून तिच्याभोवती एक कवच निर्माण करतो. नंतर केंद्रकांचे अनेक लहान भाग होऊन प्रत्येक भागाभोवती थोडेथोडे जीवद्रव्य जमा होते. यामुळे कवचाखाली अनेक अमीबे तयार होतात. परिस्थिती अनुकूल झाल्यावर हे कवच फुटते व प्रत्येक लहान अमीबा कवचाबाहेर पडून स्वतंत्रपणे जीवन जगू लागते.

(३) बीजाणुजनन :काही वेळा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अमीबाभोवती कवच निर्माण होत नाही. अमीबाच्या केंद्रकाचे अनेक भाग तयार होऊन प्रत्येक भागावर केंद्रकपटल तयार होते. तसेच जीवद्रव्य प्रत्येक केंद्रक भागाभोवती गोळा होऊन सर्वांत शेवटी त्या सर्वांवर बीजाणुकवच तयार होते. एका अमीबापासून सु. २०० बीजाणू उत्पन्न होतात. हे बीजाणू सुप्तावस्थेत असतात. परिस्थिती अनुकूल झाल्यावर बीजाणू आपल्या भोवतीचे कवच टाकून देतात आणि ते एकमेंकापासून दूर होतात व त्यांचे अमीबात रूपांतर होते.

अनेक अलैंगिक प्रजोत्पादनामुळे अमीबे शिथिल बनतात, अशा वेळी ते लैंगिक प्रजोत्पादन पद्धती अवलंबितात.

लैंगिक प्रजोत्पादन : संयुग्मन : दोन अमीबे एकमेकांजवळ येऊन आपल्या केंद्रकीय द्रव्याची अदलाबदल करतात. नंतर ते एकमेंकापासून अलग होतात व पुन्हा अलैंगिक प्रजोत्पादन करू लागतात.

यांशिवाय पुनर्जनन ही पद्धतही अमीबात अवलंबिली जाते. अमीबाच्या कोशिकेचे अनेक तुकडे केले, तर ज्या तुकड्यात केंद्रकाचा भाग असतो त्या तुकड्यापासून नवा अमीबा तयार होतो. ज्या तुकड्यात केंद्रकाचा भाग नसतो तो तुकडा नष्ट होतो.

मनुष्याच्या आतड्यात एंटामीबा आढळतो आणि माणसात ⇨आमांशाचा विकार उत्पन्न करतो. पेलोमिक्सा अमीबा २·५ मिमी. लांब असतो. लिमॅक्स अमीबा मातीत राहतो, तर हायड्रामीबा पाण्यात राहतो. आर‌्‌सेला डिफ्ल्यूजिया या वंशांतीलअमीबे बारीक वालुकाकणांचे आपल्या कोशिकेभोवती कवच बनवून पाण्यात राहतात.

सार्कोडिना या वर्गात ⇨ फोरॅमिनीफेरा, ⇨ रेडिओलॅरिया व ⇨ हीलिओझोआ या खोल समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांचा समावेश होतो. फोरॅमिनिफेरा प्राण्यांना सर्पिल (मळसूत्राच्या) आकाराचे कवच असते. त्यामुळे या प्राण्यांना संरक्षण मिळते. कवचावर असणाऱ्या असंख्य छिद्रांमधून पादाभ बाहेर पडतात व प्राण्याला हालचालीला मदत करतात. कवच १ मिमी. ते ५ मिमी. व्यासाचे असते. कॅमेरीना या लुप्त झालेल्या प्राण्याच्या कवचाची रुंदी १९ सेंमी. असते. एल्फिडियम सागरी वनस्पतीवर व समुद्रतळावर सरपटत असतात. ते ५४० मी. खोल पाण्यात सापडतात. ग्लोबिजेरीना हे समुद्रातील ⇨ प्लवकांत (पाण्यात तरंगणाऱ्या सूक्ष्म सजीवांत) सापडतात. त्यांचे कवच अनेक कप्प्यांचे असून प्रत्येक कप्प्यात कोशिकाद्रव्य विखुरलेले असते. हजारो वर्षापूर्वी मेलेल्या ग्लोबिजेरीनांच्या कवचांचे समुद्रतळावर थर झालेले आढळतात, याला ग्लोबिजेरीना, सिंधु जैवपंक [⟶ ऊझ] म्हणतात. अटलांटिक महासागराचा ६० टक्के तळ या कवचाच्या कित्येक मीटर जाड थरांनी व्यापलेला आहे. तसेच इंग्लंडमधील डोव्हर येथील काही कड्यांवर ही कवचे आढळतात. यावरून हे कडे लाखो वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेले होते, असे अनुमान काढता येते. कवच कॅल्शियम कार्बोनेटाचे बनलेले असते.

रेडिओलॅरिया हे समुद्रातील प्राणी आहेत. त्यांच्या कोशिकेभोवती सिलिकॉन डाय-ऑक्साइडाचे कवच आणि कवचावर अनेक काटे असतात. हे प्राणी पाण्यात तरंगत राहतात. मेलेल्या प्राण्यांची कवचे समुद्रतळावर साठून त्यांचे थर बनतात.

हीलिओझोआ या समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची कोशिका गोलाकार असून तीवर गुळगुळीत पदार्थाचे आवरण असते. त्यांचे पादाभ कोशिकेच्या सर्व बाजूंनी निघतात व त्यामुळे हे प्राणी पाण्यात तरंगत राहतात. [⟶ सार्कोडिना].


स्पोरोझोआ : या वर्गातील सर्व प्राणी परजीवी असून ते इतर प्राण्यांच्या शरीरात राहतात. या प्राण्यांच्या जीवनावस्थेतील पहिल्या अवस्थेत ते बीजाणूसारखे (स्पोअरसारखे) दिसतात. म्हणून त्यांना स्पोरोझोआ म्हणतात. 

या वर्गातील प्लास्मोडियम हा प्राणी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या प्राण्यामुळे माणसाला ⇨हिवताप हा रोग होतो. प्लास्मोडियमाच्या चार जाती आहेत व त्यांपैकी प्लास्मोडियम व्हायव्हॅक्स ही जाती महत्त्वाची आहे. या प्राण्याला आपला जीवनक्रम पुरा करण्यासाठी ॲनाफेलीस डासाची मादी व मनुष्य यांची गरज असते.

आयमेरिया हे प्राणी अनेक प्राण्यांच्या लहान आतड्यातील कोशिकेमध्ये राहतात तसेच मोनोसिस्टीस आणि ग्रेगॅरीना हे परजीवी अनेक प्राण्यांच्या शरीरात सापडतात. [⟶स्पोरोझोआ].

सिलिओफोरा : या वर्गात सु. ६,००० जातींचा समावेश केलेला आहे. हे प्राणी खाऱ्या, गोड्या आणि खाडीच्या पाण्यात राहतात. या प्राण्यांच्या कोशिकेवर सगळीकडे असंख्य पक्ष्माभिका असतात. पक्ष्माभिकांची संख्या व स्थान निरनिराळ्या जातींत वेगवेगळे असते. पक्ष्माभिकांमुळे या प्राण्यांना चलनवलनास मदत होते. त्यांच्या गोलाकार हालचालीमुळे हे प्राणी मागे-पुढे असे पोहत असतात. पॅरामिशियम हे या वर्गाचे उत्तम उदाहरण आहे. या प्राण्याचा पुष्कळ अभ्यास झालेला आहे. 

पॅरामिशियम हे पादत्राणाच्या तळव्याच्या आकाराचे, ०·२ ते ०·३ मिमी. लांबीचे, मुक्त संचार करणारे गोड्या पाण्यातील प्राणी आहेत. त्यांच्या बाह्य आवरणाला तनुच्छद म्हणतात. हे अत्यंत लवचिक असून त्यावर पक्ष्माभिका असतात. तनुच्छदाच्या खालील बहिर्द्रव्यात अनेक दंशांगे असतात. अंतर्द्रव्यात एक लघुकेंद्रक व एक बृहत्-केंद्रक, अन्नरिक्तिका व कोशिकेच्या एका बाजूला एक मोठी संकोचशील रिक्तिका असते. बृहत्त केंद्रक शरीरांतर्गत क्रियांचे तर लघुकेंद्रक प्रजोत्पादन क्रियेचे नियंत्रण करतो. हा प्राणी पाण्यातील सूक्ष्म प्राणी भक्षण करतो. [ ⟶ पॅरामिशियम].

प्रोटोझोआ संघात या वर्गाला बरेच उच्च स्थान मिळाले आहे. या प्राण्यांच्या कोशिकेवरील असंख्य पक्ष्माभिका, त्यांच्या साहाय्याने चलनाची पात्रता, कोशिकेमधील लघू आणि बृहत्-केंद्रके, संकोचशील रिक्तिका व अपूर्ण अन्ननलिका या लक्षणांमुळे या प्राण्यांचे स्थान उच्च पातळीवर आहे.

या वर्गातील इतर प्राण्यांची लक्षणे व वसतिस्थाने वेगळी असतात. ⇨व्हॉर्टिसेला या प्राण्याला देठासारखा भाग असून त्याच्या साहाय्याने ते पाने, दगड इत्यादींना चिकटून राहतात. हे प्राणी एकएकटे अगर समूहाने राहतात. 

आसिनेटा आणि ट्रायकोफ्राया यांसारखे प्राणी एका ठिकाणी चिकटून राहतात. त्यांच्या कोशिकेवर पक्ष्माभिका असतात परंतु पूर्ण वाढ झालेल्या प्राण्याच्या कोशिकेवरील पक्ष्माभिका नाहीशा होऊन त्यांऐवजी नाजूक संस्पर्शिका तयार होतात. संस्पर्शिकांच्या साहाय्याने भक्ष्य पकडून त्याच्या शरीरातील रस शोषले जातात. हे प्राणी ⇨सक्टोरिया या उपवर्गात मोडतात. काही प्राणी कासवाच्यापाठीवर अगर खेकडे, शेवंडे यांच्या अवयवांवर समूहाने राहतात. या वर्गातील कोणत्याही प्राण्यामुळे रोग होत नाहीत . [ ⟶ सिलिओफोरा].

अशा तऱ्हेने प्रोटोझोआ संघातील प्राणी अत्यंत खालच्या पातळीवरील असले, तरी त्यांच्यात खूपच वैचित्र्य आढळते व एंटामीबा, प्लास्मोडियम यांसारखे प्राणी अनेक मानवी रोग निर्माण करतात. 

संदर्भ : 1. Barnes, R.D. Invertebrate Zoology, Philadelphia, 1968.

           2. Hyman, L.H. TheInvertebrates, Vol. I, New York, 1940.

रानडे, द.र.