पुरंदरे, भालचंद्र नीळकंठ : (२७ ऑक्टोबर १९११ – ) सुप्रसिद्ध भारतीय प्रसूतिविद्याविशारद आणि स्त्रीरोगविज्ञ. स्त्रीरोगविज्ञानात त्यांनी घातलेली मौलिक भर जगभर प्रसिद्ध आहे. त्यांनी आजपावेतो २५,००० पेक्षा जास्त योनिमार्गाद्वारे गर्भाशयोच्छेदन आणि योनीमार्गाद्वारे वंध्यीकरण शस्त्रक्रिया केल्या असून तो एक असाधारण उच्चांक गणला जातो. त्यांनी स्त्रीरोगाविषयक काही शस्त्रक्रियांच्या बाबतीत स्वतंत्र तंत्र शोधून वापरले आहे.

त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. मुंबईच्या विल्सन कॉलेजातून इंटर सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जी. एस्. मेडिकल कॉलेज, मुंबई येथून त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम्. बी. बी. एस्. पदवी १९३४ मध्ये मिळविली. त्यांच्या विद्यापीठीय जीवनात त्यांना अनेक गुणविशेष शिष्यवृत्त्या मिळाल्या. १९३७ मध्ये त्यांनी त्याच विद्यापीठाची एम्. डी. (प्रसूतिविज्ञान व स्त्रीरोगविज्ञान) ही पदव्युत्तर पदवी मिळविली. पुढील शिक्षणाकरिता ते इंग्लंडला गेले व रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स, एडिंबरो येथून १९३९ साली एफ्. आर्. सी. एस्. पदवी मिळविली. भारतात परतल्यानंतर मुंबईच्या कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स या संस्थेची अधिछात्रवृत्ती मिळवून ते एफ्. सी. पी. एस्. झाले.

मुंबई येथील के. ई. एम. रुग्णालयाच्या ‘प्रसूतिविद्या व स्त्रीरोगविज्ञान’ विभागात त्यांनी १९४१–५५ पर्यंत सहाय्यक सन्माननीय विशेषज्ञ, १९५७ पर्यंत सन्माननीय विशेषज्ञ आणि त्यानंतर विभागप्रमुख म्हणून काम केले. त्यांच्याच एकमेव प्रयत्नामुळे स्त्रीरोगविज्ञान, प्रसूतिविद्या व कुटुंबनियोजन या विषयांच्या संशोधनाकरिता खास संशोधन केंद्र स्थापन झाले व ते त्याचे संचालक नेमले गेले. या केंद्राला त्यांचे वडील डॉ. एन्. ए. पुरंदरे यांचेच नाव देण्यात आले असून तेही याच विषयांचे एक ख्यातनाम तज्ञ होते. १९६९ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते विभागप्रमुख व संशोधन केंद्र संचालक होते. त्यानंतर त्यांची सन्मान्य निवृत्त प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जननमार्गासंबंधी अनुप्रयुक्त जीवविज्ञानाच्या एम्. डी. व पीएच्. डी. या पदव्युत्तर परीक्षांच्या अभ्यासाची सोय करण्यात आली. सध्या ते नौरोसजी वाडिया प्रसूती रुग्णालयाचे प्रमुख अधिकारी आहेत. याशिवाय वाडिया रुग्णालय, बाँबे रुग्णालय व पश्चिम रेल्वेचे जगजीवनराम रुग्णालय या रुग्णालयांचे सन्माननीय विशेषज्ञही आहेत.

भालचंद्र नीळकंठ पुरंदरे

त्यांनी कुटुंबनियोजनांसंबंधी विशेष कामगिरी बजावली आहे. गर्भपातविषयक कायद्यासंबंधी नेमलेल्या शांतिलाल शाह समितीचे ते एक सभासद होते. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ किताब १९७२ मध्ये बहाल करण्यात आला.

त्यांना पुढील मानसन्मान मिळाले आहेत : अधिष्ठाता, वैद्यकीय विद्याशाखा, मुंबई विद्यापीठ अध्यक्ष, कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स, मुंबई सन्मान्य सदस्य, एडिंबरो ऑब्‌स्टेट्रिक सोसायटी, एडिंबरो अध्यक्ष, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनेकोलॉजी अँड ऑब्‌स्टेट्रिक अध्यक्ष, इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायटॉलॉजिस्ट अध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑब्‌स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया सन्मान्य सदस्य, इंडियन ॲकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेस. स्त्रीरोगविज्ञान आणि प्रसूतिविद्या या विषयांवर त्यांनी बरेच संशोधन केले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांतून त्यांचे सु. १२५ संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. प्रसूतिविद्येवरील एका ग्रंथाचे ते सहलेखक असून या ग्रंथाच्या १९७६ पर्यंत १० आवृत्त्या निघाल्या होत्या.

भालेराव, य. त्र्यं.