शुद्धिहरण : शरीराच्या कोणत्याही भागावर शस्त्रक्रिया करावयाची असल्यास रुग्णाच्या बाबतीत रक्तस्राव आणि असह्य वेदना या दोन प्रमुख अडचणींना सामोरे जावे लागते. सोळाव्या शतकापासून शल्यचिकित्साशास्त्रास शरीररचनेची आणि विविध रक्तवाहिन्यांची माहिती हळूहळू मिळत गेली. त्यामुळे रक्तस्राव कमी करणे शक्य झाले परंतु छेदन करताना किंवा आतील इंद्रिये, स्नायू, तंत्रिका ऊतक (मज्जा-ऊतक) इत्यादींना हाताळताना रुग्णास होणाऱ्या वेदना, अस्वस्थ करणाऱ्या संवेदना आणि त्यांतून निर्माण होणारी क्लेशकारक स्मृती टाळणे मात्र एकोणिसाव्या शतकापर्यंत शक्य झाले नाही. शस्त्रक्रिया करताना होणारी रुग्णाची धडपड, स्नायूंच्या जोरदार आकुंचनामुळे शस्त्रक्रियेत येणारा अडथळा, रक्तदाबातील वाढ, हृदयस्पंदनाची गती वाढणे किंवा मानसिक धक्क्यामुळे तंत्रिकीय आघातस्थिती निर्माण होणे यांसारख्या घटनांमुळे शस्त्रक्रिया ही एक धोकादायक उपचार पद्धती समजली जाई. शस्त्रकर्मापूर्वी मद्य, भांग, अफू यांसारखे अमली पदार्थ देऊन किंवा डोक्यावर आघात करून रुग्णाचे अंशतः शुद्धिहरण केले जाई. त्याचे हातपाय घट्ट बांधून किंवा पकडून ठेवून शक्य तितक्या जलद गतीने शस्त्रक्रिया उरकली जात असे.

अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडमध्ये सर हंफ्री डेव्ही आणि मायकेल फॅराडे यांनी नायट्रस ऑक्साइड वायू (हास्य वायू) व डायएथिल ईथर हा बाष्पनशील द्रव यांचे गुणधर्म पाहताना ते हुंगून शस्त्रक्रियेसाठी असंवेदनाची (ॲनेस्थेशियाची) स्थिती निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होईल, असे सुचविले होते. कार्बन डाय-ऑक्साइड वायू वापरून बेशुद्ध केलेल्या प्राण्यांचे विच्छेदन करणारे एच. एच. हिकमन यांनी तर कोणत्याही वायूचा वापर या कामासाठी करता येईल, असे प्रतिपादन केले होते परंतु पुढील तीस-चाळीस वर्षे वैद्यकीय क्षेत्रातील कोणीही अशा शक्यतांची दखल घेतली नाही. उलट अमेरिकेत ईथर व नायट्रस ऑक्साइड यांचा उपयोग गमतीसाठी वृत्ती उल्हसित करणे व मजेदार नाचगाण्याचे कार्यक्रम करणे यांसाठी लोकप्रिय ठरला. १८४२ साली अशाच एका कार्यक्रमात झालेल्या काही जखमांची जाणीव त्या व्यक्तींना होत नाही, असे चार्ल्स लाँग यांच्या लक्षात आले. त्यांनी ईथर हुंगवून आपल्या रुग्णांची अर्बुदे (शरीराला उपयोगी नसलेल्या व कोशिकांची–पेशींची–अत्याधिक वाढ हो ऊन बनलेल्या गाठी) वेदनारहित पद्धतीने कापून काढायला सुरुवात केली परंतु १८४९ पर्यंत हे अनुभव प्रसिद्ध झाले नाहीत. दरम्यानच्या काळात होरेस वेल्स व डब्ल्यू. एस. मॉर्टन या अमेरिकन दंतवैद्यांनी हास्यवायूच्या मदतीने दात उपटून दाखविले. वायूपेक्षा हाताळायला सोपा असा ईथर १६ ऑक्टोबर, १८४६ रोजी जाहीरपणे वापरण्याचे प्रात्यक्षिक मॉर्टन व जे.सी. वॉरन यांनी मानेवरचे अर्बुद कापण्याच्या शस्त्रक्रियेत दाखविले. त्याच वर्षी ऑलिव्हर वेंड्ल होम्स यांनी ॲनेस्थेशिया (असंवेदनत्व) हा शब्द सुचविला. इंग्लंडमध्ये रॉबर्ट लिस्टन यांनी रोग्याचा पाय कापण्यासाठी व स्कॉटलंडमध्ये जेम्स यंग सिंप्सन यांनी प्रसूतिसाठी ईथरचा उपयोग नंतरच्या काही महिन्यांतच केला. १८४७ च्या नोव्हेंबरमध्ये सिंप्सन यांनी क्लोरोफॉर्म वापरून तेच जास्त चांगले असल्याचा दावा केला.त्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या प्रसूतीसाठी ते द्रव्य थोड्याच दिवसांनी वापरून असंवेदनत्वाच्या लोकप्रियतेस हातभार लावला. एकोणिसाव्या शतकाअखेर असंवेदनत्वाचा उपयोग ही वैद्यक व्यवसायाची एक स्वतंत्र शाखा म्हणून मान्यता पावली.

कापणे किंवा भाजणे यांसारखी कोणतीही हानिकारक क्रिया शरीराच्या एखाद्या भागावर कार्य करते, तेव्हा तिची जाणीव व्यक्तीला होण्यासाठी तंत्रिका तंत्रामधील (मज्जासंस्थेमधील) संदेशवहनाचा पुढील मार्ग अनुसरला जातो. वेदनासंवेदकग्राही → सूक्ष्म तंत्रिका तंतूंचे जाळे → तंत्रिका शाखा → मोठी तंत्रिका → मेरुरज्जूत प्रवेश करणारे तंत्रिकेचे पृष्ठीय मूळ → मेरुरज्जूच्या आतील तंत्रिका पथ → थॅलॅमस / अभिवाही–मस्तिष्क केंद्र → प्रमस्तिष्काच्या पश्च प्रदेशातील विशिष्ट संवेलकाचा प्रातिनिधिक भाग [→ तंत्रिका तंत्र]. यांपैकी मेरुरज्जूमधील तंत्रिका पथाचा संपर्क ऐच्छिक स्नायूंची हालचाल घडविणाऱ्या तंत्रिका कोशिकांशी येत असतो. त्यामुळे प्रतिक्षेपी हालचाली होतात [→ प्रतिक्षेपी क्रिया]. उदा., वेदनाजनक वस्तू काढून टाकणे किंवा तिच्यापासून दूर होणे. थॅलॅमसाच्या आसपासच्या क्षेत्रात स्वायत्त तंत्रिका तंत्राशी संबंध असल्याने हृदयक्रिया, श्वसन, पचनेंद्रिये इत्यादींमध्ये प्रतिक्षेपी बदल घडतात. प्रमस्तिष्काच्या बाह्यकात वेदनेचा अर्थ लावला जातो उदा., तीव्र, ठुसठुसणारी, उष्णताजन्य इ. वेदना आणि तिच्या शरीरातील निर्मितीची जागा निश्चितपणे जाणवते.

प्रकार : औषधी द्रव्याच्या मदतीने या संपूर्ण मार्गात कोणत्याही एका जागी अडथळा आणून असंवेदनत्व किंवा वेदनाहरण (ॲनाल्जेशिया) घडवून आणणे शक्य असते. स्थूलमानाने असंवेदनत्वाचे पुढील दोन प्रकार आहेत.

सार्वदेहिक : जेव्हा संवेदना अडविण्यासाठी औषधी द्रव्य ⇨ मेरुरज्जूच्या वरील पातळीवर, म्हणजेच मेंदूमध्ये पोचते, तेव्हा विशिष्ट संवेदनांबरोबरच इतर सर्व संवेदनाही लोप पावतात. आरोहक सक्रियण प्रणालीचे अवसादन होते व जागृतावस्थेचे रूपांतर शुद्धिहीनतेत होते. अशा स्थितीस सार्वदेहिक असंवेदनत्व किंवा शुद्धिहरण म्हणतात.

स्थानिक : (स्थानीय). वेदनानिर्मितीच्या अपेक्षित स्थानापासून मेरुरज्जूमधील तंत्रिका पथापर्यंत कोणत्याही ठिकाणी औषधी द्रव्य लावले जाते, तेव्हा जागृतावस्था अबाधित असते. या स्थानिक असंवेदनत्वास ⇨ संवेदनाहरण किंवा बधिरीकरण असेही म्हणतात. त्वचा किंवा श्लेष्मपटलाचा पृष्ठभाग, पृष्ठभागाखालील सूक्ष्म तंत्रिकाजाल, तंत्रिका, मेरुरज्जूत प्रवेश करणारे पृष्ठीय मूळ, मेरुपुच्छ, मेरुरज्जूच्या दृढ आवरणाच्या बाहेरील किंवा आतील भाग व पहिली उरीय तंत्रिका मेरुरज्जूमधून बाहेर पडते त्या पातळीपर्यंतचा मेरुरज्जूचा पृष्ठभाग अशा विविध ठिकाणी संवेदनाहारक द्रव्य प्रविष्ट करून असे बधिरीकरण साधता येते. उदरावरील फार खोल न जाणाऱ्या शस्त्रक्रिया, अंतस्त्य इंद्रियांशी संबंध नसणाऱ्या हातावरील व पायावरील शस्त्रक्रिया, मर्यादित क्षेत्रांशी संबंधित (नसबंदी, अंतर्गळ, मूळव्याध यांसारख्या) शस्त्रक्रिया यांमध्ये ही पद्धत उपयोगी पडते. तसेच उच्च रक्तदाब, अशक्तपणा, श्वसनमार्गाचे विकार यांसारख्या विकारांत सार्वदेहिक शुद्धिहरणाचा धोका पत्करणे इष्ट नसते. अशा वेळीही स्थानिक संवेदनाहरणाचा अवलंब करावा लागतो.

अवस्था : शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला जागृतावस्थेतून सुरक्षितपणे शुद्धिहरणाच्या अवस्थेत नेणे व आवश्यक अवधीपुरती तशी अवस्था टिकवून ठेवणे, हे तज्ञाच्या कौशल्यपूर्ण हाताळणीवर आणि योग्य अशा शुद्धिहारक द्रव्यांच्या निवडीवर अवलंबून असते. ही प्रक्रिया चार अवस्थांमध्ये विभागून तिचा विचार केला जातो. तोंडावर मुखवटा ठेवून त्यावाटे ईथर किंवा क्लोरोफॉर्म हुंगावयास दिले असता या अवस्था स्पष्टपणे दिसतात. त्या पुढे दिल्या आहेत.

प्रथमावस्था : (वेदनाहरणाची अवस्था). औषधी द्रव्य देण्यास सुरुवात केल्यापासून, म्हणजेच प्रवर्तनाच्या आरंभापासून ते संज्ञाप्रवाह खंडित होईपर्यंत ही अवस्था टिकते. वेदनांची जाणीव बोथट होणे, स्मृती नष्ट होणे, सुखभ्रांती, शांत पण काहीसे अनियमित श्वसन व सर्व ⇨ प्रतिक्षेपी क्रिया अबाधित असे या अल्पकालिक अवस्थेचे स्वरूप असते. एखाद्या गळवावर छेद घेणे किंवा हलणारा दात चटकन उपटणे अशी किरकोळ शल्यकर्मे या अवस्थेत करता येतात.


द्वितीयावस्था : (उत्तेजनावस्था). प्रतिक्षेपी क्रियांवरील मेंदूचे दडपण कमी झाल्यामुळे अजाणतेपणी रुग्णांची धडपड सुरू श्वास रोखून धरणे किंवा अनियमित श्वसन लाळ, श्वसनमार्गातील स्राव, जठरातून उलटून आलेला स्राव यांचा नाक व घसा यांमध्ये अडथळा होण्याची शक्यता खोकणे डोळ्यांची इकडेतिकडे हालचाल, बाहुल्या विस्फारलेल्या रक्तदाब व नाडीचे ठोके वाढलेले कृत्रिम दात निघून येऊन गिळले जाण्याचा धोका जीभ चावली जाणे वगैरे अडचणी येऊन या अवस्थेत कोणतेही शल्यकर्म अशक्य असल्याने ती शक्य तेवढ्या लवकर निर्वेधपणे पार पाडून पुढील अवस्था गाठण्याचा प्रयत्न भूलतज्ज्ञ (असंवेदनतज्ज्ञ) करीत असतात.

तृतीयावस्था : (शस्त्रक्रियायोग्य असंवेदनत्व). शल्यचिकित्सेच्या मार्गदर्शनासाठी या अवस्थेचे चार पातळ्यांमध्ये विभाजन केले जाते.

पातळी एक : श्वसन नियमित, स्वयंचलित किंवा यांत्रिकपणे सुरू होते. डोळ्यांची हालचाल थांबून ते एका जागी स्थिरावतात. बाहुल्यांचे विस्फारण थांबून किंचित आकुंचन पापण्यांच्या कडांना कापसाने स्पर्श केला असता होणारी प्रतिक्षेपी फडफड बंद होते घशाची प्रतिक्षेपी हालचाल (गिळणे) थांबते सर्व लहान स्नायू शिथिल होऊ लागतात.

पातळी दोन : बुबुळे मधोमध स्थिर होतात त्यांना स्पर्श करूनही पापण्यांची प्रतिक्षेपी फडफड (स्वच्छमंडल प्रतिक्षेप) होत नाही घसा व स्वरयंत्र यांना आतून स्पर्श केल्यास श्वसनमार्गाचा संकोच होत नाही (नळी घालता येते) मोठे स्नायू थोडे शिथिल होतात.

पातळी तीन : बाहुलीवर प्रखर प्रकाश टाकूनही प्रकाश प्रतिक्षेपामुळे होणारे आकुंचन आढळत नाही. जवळजवळ सर्व स्नायूंचे शिथिलन झाल्यामुळे खोलवर असलेल्या इंद्रियांना हाताळणे सुलभ जाते परंतु त्याच वेळी बरगड्यांच्या स्नायूंची हालचाल थांबल्यामुळे फक्त उरोउदरीय पटलाच्या मदतीने उथळ व अनियमित श्वसन होते.

पातळी चार : बाहुल्यांचे विस्फारण सुरू होते संपूर्ण शिथिलीभवन होऊन श्वसन अत्यंत क्षीण होते रक्तदाब कमी व नाडी जलद होते सर्व प्रतिक्षेप अनुपस्थित असतात.

चतुर्थावस्था : (लंबमज्जीय आघाताची अवस्था). तंत्रिका अवसादन केवळ मेंदू व मज्जारज्जूपुरते मर्यादित न राहता लंबमज्जेतील श्वसनकेंद्र, रक्तवाहिनी केंद्र यांसारख्या जीवनावश्यक नियंत्रक क्षेत्रापर्यंत पोचते. त्यामुळे रक्तदाब व हृदयस्पंदन अत्यंत क्षीण होते. त्वचा थंड पडते बाहुल्या पूर्ण विस्फारित होतात. श्वसन अधूनमधून एखादी धाप टाकल्यानंतर पूर्णपणे बंद होते. कृत्रिम श्वसन, ऑक्सिजन व रक्तदाब वाढवणारी औषधे त्वरित न वापरल्यास मृत्यू अटळ असतो. विप्लवावस्था या नावानेही ही अवस्था ओळखली जाते. तंत्रिकीय आघाताची ही अवस्था आधुनिक साहाय्यक उपकरणांच्या मदतीने सहज टाळता येते.

शुद्धिहरणासाठी उपलब्ध द्रव्ये : आदर्श शुद्धिहरणामध्ये वेदनाहरण, जाणिवेचा लोप, स्मृतिहरण, स्नायूंचे पुरेसे शिथिलन, त्रासदायक प्रतिक्षेपांचा जोर कमी करणे (उदा., घशातील स्राव, श्वसनी आकुंचन) या गोष्टी अपेक्षित असतात. तसेच शुद्धिहरणाचे प्रवर्तन (सुरुवात) जलद व्हावे तिसऱ्या व चवथ्या अवस्थांमध्ये सुरक्षित अंतर असावे शस्त्रक्रिया-शाळेत (ऑपरेशन थिएटर) स्फोट होऊ नये दाहक बाष्पामुळे शल्यचिकित्सकादि वैद्यकीय कर्मचारी ग्रस्त होऊ नयेत हृदय, वृक्क (मूत्रपिंड), यकृतावर विषाक्त परिणाम नसावा शस्त्रक्रियेनंतर वृक्क, मूत्राशय, जठारांत्रमार्ग इ. जलद पूर्वस्थितीस यावेत व रुग्ण सहज शुद्धीवर यावा अशी सर्वंकष अपेक्षा असते. कोणत्याही एका द्रव्याच्या मदतीने ही सर्व उद्दिष्टे साध्य होणे अशक्य असते. प्रत्यक्षात अनेक द्रव्यांचा संतुलित उपयोग करून आणि त्यांच्या मदतीला शुद्धिहरणापूर्वी व शस्त्रक्रियेच्या काळात इतर साहाय्यक द्रव्ये वापरून हा परिणाम साधावा लागतो.

यासाठी पुढील प्रकारची द्रव्ये वापरता येतात : (१) श्वसनमार्गे देण्यासाठी : (अ) वायू : मुख्यतः नायट्रस ऑक्साइड. पूर्वी सायक्लोप्रोपेन व एथिलीन. (आ) बाष्पनशील द्रव (कोष्टक क्र. १) : यांपैकी क्लोरोफॉर्म, ट्रायक्लोरोएथिलीन आता कालबाह्य झाले आहेत. एथिल क्लोराइडचा उपयोग शीतनाने स्थानिक पृष्ठभागाचे संवेदनाहरण करण्यापुरता मर्यादित राहिला आहे.

कोष्टक क्र. १. शुद्धिहरणासाठी श्वसनमार्गे वापरण्यासारखे पदार्थ. 

पदार्थ

वायुभवन तापमान (० से.)

किमान वायुकोषीय संहती (प्रतिशत)

नायट्रस ऑक्साइड

वायू

१०० पेक्षा अधिक

डायएथिल ईथर

३६

२·००

हॅलोथेन

५०

०·७५

एन्‌फ्ल्यूरेन 

५७

१·६०

आयसोफ्ल्यूरेन

४९

१·२८

डेस फ्ल्यूरेन 

२३

६·००

सेव्हो फ्ल्यूरेन 

५९

२·०५

मिथॉक्सी फ्ल्यूरेन 

१०५

०·१६

सायक्लोप्रोपेन

वायू

१०·००

क्लोरोफॉर्म

६१

०·८०

ट्रायक्लोरोएथिलीन

८७

०·१७

एथिलीन

वायू

८०·००

झेनॉन

वायू

७१·००

     

[शुद्ध ऑक्सिजनबरोबर मिश्रण केले असता ज्या संहतीने ५० प्रतिशत व्यक्तींमध्ये शल्यकर्माची जाणीव होत नाही (उदा., सुरीने छेद घेतल्यास हालचाल होणे) ती संहती ‘किमान वायुकोषीय संहती’ या शीर्षाखाली दिली आहे. तिच्यावरून व्यस्त प्रमाणाने पदार्थाच्या प्रभावाची कल्पना येते. शेवटच्या पाच पदार्थांचा उपयोग आता फारसा केला जात नाही.]

(२) प्रोपोफॉल, इटोमिडेट, केटामीन, पेंटोथाल (थायोपेंटोन) सोडियम, मिथोहेक्झिटोन, मिडॅझोलॅम इ. द्रावणे शिरेतून (नीलेतून) देतात. शायके, ⇨ शामके आणि ⇨ शांतके या वर्गांवरील संशोधनातून अनेक रासायनिक पदार्थ शुद्धिहरणासाठी विकसित करण्याचा प्रयत्न चालू आहे.

शुद्धिहरणाची पूर्वतयारी : रुग्ण शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात आल्यापासूनच पूर्वतयारीला सुरुवात होते. प्रथम त्याची आरोग्यविषयक पार्श्वभूमी समजून घेतली जाते. यात नोंदलेल्या गोष्टींमध्ये धूम्रपान, मद्यपान व तंबाखू सेवन यांसारख्या सवयी कोणत्याही प्रकारच्या औषधांना अतिसंवेदनत्वाचा इतिहास, मधुमेह वा रक्तदाबासारखे दीर्घकालिक विकार व त्यासाठी घेत असलेली औषधे, पूर्वी शस्त्रक्रियेसाठी वापरलेली द्रव्ये त्रासदायक ठरली असल्यास त्यांची माहिती, कुटुंबातील इतर व्यक्तींना आनुवंशिक औषधाविषाक्तता जाणवल्याची माहिती इत्यादींचा समावेश होतो.    

नंतर शारीरिक तपासणी करून वाकडेतिकडे दात, कवळी, श्वसनमार्गात नळी घालण्यात येऊ शकणारे अडथळे, मानेच्या हालचालीमधील अडचणी, हनुवटीपासून स्वरयंत्रापर्यंतचे अंतर (६ सेंमी. पेक्षा कमी असल्यास येणारी संभाव्य अडचण), रक्तदाब, श्वसन तंत्राची कार्यक्षमता यांची नोंद रुग्णाच्या कागदपत्रांत केली जाते.

कोणत्याही प्रकारचे शुद्धिहरण वा संवेदनाहरण नियोजित असले, तरी शस्त्रक्रियेपूर्वी रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण (ऑक्सिजनवहनाची क्षमता), श्वेतकोशिकांची मोजणी, रक्तगट निर्धारण व मूत्रतपासणी (ग्लुकोज, अल्ब्युमीन व सूक्ष्मदर्शकीय परीक्षण) करणे इष्ट असते. तसेच पूर्वेतिहास व शारीरिक तपासणीच्या आधारे अवश्य वाटल्यास विद्युत् हृल्लेखन (ECG), मान व छातीचे क्ष-किरण चित्रण, फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेची चाचणी, रक्तातील सोडियम वायूंची संहती (प्रमाणे) यांचेही स्पष्ट चित्र शुद्धिहरणतज्ज्ञास उपलब्ध व्हावे लागते.


अमेरिकन सोसायटी ऑफ ॲनेस्थिशियॉलॉजिस्ट (ASA) या संस्थेने रुग्णांच्या शारीरिक सुस्थितीप्रमाणे त्यांचे वर्गीकरण १ ते ५ असे उतरत्या क्रमाने करण्याची पद्धती तयार केली आहे. एल. गोल्डमन यांनीही विविध प्रतिकूल घटकांना गुण देऊन त्यांच्या बेरजेप्रमाणे (० ते २५ किंवा अधिक) शुद्धिहरण स्थितीत हृदयक्रियेतील गुंतागुंत उदभवण्याची किंवा मृत्यू ओढवण्याची संभाव्यता दर्शवणारी कोष्टके मांडली आहेत. अशा वर्गीकरणांच्या आधारे धोके ओळखून त्यानुसार प्रतिबंधक औषधयोजना व शुद्धिहारक द्रव्यांची निवड व तंत्रांचे नियोजन करण्याची प्रथा आहे. आयत्या वेळी ठरलेल्या तातडीच्या शस्त्रक्रियेपूर्वी (उदा., अपघात, अंतर्गत रक्तस्राव) सर्व माहिती गोळा करणे शक्य नसते त्यामुळे काहीसा धोका पत्करून उपलब्ध तंत्रांपैकी सर्वांत अधिक सुरक्षित वाटेल त्याची निवड करावी लागते.

शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी रुग्णाला चिंतानाशक शांतक, शामक किंवा शायकाची मात्रा देऊन त्याची भीती कमी केली जाते. अशा औषधांमुळे शुद्धिहरणाची सुरुवात करणाऱ्या प्रवर्तकाची मात्राही कमी प्रमाणात लागते. जठर रिकामे राहण्यासाठी आदल्या दिवशी हलका द्रवरूप आहार देतात. दुसऱ्या दिवशी निराहार स्थितीत रुग्ण शस्त्रक्रिया कक्षात येतो. लाळ व श्वसनमार्गीय स्राव कमी करण्यासाठी ॲट्रोपिनासारखे कोलीनरोधी किंवा सिमेरिडीन वर्गातील ‘हिस्टामीन-दोन’ ग्राहींचे रोधक द्रव्य मळमळणे व उलटी होणे टाळण्यासाठी मेटोक्लोप्रमाइड अथवा ड्रोपेरिडॉल गुंगी आणणारे मॉर्फीन किंवा पेथिडीन हे वेदनाशामक अशा विविध औषधी मात्रा पूर्वतयारी कक्षात दिल्या जातात. त्यामुळे शुद्धिहरणाची दुसरी अवस्था सुकर होते श्वसनमार्गाची हाताळणी करताना प्रतिक्षेपी बदल (स्वरयंत्र व श्वासनालाचे संकोचन, हृदयाच्या गतीमध्ये घट होणे) सौम्य होतात शुद्धिहरणाच्या समाप्तीनंतर ताबडतोब वेदना सुरू होत नाहीत आणि नंतरच्या काळात शस्त्रक्रियेतील संवेदनांची स्मृती राहत नाही. औषधयोजनेच्या या काळात रुग्णाच्या इतर विकारांसाठी (उदा., मधुमेह, रक्तदाब, वाहिनीक्लथन, जठरव्रण) चालू असलेल्या औषधांच्या मात्रांमध्येही आवश्यक तो बदल केला जातो उदा., रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे औषध कमी करून शस्त्रक्रियेतील रक्तस्राव टाळणे किंवा निराहार स्थितीत मधुमेहावरील औषधाची मात्रा कमी करणे किंवा पुढे ढकलणे. 

शुद्धिहरणाची सुरुवात : शस्त्रक्रियेसाठी ठरविलेल्या वेळेच्या सु. अर्धा ते एक तास आधी वरील औषधे इंजेक्शनांच्या स्वरूपात देतात. त्यानंतर रुग्णाला शस्त्रक्रियाशाळेत हलविण्यात येते. आधुनिक, मोठ्या रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया कक्षात किंवा संकुलात शस्त्रक्रियाशाळेस लागूनच पूर्वतयारीचा कक्ष असतो. तेथे त्या दिवशी शस्त्रक्रियेसाठी निश्चित केलेल्या सर्व रुग्णांना नियोजित वेळेआधी आणून पूर्वतयारीची औषधे देण्यात येतात. तसेच आधीच्या रुग्णावरील उपचार संपल्याचा संकेत मिळताच पूर्वतयारी कक्षातच शुद्धिहरणाचे प्रवर्तन (सुरुवात) करण्याचीही सोय असते.

नीलामार्गे किंवा श्वसनमार्गे असे दोन पर्याय प्रवर्तनासाठी मोकळे असतात. नीलामार्गासाठी हाताची किंवा पायाची एखादी स्पष्ट दिसणारी नीला तिच्यात जाड सुई (१४ ते १६ जी आकाराची) घालून कायमची उपलब्ध करून ठेवता येते. चिकटपट्टीने कातडीवर घट्ट बसवलेली ही सुई लवणद्राव वा ग्लुकोज ५% द्रावणाच्या बाटलीला जोडून सतत पण मंद गतीने प्रवाह चालू ठेवणे सोईस्कर ठरते. कधीकधी नीला सापडण्यास अडचण झाल्यास स्थानिक बधिरीकरण करून नीलेचा काही भाग विच्छेदन करून शोधून मोकळा करावा लागतो. प्रोपोफॉल, पेंटोथाल यांसारखी शुद्धिहारके हळूहळू द्रावण प्रवाहात (किंवा सरळ रक्तात) सोडली असता, १० ते ३० सेकंदांत शुद्धिहरण घडून येते. कारण ही सर्व औषधे वसाविद्राव्य असून मेंदूपाशी पोहोचताच तंत्रिकीय ऊतकांत त्वरीत प्रवेश करतात. एकदा दिलेल्या मात्रेचा परिणाम १० ते २० मिनिटे टिकतो. शरीरातील इतर वसा ऊतक (उदा., त्वचेखालील चरबी, उदरातील चरबी) जसजसे या द्रव्यांचे अधिकाधिक ग्रहण करतात, तसतशी रक्तातील पातळी ओसरून शुद्धिहरणाची अवस्था उथळ होऊ लागते. या मार्गाने प्रवर्तन केल्यावर तिसरी अवस्था विनासायास प्राप्त होत असल्यामुळे लगेचच श्वसनमार्गात नळी घालून किंवा तोंडावर मुखवटा ठेवून वायुरूप औषधाची सुरुवात केली जाते. प्रारंभिक मात्रेनंतर पुन्हा मात्रा देऊन परिणाम टिकवण्याचा प्रयत्न सहसा केला जात नाही. कारण नीलेतून दिलेली औषधे उत्सर्जित होण्याचा वेग सर्वस्वी यकृत व वृक्कांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो व ही कार्यक्षमता शुद्धिहरणात कमी झाल्याने औषधाचा शरीरात संचय होऊन दीर्घकाळ गुंगी टिकून राहण्याचा धोका असतो. 

पूर्वतयारीशिवाय करावयाच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी नीलामार्गे प्रवर्तन अत्यंत उपयोगी ठरते. श्वसनकेंद्राचे किंवा रक्तदाबकेंद्राचे अवसादन, अतिसंवेदनाजन्य प्रतिक्रियेमुळे रक्तदाब घटणे, उचकी लागणे, अनैच्छिक हालचाली यांसारख्या काही घटनांची संभाव्यता लक्षात ठेवून त्यावरील उपायांची सिद्धता नीलामार्गे प्रवर्तनाच्या वेळी करून ठेवावी लागते.    

अंतःश्वसनी प्रवर्तनासाठी नायट्रस ऑक्साइड, ईथर किंवा अन्य बाष्पनशील द्रव ऑक्सिजनाबरोबर दिले जाते. प्रवर्तनास लागणारा दीर्घकाळ, श्वसनमार्गाच्या संकोचनाची शक्यता, श्लेष्मल स्रावांचा अडथळा, मस्तिष्काच्या भोवतालचा दाब (कर्परांतर्गत दाब) वाढण्याची शक्यता (डोक्याला दुखापत झाली असल्यास हानिकारक) यांसारखे तोटे लक्षात घेऊन हा मार्ग शक्यतो टाळला जातो परंतु नीलामार्ग सापडण्यास अडचण असल्यास किंवा अगदी लहान मुलांमध्ये श्वसनकेंद्राच्या अवसादनाचा धोका टाळण्यासाठी ही पद्धत उपयोगी पडते. प्रौढांमध्येही रुग्णाचे सहकार्य चांगले असल्यास ती सुरक्षित ठरते. फुफ्फुसांच्या वायुकोषीय पटलांमधून विस्तृत क्षेत्रफळामुळे औषधी वायूंचे शोषण जसे त्वरीत होते, तसेच उत्सर्जनही जलद गतीने होते. त्यामुळे रक्तात शुद्धिहारक द्रव्य साठून राहण्याची शक्यता नसते. सर्व अवस्था हळूहळू पार पडत असल्यामुळे व त्यांची लक्षणे स्पष्ट दिसत असल्यामुळे ही पद्धत सुरुवातीच्या काही अडचणींनंतर सुरक्षित ठरते. विशेषतः श्वसनमार्गातील अडथळ्यांची शक्यता आधीच लक्षात येऊन सुरुवातीपासूनच त्यांच्यावर मार्ग काढण्यास या पद्धतीने मदतच होते, असे काही तज्ज्ञ मानतात.

शुद्धिहरणाचे संधारण : (स्थिती टिकवून ठेवणे). प्रवर्तन पूर्ण झाल्यावर शस्त्रक्रियाशाळेतील मुख्य टेबलावर संधारणाची प्रक्रिया विनाविलंब सुरू होते. श्वसनेतर मार्गांचा उपयोग या उद्देशाने कधीकधी प्रोपोफॉल किंवा केटामिनाच्या मदतीने केलेला आढळतो परंतु त्यांच्या मात्रांचा अचूक वेग ठरविणे कठीण जाते.    

श्वसनमार्गाने संधारण करण्यासाठी सुरुवातीलाच तो मार्ग सुव्यवस्थितपणे मोकळा करून त्यात वायुवाहिनी घालून ठेवली जाते व तिची जोडणी शुद्धिहरण यंत्राशी केली जाते. या उद्दिष्टासाठी पुढील पर्यायी पद्धती आहेत.    

(अ) सुरुवातीच्या काळात क्लोरोफॉर्म किंवा ईथरचा वापर खुल्या ठिबक पद्धतीने केला जाई. रुग्णाच्या चेहेऱ्यावर एक जाळीदार कापडाचा मुखवटा ठेवून त्यावर थेंबथेंब द्रव ओतण्याची ही पद्धत अजूनही कधीकधी वापरात आढळते. बाष्पाचे प्रमाण सतत एका पातळीवर टिकवणे कठीण असल्यामुळे व इतरांना उपद्रव होत असल्याने आता बिनजाळीचे, कठीण प्लॅस्टिकचे व चेहेऱ्याच्या रूपरेषेप्रमाणे ओतीव असे मुखवटे (विविध मापांत) वापरले जातात. शुद्धिहरण यंत्राला जोडता येणारे हे मुखवटे औषधी बाष्प किंवा वायू आणि ऑक्सिजन यांची बचत करतात. आपत्कालीन जीवसंरक्षक कार्यासाठी वापरात असलेले अंबू मुखवटे पारदर्शक असतात. उलटून आलेला द्रव त्यात सहज दिसू शकत असल्याने तेही शुद्धिहरणासाठी वापरता येतात.


(आ) केवळ मुखवटा वापरून नाक व तोंडापासून पुढील श्वसनमार्गाच्या मोकळेपणाची खात्री देता येत नाही. नाकातील किंवा घशातील पोकळी संकुचित असल्यास किंवा जीभ मागे पडून तिचा अडथळा होऊ नये म्हणून कृत्रिम वायुमार्गांचा उपयोग करता येतो. गुडेलचा मुखग्रसनी वायुमार्ग या नावाने ओळखली जाणारी चपटी वक्राकार, धातूची किंवा प्लॅस्टिकची नळी यासाठी वापरतात. तिचे बाहेरचे टोक पसरट चकती बसविलेले आणि आतील टोक जिभेवरून घशात श्वसनमार्गाच्या तोंडाशी पोहोचणारे व गुळगुळीत असते. त्यामुळे रुग्णाचे तोंड अर्धवट उघडे व जीभ दाबलेली राहते. अशाच प्रकारचा, परंतु लवचिक रबरी नासिका ग्रसनी वायुमार्ग नाकपुडीतून घशापर्यंत सरकविता येतो. यांपैकी कोणतेही साधन आधी व्यवस्थित बसवून नंतर तोंडावर मुखवटा ठेवला जातो.

(इ) वरीलपैकी कोणताही मार्ग समाधानकारक नसल्यास व जठरातून उलटून आलेला द्रव श्वसनमार्गात शिरण्याचा धोका अधिक प्रमाणात असल्यास स्वरयंत्रदर्शकाच्या मदतीने थेट श्वासनालात नळी घालणे एवढा एकच पर्याय उरतो परंतु १९८८ पासून स्वरयंत्राच्या तोंडावर घट्ट बसविता येणारा स्वरयंत्र मुखवटा वायुमार्ग नावाचा आणखी एक मार्ग प्रचारात येत आहे. तोंडातून अन्ननलिकेच्या वरच्या टोकापर्यंत सरकविलेले हे साधन त्याला जोडलेल्या रबरी नळीतून हवा फुंकून एखाद्या रबरी टोपणाप्रमाणे स्वरयंत्रावर घट्ट बसवितात. त्याची मुख्य वायुमार्गीय नळी शुद्धिहरण यंत्राला जोडता येते.    

(ई) स्वरयंत्र पार करून श्वासनालात जाणारी व तेथे हवाबंद बसू शकणारी अंतःश्वासनालीय नलिका ही नळी मुखातून किंवा तेथे शस्त्रक्रिया करावयाची असल्यास नाकपुडीतून घालता येते. रुग्णाला कसेही वळविले किंवा पोटावर झोपविले, तरी वायुमार्ग अबाधित राहतो. कृत्रिम श्वसनयंत्राच्या मदतीने श्वसनक्रिया चालू ठेवणे या नळीमुळे शक्य होते. ३ ते ९ मिमी. अंतर्गत व्यासाच्या व १० ते २५ सेंमी. लांबीच्या नळ्या मिळू शकतात. स्वरयंत्रावर बधिरक द्रव्याचा फवारा मारून व स्नायुशिथिलक औषधाची मात्रा देऊन नळी घातल्यास प्रतिक्षेपी संकोचन टाळता येते.

संधारणाची व्यवस्था पूर्ण झाल्यावर शस्त्रक्रियेची सुरुवात होते. ती चालू असताना शुद्धिहरणाची पातळी सतत तृतीय अवस्थेतील एक किंवा दोन पातळीवर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न चालू असतो. स्नायुंच्या शिथिलीकरणासाठी तात्पुरती तिसऱ्या अवस्थेतील तिसऱ्या पातळीपर्यंत खोली वाढवता येते किंवा तसे न करता कंकालीय स्नायु-शिथिलक औषध नीलांमार्गे दिले जाते. यासाठी पुढील प्रकारची द्रव्ये उपलब्ध असतात.    

(१) सक्सामिथोनियम हे विध्रुवीकारक व अल्पकाळ (४ ते ६ मिनिटे) परिणामकारक ठरणारे द्रव्य. रक्तातील कोलीन एस्टरेज या ⇨ एंझाइमकडून याचे विघटन होते. त्याची आनुवंशिक कमतरता असल्यास दीर्घकाळ श्वसन थांबण्याचा धोका असतो.

(२) क्युरारी या आफ्रिकन बाणविषापासून काढलेले ट्युबोक्यूरारीन व त्यासारखी अन्य औषधे (उदा., गॅलामाइन, अल्क्युरोनियम पॅनक्युरोनियम, अट्रा-, मिव्हा-, व्ही-क्युरियम इत्यादी). १ ते २ मिनिटांत परिणाम सुरू होऊन तो द्रव्याच्या गुणधर्मानुसार १५ ते ४५ मिनिटे टिकू शकतो. या वर्गातील नवीन संश्लेषणजन्य (कृत्रिम रीतीने बनविलेली) औषधे बरीच सुरक्षित असून त्यांच्या उपयोगाने व जोडीला मधूनमधून वाढीव दाबाने कृत्रिम श्वसन वापरून मेंदू, उरोपोकळी व उदर यांवरील अनेक कठीण शस्त्रक्रिया बिनधोकपणे पार पडू शकतात.    

संधारणकाळात नीलेद्वारा अंतःक्षेपित द्रवाच्या प्रवाहातून आवश्यकतेनुसार वेदनाशामक, लवण द्रावण, रक्तद्रव किंवा रक्त यांच्या मात्राही शरीरात प्रविष्ट करता येतात. याच काळात रुग्णाच्या स्थितीबद्दल महत्त्वाची पुढील निरीक्षणे चालू असतात.    

(अ) साधी निरीक्षणे : डोळ्यांच्या बाहुल्या, प्रकाश प्रतिक्षेप श्वसनाचा वेग, लय व खोली मनगटामधील नाडीचे ठोके-वेग व लय त्वचेचे तापमान व घामामुळे येणारा दमटपणा स्नायूंचा ताण वा शिथिलता.

(आ) विशेष उपकरणे वापरून लक्षात येणारी निरीक्षणे (आवश्यकतेनुसार, शस्त्रक्रियेचा प्रदीर्घ काळ आणि गुंतागुंतीचे स्वरूप लक्षात घेऊन केलेली निरीक्षणे) : विद्युत् हृदालेख (ECG)– हृदयस्पंदनाचा वेग, लय व ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती साधा किंवा स्वयंचलित रक्तदाबमापक- शरीराची अभिसरणविषयक स्थिती रक्तवाहिनीत घातलेली संवेदक नलिका हृदयापर्यंत सरकवून तिच्या मदतीने उजवी कर्णिका व फुफ्फुस-रोहिणीमधील दाबाचे मापन व त्यावरून हृदयाच्या क्षेपणक्षमतेचा अंदाज श्वसनमार्गातील हवेचा दाब, हालचालीचा वेग व वायूंचे (ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड) पृथक्करण रक्तातील वायूंचे मापन मूत्राशयात घालून ठेवलेल्या नळीच्या मदतीने वृक्काच्या मूत्रनिर्मितीच्या कार्याचा अंदाज तापमान संवेदकाच्या मदतीने अन्ननलिकेतील (मध्यवर्ती तापमान), नासिकाग्रसनीतील (मस्तिष्क तापमान) आणि पायाच्या बोटांचे (परिघीय तापमान) तापमान यांची नोंद आणि विद्युत् प्रवाहाने तंत्रिकेचे उद्दीपन करून स्नायूंच्या प्रतिसादाची नोंद करून त्यावरून तंत्रिका-स्नायू संधिप्रदेशातील अवरोधाच्या स्थितीचा अंदाज विद्युत् मस्तिष्क आलेखनाच्या मदतीने (ECG) दीर्घकाळ ऑक्सिजन-न्यूनतेमुळे मेंदूत झालेल्या बदलांचा अंदाज. 

शुद्धिहरणाची समाप्ती व शुद्धिहरणोत्तर अवस्था : शस्त्रक्रिया संपत आल्यावर शुद्धिहरणाची पातळी कमी केली जाते. जखम बंद केल्यावर, शुद्धिहारक वायू बंद करून आवश्यक वाटल्यास काही वेळा ऑक्सिजन चालू ठेवतात. रुग्ण शुद्धीवर येऊन थोडी हालचाल करेपर्यंत श्वसनमार्गातील नळी किंवा वायुमार्ग तसाच राहू देतात. त्यानंतर रुग्णाला परत पूर्वसिद्धता कक्षात किंवा स्वतंत्र निरीक्षण कक्षात हलविले जाते.    

नंतर काही काळ रुग्ण गुंगीतच असतो. या काळात उलटी होणे, श्वसनमार्गात स्राव साठून अडथळा येणे, थंडी वाजून येणे, रक्तदाब अचानक कमीजास्त होणे, गोंधळलेल्या मनःस्थितीमुळे अस्वस्थ होऊन हालचाल करणे किंवा पडणे यांसारख्या घटनांवर लक्ष ठेवावे लागते. नियमित श्वसन सुरू होऊन ऑक्सिजनची आवश्यकता भासणार नाही अशी खात्री झाल्यावर रुग्णाला आपल्या कक्षात नेण्यात येते.    

शुद्धिहरणानंतरच्या एक-दोन दिवसांच्या काळात डोकेदुखी, मळमळणे, मूत्रावरोध, पोटात वायू साठून ते फुगणे, चेहरा व श्वसनमार्गाचा दाह, तापमानात वाढ, स्नायूंमध्ये वेदना, निर्जलीभवन, रक्तदाबातील चढ-उतार यांसारख्या परिणामांना तोंड द्यावे लागते, शस्त्रक्रियेच्या जखमेतील वेदनांसाठी वेदनानाशके दिली जातात. उदरावरील मोठ्या शस्त्रक्रियांमध्ये तंत्रिका ऊतकांना विस्तृत प्रमाणात इजा झाली असल्यास असह्य वेदना होतात. यासाठी कधीकधी मेरुरज्जूच्या दृढतानिका आवरणाबाहेरच्या क्षेत्रात वेदनानाशक किंवा संवेदनाहारक औषधे दिली जातात.

शुद्धिहरणासाठी आवश्यक उपकरणे : शस्त्रक्रियाशाळा व तिला जोडून असलेले निरीक्षण कक्ष व सिद्धता कक्ष यांत पुढील सामग्री अत्यावश्यक असते.    

वायूंचा पुरवठा : ऑक्सिजन, शुद्धिहारक वायू इत्यादींचा साठा मॉलिब्डेनममिश्रित पोलादाच्या ४ ते ६ विविध आकारांच्या नळकांड्यातून (टाक्यांमधून) उपलब्ध असतो. प्रत्येकावर घड्याळासारखा गोल दाबमापक व पान्याने उघडता येणारी झडप असते. दाबनियंत्रक झडपेच्या मदतीने हा वायू शुद्धिहरण यंत्रात कमी दाबाने (४०० किलोपास्कल = ६० पौंड प्रति चौरस इंच = वातावरणीय दाबाच्या चार पट) सोडण्याची व्यवस्था असते. मोठ्या आधुनिक रुग्णालयात सर्व वायूंचा साठा मध्यवर्ती ठिकाणी ठेवून तेथून ४०० किलोपास्कल दाबाने प्रत्येक खोलीत नळाद्वारे वायू पुरवितात. नळाची तोटी किंवा वायूचे नळकांडे यांच्या रंगाची आंतरराष्ट्रीय संकेतप्रणाली आहे. (पहा कोष्टक क्र. २).


कोष्टक क्र. २. रुग्णालयातील वायूंच्या टाक्या व पुरवठा 

वायू

मुख्य भाग

तोंडाकडील भाग

महत्त्व

ऑक्सिजन

काळा

पांढरा

जीवनावश्यक घटक 

नायट्रस ऑक्साइड

निळा

निळा 

सौम्य शुद्धिहारक 

ऑक्सिजन + नायट्रस ऑक्साइड 

निळा 

निळे/पांढरे 

अधिक सुरक्षित 

वैद्यकीय हवा

करडा

काळे/पांढरे 

कृत्रिम श्वसनास पर्याय 

कार्बन डाय-ऑक्साइड

करडा

करडा

श्वसनास उत्तेजक

ऑक्सिजन + कार्बन डाय-ऑक्साइड

काळा

पांढरे/करडे

श्वसन अवसादन टाळते

हीलियम

पिंगट

पिंगट

श्वसनास हलका

ऑक्सिजन + हीलियम

काळा

पांढरे/पिंगट

श्वसनसुलभ मिश्रण

सायक्लोप्रोपेन

केशरी

केशरी

स्फोटक

निर्वात

पिवळी तोटी

चूषण व अपमार्जनासाठी

[वैद्यकीय उपयोगासाठी रुग्णालयात उपलब्ध वायूंच्या टाक्या किंवा नळांच्या तोट्या यांवर आंतरराष्ट्रीय वर्णसंकेतावलीनुसार रंगाबरोबरच वायूचे रासायनिक सूत्र किंवा नाव ठळक अक्षरात लिहिणे आवश्यक असते. मिश्रणांच्या टाक्यांवर दोन रंगांचे वृत्तपाद (चतुर्थ भाग) एकाआड एक रंगविलेले असतात (उदा., निळे/पांढरे)].

 श्वसनप्रणालीची रचना दाखविणारी दोन उदाहरणे : (अ) मेपलसन ए प्रणाली : हिच्यातील विविध घटकांच्या जागा एकमेकींच्या संदर्भात बदलून इतर प्रणाली तयार होतात (आ) वर्तुळ प्रणालीतील घटक : (१) शुद्धिहरण यंत्राकडून ताजे वायुमिश्रण घेणारे द्वार, (२) रबरी साठवण पिशवी, (३) उच्छ्‌वसन झडप, (४) मुखवटा, (५) सोडा-लाइम पात्र, (६) चेहरा.शुद्धिहरण यंत्र : एच. ई. जी. बॉईल यांनी हे यंत्र १९१७ मध्ये प्रथम इंग्लंडमध्ये उपयोगात आणले म्हणून हे बॉईल यंत्र या नावाने ओळखतात. याचे प्रमुख भाग असे :  (अ) वायू ग्रहण करून त्यांचा दाब कमी करणाऱ्या न्यूनीकरण झडपा. (आ) प्रवाहमापकाच्या सरळ उभ्या काचेच्या नळीत खालून वायूचा प्रवाह सोडल्यामुळे आत असलेला शंकूच्या आकाराचा दर्शक स्वतःभोवती फिरत वर-खाली होतो. त्याच्या वरच्या कडेच्या पातळीवरून प्रवाहाची गती (लिटर प्रतिमिनिट) दर्शविली जाते. प्रत्येक वायूसाठी स्वतंत्र मापक बसविलेला असतो. (इ) वायूंचे मिश्रण करणाऱ्या नलिकांच्या जोडणीत ठरावीक वेगापेक्षा कमी वेगाने ऑक्सिजन जाणार नाही अशी व्यवस्था असते. तसे झाल्यास इशारा देणारी व इतर वायूंचा पुरवठा आपोआप बंद करणारी यंत्रणाही काही ठिकाणी आढळते. (ई) वायुमिश्रणाचा प्रवाह अंशतः बाष्पनशील द्रवामधून (ईथर किंवा हॅलोथेनच्या बाटलीतून) नेऊन अशा द्रवाचे बाष्प योग्य त्या प्रमाणात वायुमिश्रणात मिसळणारे बाष्पित्र. अशा प्रकारे तयार झालेले अंतिम शुद्धिहारक मिश्रण रुग्णाच्या मुखवट्यापर्यंत किंवा अंतःश्वासनालनलिकेपर्यंत नेऊन पोहोचविणाऱ्या साधनाला श्वसनप्रणाली म्हणतात. (उ) यांशिवाय निर्वातीकरणाच्या मदतीने रुग्णाच्या आसमंतातील हवा खेचून घेऊन शस्त्रक्रियाशाळेतील हवा शक्य तेवढी स्वच्छ ठेवणारी अपमार्जक यंत्रणा हीसुद्धा कधीकधी शुद्धिहारक यंत्रातच समाविष्ट असते.

श्वसनप्रणाली : वायुमिश्रण रुग्णापर्यंत पोहोचविणाऱ्या नलिकामार्गात उच्छ्वसन झडप आणि सु. दोन लिटर क्षमतेची रबरी फुग्यासारखी साठवणीची पिशवी वापरून अनेक प्रकारच्या प्रणाली तज्ज्ञांनी तयार केल्या. १९५४ मध्ये डब्ल्यू. डब्ल्यू. मेपलसन यांनी त्यांचे ए पासून एफ पर्यंत वर्गीकरण केले. श्वसनाबरोबर बाहेर टाकलेल्या वायूस वाट करून देणे, श्वसनाची हालचाल सहज दर्शविणे, अतिरिक्त वायू सामावून घेणे व कृत्रिम श्वसनास मदत करणे असे त्यांचे कार्य असते. ताज्या वायूची नळी किंवा उच्छ्वासक झडपेची नळी जास्त खोलवर मुखवट्यापर्यंत नेऊन बेन व लॅक यांनी एकात एक नळ्या असलेल्या समाक्ष श्वसनप्रणाली नंतर प्रचारात आणल्या. त्यातूनही जास्त कार्यक्षम अशी वर्तुळ प्रणाली (आकृती पहा) वापरून उपलब्ध वायूंचा जास्तीत जास्त उपयोग करता येतो. सोडालाइम नावाचा घन पदार्थ [चुनकळी ९०%, दाहक (कॉस्टिक) सोडा ५%, दाहक पोटॅश १%, सिलिका, पाणी व रंजक द्रव्य उर्वरित भाग] या पद्धतीमध्ये कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेतो व रंगबदलाने [गुलाबी → पांढरा] आपली शोषणक्षमता संपल्याचे दाखवितो.   

कृत्रिम श्वसनयंत्र : श्वसनप्रणालीमधील रबरी फुगा दाबून फुफ्फुसांत हवेचा दाब वाढविण्याचा प्रयत्न अनेकदा अयशस्वी ठरतो. विशेषतः श्वसनकेंद्राचे अवसादन करणारी औषधे (उदा.मॉर्फीन) अधिक प्रमाणात द्यावी लागली असल्यास अशा रीतीने श्वसनास चालना मिळत नाही. अशा प्रसंगी विजेवर चालणारी श्वसन यंत्रे वापरणे अपरिहार्य ठरते. श्वसनप्रणालीला ती जोडून कमी दाबाने ऑक्सिजन पुरवठा केल्यास फुफ्फुसांना इजा होत नाही.   

चूषण यंत्र : श्वसनमार्गातील स्राव शोषून घेण्यासाठी विजेवर चालणाऱ्या पंपाला जोडलेले किंवा मध्यवर्ती निर्वातन यंत्रणेच्या नळीला जोडलेले हे यंत्र कमीत कमी ४०० मिमी. पाऱ्याच्या स्तंभाएवढे दाब निर्वातन निर्माण करते. अंशतः पाण्याने भरलेल्या एक किंवा दोन बरण्यांमधून चूषण कार्यान्वित होत असल्यामुळे चूषित द्रव, रक्त इ. पाण्यात धरले जातात. जंतुसंक्रमणाचा प्रसार होऊ नये म्हणून योग्य त्या गाळण्या व जंतुनाशक द्रव्यांचा वापर निर्वातन यंत्रणेत केला जातो. रुग्णकक्षात असे यंत्र उपलब्ध नसल्यास मोठ्या काचेच्या पिचकारीस रबरी नळी जोडून तिचा उपयोग चूषणासाठी करावा लागतो.

पहा : क्लोरोफॉर्म प्राणिविच्छेदन शस्त्रक्रिया तंत्र संवेदनाहरण.

संदर्भ  : 1. Gwinnut, C. L. Clinical Anaesthesia, Oxford, 1996.             2. Kumar, B. Working In The Operating Department, London, 1998.             3.  Plecknell, P. A.  Anaesthesia of Animals for Biomedical Research, 1993.             4. Ward, C. S. Anaesthesia Equipment-Physical Principles and Maintenance, London, 1985.

श्रोत्री, दि. शं.